‘ऑनलाईन’ नाट्यप्रयोग...

    11-Jan-2026
Total Views |
Theatre
 
नाट्यकला ही मुळात सांघिक कृती असून, परंपरेनुसार सहभागी कलाकारांनी एकाच छताखाली एकत्र येणे आवश्यक असते. मात्र, २०२०च्या सुरुवातीला आपली जगाकडे पाहण्याची आणि एकमेकांशी संवाद साधण्याची पद्धत पूर्णपणे बदलून गेली. हा आमूलाग्र बदल ‘कोविड-१९’ महामारीमुळे झाला. रस्ते ओस पडले होते, वाहने ‘पार्किंग’मध्येच उभी होती, प्रवास जवळजवळ बंद झाला होता, कुटुंबे घरातच बंदिस्त झाली होती, मुले शाळेत जात नव्हती, प्रवास तर नव्हताच; पण संवादसुद्धा अत्यंत मर्यादित झाला होता. संवादाचे एकमेव माध्यम म्हणजे, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणारा ऑनलाईन संवाद. मोबाईल फोन, दूरदर्शन वाहिन्या आणि इंटरनेट|
 
मार्च २०२०च्या अखेरीस शाळांच्या परीक्षा संपत होत्या आणि उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होण्याच्या तयारीत होत्या. हा तो काळ असतो, जेव्हा मुलांच्या नाट्य उपक्रमांना वेग येतो. उन्हाळी शिबिरांची प्रवेश प्रक्रियाही पूर्ण जोमाने चालू असते. विद्यार्थी परीक्षांमधून मोकळे होऊन रंगभूमीची जादू अनुभवण्यासाठी, नवे मित्र बनवण्यासाठी, विविध भूमिका साकारण्यासाठी आणि थेट प्रेक्षकांसमोर सादरीकरण करण्यासाठी उत्सुक असतात. मात्र, याच काळात मुलांना घरी राहण्यास सांगितले गेले आणि कोणताही सहअभ्यासक्रम-उपक्रम होत नव्हता. संपूर्ण जग तणावाखाली होते आणि पुढे काय होईल, याबद्दल अनिश्चितता होती.
 
बालनाट्य क्षेत्रातील तज्ज्ञ असलेली नाट्यशिक्षिका व संशोधक म्हणून माझा दृष्टिकोन व्यापक चित्र पाहण्याकडे, कल्पनाशक्ती विस्तारण्याकडे, शक्यता शोधण्याकडे आणि सकारात्मक बाजू पाहण्याकडे होता. तो काळ म्हणजे एक मोठी कसोटीच होती. जग नकारात्मक भावनांमध्ये गुरफटलेले होते. पुढे काय होणार याची कोणालाच कल्पना नव्हती; लोक प्रार्थना, ध्यानधारणा करत फक्त जगण्याचाच विचार करत होते. या परिस्थितीचा मुलांवरही तितकाच परिणाम होत असल्याची जाणीव मला होती. मला मुलांना या नकारात्मकतेपासून दूर ठेवायचे होते आणि त्यांच्यातील संवाद सुरू ठेवायचा होता. यासाठी सुरुवातीला मी ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स’च्या माध्यमातून, एक छोटीशी कल्पना राबवली आणि नंतर ‘झूम’वरील ‘व्हिडिओ कॉलिंग’द्वारे ती पुढे नेली. तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले. पुढील १८ महिन्यांमध्ये मी तंत्रज्ञानाचा वापर करून, ‘आभासी रंगभूमी’ कशी उभारली आणि आज प्रत्यक्ष वर्ग घेता येत असतानाही ती प्रक्रिया कशी सुरू आहे, याचे वर्णन पुढे केले आहे.
 
‘ऑनलाईन’ नाट्य-सादरीकरणांचा टप्प्याटप्प्याने झालेला विकास
 
‘व्हॉट्सअ‍ॅप’ गट : सुरुवातीला माझ्या विद्यमान विद्यार्थ्यांचा ‘ऑनलाईन’ नाट्यकृतींमध्ये सहभागी होण्याच्या इच्छेनुसार, एक ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ची निर्मिती करण्यात आली. विद्यार्थ्यांना घरून करता येतील अशा वाढत्या अवघडपणाचे २१ नाट्यखेळ व नाट्यकृती देण्यात आल्या. यामध्ये जिभेच्या कसरती किंवा टंग ट्विस्टर्स, घर साफ करणे, पालकांची मुलाखत घेणे, काल्पनिक पात्राचा मेकअप व वेशभूषा, पाच अनियमित शब्दांचा वापर करून लघुकथा लेखन, जाहिरात स्पूफ सादरीकरण, आवडत्या गाण्यावर नृत्य करणे अशा कृतींचा समावेश होता. या सर्वांचा परिपाक ‘हत्ती हरवला आहे’ या लघुपटाच्या चित्रीकरणात झाला. या कृतींची चित्रफीत किंवा छायाचित्रे काढून ती माझ्याकडे पाठवण्यात येत. दररोजच्या उत्कृष्ट सादरीकरणांना ‘व्हर्च्युअल मार्बल्स’ देऊन गौरविण्यातही येत असे.
 
‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे नाट्यवाचन : पुढील टप्प्यात मी मुलांकडून एकांकिका नाट्यवाचन करून घेणार्‍या कार्यशाळांची मालिका जाहीर केली. प्रत्येक तुकडीत १२ ते १५ विद्यार्थी असत. सुमारे दहा दिवस नाट्यवाचनाच्या रंगीत तालिमांसह, काही व्हर्च्युअल नाट्यखेळ घेतले जात आणि त्यानंतर कुटुंबीयांसमोर ऑनलाईन सादरीकरण होत असे. या स्वरूपाला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे, प्रौढांसाठीही अशाच कार्यशाळा घेण्यात आल्या. यामध्ये प्रौढांनी बालनाट्यांचे नाट्यवाचन सादर केले. कालांतराने एकपात्री अभिनय, नाट्यखेळ, कथाकथन ते लघुपटनिर्मितीपर्यंत विविध प्रकारच्या कार्यशाळा सुरू करण्यात आल्या. एकूण १८ महिन्यांच्या कालावधीत ३० कार्यशाळा घेण्यात आल्या.
 
दोन तासांच्या ‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकाचे सादरीकरण: एकांकिका सादरीकरणाचा आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर मी दोन अंकी, दीर्घ स्वरूपाच्या नाटकाचा प्रयोग करण्याचे ठरवले. महामारीच्या काळात मी ‘रामायणा’वर आधारित, ‘सियावर रामचंद्र की जय’ हे दोन अंकी बालनाटक लिहिले होते. या नाटकाचे दोन तासांचे नाट्यवाचन एका विशेष कार्यशाळेद्वारे नियोजित करण्यात आले. ही कार्यशाळा ३६ विद्यार्थ्यांसह २२ दिवस चालली. दररोज दोन ते तीन तासांचे सत्र घेतले जात. याचा समारोप नाटकाच्या तीन ऑनलाईन नाट्यवाचन सादरीकरणांनी झाला. यापैकी दोन सादरीकरणे सशुल्क होती आणि तिकीट-विक्रीतून मिळालेली रक्कम, मुलांच्या वतीने ‘पीएम केअर्स’ फंडात देण्यात आली.
 
सारांश : किमान आवश्यक तंत्रज्ञान म्हणजे, इंटरनेट-सक्षम स्मार्टफोन-ज्याचा वापर ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर संवाद साधण्यासाठी, छायाचित्रे-चित्रफिती टिपण्यासाठी आणि त्या इच्छुक सहभागींच्या गटात शेअर करण्यासाठी करण्यात आला. ‘झूम’सारख्या ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ साधनांच्या प्रसारामुळे, अधिक गुंतागुंतीच्या मांडण्या शय झाल्या. जिथे विद्यार्थी दृक्श्राव्य माध्यमांचा प्रभावी वापर करून आणि अभिनय कौशल्ये वापरून, ‘व्हर्च्युअल’ वातावरणात नाट्यप्रभाव निर्माण करू शकले. ऑनलाईन प्रेक्षकांचा सहभागही शक्य झाला. प्रशिक्षण सत्रांदरम्यान ‘ब्रेकआऊट रुम्स’मुळे, लहान गटांमध्ये चर्चा करता आली. जसे प्रत्यक्ष कार्यशाळांमध्ये नाट्यखेळांसाठी केले जाते आणि नंतर संपूर्ण गटासमोर सादरीकरण झाले. प्रेक्षकांसाठी ’व्हर्च्युअल तिकिटे’ व ’पासेस’ देण्यासाठीही, तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आणि वैध लिंक असलेलेच प्रेक्षक सादरीकरण पाहू शकतील, याचीही तरतूद करण्यात आली. यामुळे प्रत्यक्ष रंगभूमीच्या जवळ जाणारी एक ‘आभासी रंगभूमी’ उभारणे शक्य झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमाचे अंतिम उद्दिष्ट असलेले ‘प्रेक्षकांचे मनोरंजन’ साध्य झाले.
 
‘ऑनलाईन’ नाट्य-सादरीकरणांच्या मर्यादा ः आभासी नाट्यशिक्षण व सादरीकरणाच्या प्रक्रियेत अनेक फायदे दिसून आले असले, तरी पुढील मर्यादांची नोंद घेणे महत्त्वाचे : १. सर्व नावीन्यपूर्ण पद्धती असूनही, प्रशिक्षण, तालमी आणि सादरीकरण या सर्व दृष्टीने प्रत्यक्ष रंगभूमीइतका प्रभाव अंतिमतः साधता येत नाही. २.पात्रांची हालचाल, संपूर्ण देहबोलीचा वापर, व्यावसायिक प्रकाश योजना आणि स्वतंत्र रंगमंचीय मांडणीशिवाय सादरीकरण अपूर्ण वाटते. ३.प्रत्यक्ष संवाद, प्रत्यक्ष कौतुक (उदा. पाठीवर मिळालेली थाप) आणि प्रमाणपत्र व मार्बल्सद्वारे होणारी प्रत्यक्ष दखल, जी बालनाट्यात नेहमीची असते याची उणीव विद्यार्थ्यांना ऑनलाईन नाट्य कार्यशाळेत जाणवते.
 
आजच्या ऑफलाईन जगात ‘ऑनलाईन नाट्या’चे महत्त्व : ऑफलाईन नाट्यकृती पुन्हा सुरू झाल्या असल्या, तरी शिक्षक म्हणून मी आपल्या शहरातील विद्यार्थ्यांशीच प्रत्यक्ष जोडली जाऊ शकते. ऑनलाईन कार्यशाळांमुळे मात्र शहराबाहेरील, तसेच भारताबाहेरील विद्यार्थीही नाट्यकृतींसाठी माझ्याशी जोडले जात आहेत. उदाहरणार्थ, ऑनलाईन कार्यशाळांमध्ये पुण्याव्यतिरिक्त नागपूर, छत्रपती संभाजीनगर, बंगळुरू, मुंबईपासून अमेरिकेपर्यंत विद्यार्थी जोडले गेले आहेत. मुले प्रत्यक्ष नाट्यवर्गांना उपस्थित राहू शकत नसली, तरी ऑनलाईन सत्रांमधून शिकताना व सादरीकरण करताना त्यांच्यात सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. नाटकाचा आत्मा आणि उत्साह त्यांना तरीही अनुभवता येतो.
 
 -  रानी राधिका देशपांडे