डोंबिवली : वंदे मातरम् या गीतात देशाची समृध्दी दर्शवणारी अनेक विशषणो आहेत. याच गीताचे १५० वे वर्ष आपण नुकतेच साजरे केले. विपरित परिस्थितीत आपण काय करावे याचे मार्गदर्शन या गीतामधून आपल्याला मिळते. हे गीत म्हणजे एक प्रेरणा आहे, प्रत्येक भारतीयांचा वंदे मातरम् म्हणजे श्वास आहे, असे मत ज्येष्ठ विज्ञान प्रचारक डॉ. जयंत वसंत जोशी यांनी दिले.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा शुभारंभ शनिवारी १० जानेवारी रोजी झाला. यावेळी ‘वंदे मातरम्’ या विषयावर ते बोलत होते. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प जोशी यांनी गुंफले. व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. या व्याख्यानमालेचे हे २७ वे वर्ष आहे. या कार्यक्रमप्रसंगी संस्थाध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी, संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. सरोज कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
जोशी पुढे म्हणाले, वंदे मातरम् हा एक ध्यास आहे. श्वास आहे. शपथ आहे. प्रेरणा आहे. गर्जना आहे. मनातील सर्वभाव जागृत करणारा असा विचार आहे. बंकिमचंद्र यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये असा उल्लेख आहे. बंकिमचंद्र यांना हे गीत कसे सुचले याविषयी बोलताना ते म्हणाले, बंकिमचंद्र ब्रिटिशांकडे बंगाल प्रांतात मॅजिस्ट्रेट म्हणून नोकरी करत होते. परंतु भाकरीसाठी चाकरी करायला लागणे हे त्यांना पटले नाही. त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि आपल्या भारतीयांवर अन्याय होतोय असे पाहून त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही दिवसांनी मित्राकडे गेले असता तिथे एक मच्छीमार होडी घेऊन नदीमधून गंगा मातेसाठी मी आहुती देईन असे म्हणत चालला होता. या वाक्याने त्यांच्या मनात देशासाठी क्रांतीचे बीज निर्माण झाले व त्यानंतर आलेल्या नवरात्रमध्ये दुर्गा मातेकडे पाहत असताना त्यांना दृष्टांत झाला. ही दुर्गामाता म्हणजेच आपली ‘भारतमाता’ आहे. यावरूनच त्यांनी हमारा दुर्गाेत्सव हा प्रदीर्घ असा लेख लिहिला . हा लेख म्हणजेच आपल्या वंदे मातरम् या गीताचे गद्यरुप होते असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजाराम पाटील यांनी मानले. पाहुण्याचा परिचय प्राचार्या डॉ. अनुजा पळसुलदेसाई यांनी करून दिला. सर्वेश नाटलेकर यांच्या संपूर्ण वंदे मातरम् ने कार्यक्रमाचा समारोप झाला. दरम्यान ठाणे जिल्ह्यातील पहिलाच नाविण्यपूर्ण उपक्रम मॅथ्स् एक्झीबिशन चे उद्घाटन संस्थेच्या उपाध्यक्षा तथा गणित प्रदर्शन प्रमुख डॉ. सरोज कुलकर्णी यांनी केले. यामध्ये संस्थेच्या सर्व स्वामी विवेकानंद शाळांमधील माध्यामिकव प्राथमिक विभागातील प्रत्येकी दहा प्रकल्प सादर करण्यात आले. गणित प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष आहे.