‘एआय’ युगात करिअरचे बदलते स्वरूप - भीती की संधी?

    11-Jan-2026
Total Views |
AI
 
रविवारची दुपार होती. जयंतराव आपल्या जुन्या मित्राच्या मुलाच्या लग्नावरून परतले होते. लग्नात अनेक तरुणांशी झालेल्या गप्पांमुळे त्यांच्या मनात काही शंका निर्माण झाल्या होत्या.
 
जयंतराव : आदित्य, आज लग्नात काही इंजिनिअरिंगच्या मुलांशी बोललो. बिचारी धास्तावलेली वाटली. म्हणतात की, ‘एआय’ आता स्वतःचे ‘कोडिंग’ करू लागलाय. मग, आम्हाला नोकर्‍या कोण देणार? आपण ‘एआय’च्या फायद्यांबद्दल बोलतो; पण या तरुण पिढीच्या भविष्याचं काय?
 
आदित्य : आजोबा, त्या मुलांची भीती मी समजू शकतो; पण ती पूर्णपणे खरी नाही. इतिहास पाहिला तर लक्षात येईल की, प्रत्येक मोठ्या तंत्रज्ञानाने सुरुवातीला अशीच भीती घातली होती. कॉम्प्युटर आले तेव्हा वाटलं होतं की, क्लार्कच्या नोकर्‍या जातील. पण, कॉम्प्युटरमुळे बँकिंग आणि ‘आयटी’ क्षेत्रांत लाखो नव्या नोकर्‍या तयार झाल्या. ‘एआय’सुद्धा नोकर्‍या संपवत नाहीये, तर तो नोकर्‍यांचे स्वरूप बदलत आहे. आपण आता अशा युगात आहोत, जिथे काम करण्यासाठी फक्त ‘डिग्री’ पुरेशी नाही, तर ‘एआय’सोबत काम करण्याची क्षमता महत्त्वाची आहे. साचेबद्ध कामांचा अंत आणि ’एआय को-पायलट’चे आगमन
 
आदित्य : ‘एआय’ प्रामुख्याने अशी कामं वेगाने आत्मसात करत आहे, जी साचेबद्ध, नियमांवर आधारित किंवा मोठ्या ‘डेटा’च्या विश्लेषणाशी संबंधित आहेत. ‘एआय’मुळे प्रभाव पडणार्‍या नोकर्‍यांची सविस्तर यादी खालीलप्रमाणे आहे :
कार्यालयीन आणि प्रशासकीय कामे : डेटा एन्ट्री ऑपरेटर, फाईल मॅनेजमेंट, साधे अकाऊंटिंग आणि बुककिपिंग, इन्व्हॉईस प्रोसेसिंग आणि प्रशासकीय साहाय्यक.
 
लेखन आणि संवाद : तांत्रिक लेखक, अनुवादक, प्रूफरीडर, बातमी संकलन करणारे कनिष्ठ पत्रकार आणि साध्या स्वरूपाचे कंटेंट रायटिंग.
 
ग्राहक सेवा आणि विक्री : कॉल सेंटरमधील प्राथमिक चौकशी हाताळणारे प्रतिनिधी, टेलिमार्केटर्स, तिकीट बुकिंग एजंट आणि सेवा-विक्री प्रतिनिधी.
 
‘आयटी’ आणि तांत्रिक : एन्ट्री-लेव्हल प्रोग्रॅमर, सॉफ्टवेअर टेस्टर्स आणि ‘सीएनसी’ टूल प्रोग्रॅमर्स. 
बँकिंग आणि वित्त : बँक टेलर्स, कॅशिअर्स, क्रेडिट स्कोअरिंग करणारे अधिकारी आणि प्राथमिक आर्थिक विश्लेषक.
इतर सेवा : हॉटेलमधील रिसेप्शनिस्ट, पॅकेजिंग आणि फिलिंग मशीन ऑपरेटर्स आणि साध्या स्वरूपाचे संशोधन करणारे साहाय्यक.
 
‘एआय’ या नोकर्‍या पूर्णपणे संपवण्यापेक्षा त्यातील ‘पुनरावृत्ती’ होणार्‍या भागाचे ऑटोमेशन करत आहे, ज्यामुळे या क्षेत्रातील कर्मचार्‍यांना अधिक धोरणात्मक आणि कौशल्यपूर्ण कामांकडे वळणे आवश्यक ठरेल. पण, याचा अर्थ असा नाही की, इंजिनिअरची गरज संपली.
भविष्यात प्रत्येक प्रोफेशनलकडे एक ‘एआय को-पायलट’ असेल. एखादा आर्किटेट पूर्वी एका आठवड्यात एक नकाशा बनवायचा, आता तो ‘एआय’च्या मदतीने एका तासात दहा नकाशे तयार करेल. पण, त्यातील कोणता नकाशा ग्राहकाच्या स्वप्नातील घरासाठी योग्य आहे, हे ठरवण्यासाठी मानवी दृष्टीच लागेल. थोडक्यात, ‘एआय’ तुमची उत्पादकता वाढवेल. पण, अंतिम निर्णय तुमचाच असेल.
 
पायाभूत कौशल्यांचे पुनरुज्जीवन
 
जयंतराव : पण आदित्य, जर ‘एआय’ सगळं लिहून देतोय आणि हिशोब करून देतोय, तर मग मुलांनी शाळेत गणित किंवा भाषा शिकून काय फायदा?
 
आदित्य : आजोबा, तुमचा हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. उलट, ‘एआय’च्या युगात मूलभूत कौशल्यांचं ( Fundamental Skills ) महत्त्व कैकपटीने वाढलं आहे.
 
गणिती आणि तर्कशक्ती : ‘एआय’ हा पूर्णपणे गणितावर ( statistics आणि algorithms ) आधारित आहे. ज्याला गणितातील ‘तर्कशास्त्र’ समजते, त्यालाच ‘एआय’ नेमका कसा विचार करतोय आणि तो कुठे चुकू शकतो ( hallucination ) हे ओळखता येईल. ज्याचा गणिताचा पाया कच्चा आहे, तो ‘एआय’ने दिलेल्या चुकीच्या आकड्यांवरही आंधळेपणाने विश्वास ठेवेल, जे घातक ठरू शकते.
 
भाषा आणि संवाद कौशल्ये : ‘एआय’शी संवाद साधण्यासाठी ‘प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग’ लागते. ही एक कला आहे, जिथे तुम्हाला तुमची गरज नेमकी, स्पष्ट आणि संदर्भासहित मांडता आली पाहिजे. ज्याचे भाषेवर प्रभुत्व आहे, तोच ‘एआय’ला योग्य सूचना देऊन सर्वोत्तम काम करून घेऊ शकेल.
 
चिकित्सक विचारशक्ती : ‘एआय’ माहिती देऊ शकतो. पण ती माहिती सत्य आहे की, आभास? ती नैतिक आहे की, अनैतिक? हे तपासण्यासाठी मानवी मेंदूच्या चिकित्सक वृत्तीची गरज आहे.
 
‘एआय’मुळे निर्माण होणारी नवी क्षेत्रे आणि नोकर्‍या
 
जयंतराव : बरं, जुन्या नोकर्‍या बदलल्या, तरी नवीन नोकर्‍या कोणत्या येणार? त्याची काही उदाहरणे आहेत का?
 
आदित्य : नक्कीच आजोबा! ‘एआय’मुळे अशी अनेक क्षेत्रं तयार होत आहेत, जी दहा वर्षांपूर्वी अस्तित्वातही नव्हती. उदाहरणादाखल ही काही करिअर्स पाहा :
 
१. प्रॉम्प्ट इंजिनिअर : हे भविष्यातील सर्वात महत्त्वाचे करिअर असेल. ‘एआय मॉडेल्स’कडून अचूक निकाल मिळवण्यासाठी प्रश्नांची आणि सूचनांची रचना करणारे हे तज्ज्ञ असतील.
 
२. ‘एआय’ एथिस ऑफिसर : ‘एआय’ प्रणाली वापरताना कोणावर अन्याय होत नाहीये ना किंवा माहितीची गोपनीयता जपली जातेय का, हे पाहणारे अधिकारी.
 
३. डेटा युरेटर : ‘एआय’ला शिकवण्यासाठी कोणत्या प्रकारची माहिती द्यायची आणि ती किती दर्जेदार असावी, हे ठरवणारे तज्ज्ञ.
 
४. ‘एआय’ सोल्यूशन आर्किटेट : एखाद्या कंपनीची जुनी समस्या सोडवण्यासाठी कोणती ‘एआय’ साधने वापरावीत, याचा आराखडा बनवणारे सल्लागार.
 
५. अल्गोरिदम ऑडिटर : ‘एआय’चे अल्गोरिदम सुरक्षित आहेत का आणि ते कायदेशीर नियमांचे पालन करतात का, याची तपासणी करणारे ऑडिटर्स.
 
६. ‘एआय’-मानव सहकार्य प्रशिक्षक : कंपन्यांमध्ये माणसांना ‘एआय’सोबत कसे काम करायचे, याचे प्रशिक्षण देणारे लोक.
 
मानवी संवेदनांची वाढती किंमत
 
आदित्य : आजोबा, ‘एआय’ कितीही हुशार झाला तरी तो सहानुभूती आणि मानवी स्पर्श यांची जागा कधीच घेऊ शकणार नाही. डॉक्टर रिपोर्ट वाचायला ‘एआय’ वापरतील; पण रुग्णाला धीर द्यायला डॉक्टरच लागेल. शिक्षक माहिती द्यायला ‘एआय’ वापरतील; पण विद्यार्थ्याला आयुष्याचे धडे द्यायला शिक्षकच लागेल. त्यामुळे भविष्यात जिथे ‘मानवी संवाद’ केंद्रस्थानी आहे अशा नोकर्‍यांची किंमत आणि पगार वाढेल.
 
धोक्याची घंटा : बौद्धिक आळस
 
जयंतराव : पण, आदित्य, जर सगळं ‘एआय’नेच केलं, तर माणसाचा मेंदू गंजून नाही का जाणार?
 
आदित्य : हाच खरा धोका आहे आजोबा! याला आपण ‘बौद्धिक आळस’ म्हणू शकतो. जर मुलांनी स्वतःचं डोकं न वापरता फक्त ‘चॅटजीपीटी’वर अवलंबून राहून गृहपाठ केला, तर त्यांची विचार करण्याची क्षमता संपून जाईल. आपण ‘एआय’ला आपला ‘मदतनीस’ बनवावे, ‘मालक’ नाही. आपण कुर्‍हाड वापरून लाकूड तोडतो. पण, कुर्‍हाड चालवण्याची ताकद आपल्या हातातच असायला हवी. आपली मूळ कौशल्ये ( core skills ) टिकवून ठेवून ‘एआय’चा वापर करणे हाच सुवर्णमध्य आहे.
 
निष्कर्ष : भविष्यासाठी सज्ज व्हा!
 
गप्पांचा शेवट करताना जयंतरावांचा चेहरा आता निर्धास्त वाटत होता.
 
जयंतराव : म्हणजे थोडक्यात काय आदित्य, तर परिस्थिती बदलली आहे आणि आपल्यालाही बदलावं लागेल. ‘एआय’ हा तरुणांचा शत्रू नाही, तर तो त्यांना अधिक सक्षम करणारा एक शक्तिमान सोबती आहे. फक्त ही शक्ती वापरण्यासाठी आधी स्वतःची बुद्धी आणि पायाभूत कौशल्ये शाबूत ठेवायला हवीत.
 
आदित्य : नक्कीच आजोबा! भविष्यातील यशाचा मंत्र आहे - 'unlearn, learn and relearn'. म्हणजे जुन्या कालबाह्य गोष्टी विसरणं, नवीन शिकणं आणि पुन्हा-पुन्हा स्वतःला अपडेट करणं आणि पुढच्या वेळी आपण याच शक्तीचा एक काळा पैलू पाहणार आहोत- ‘डीपफेक आणि सायबर गुन्हे’. तंत्रज्ञान जितकं प्रगत, तितकंच ते धोकादायक कसं बनू शकतं, हे आपण पुढच्या चर्चेत पाहूया.
 
जयंतरावांनी समाधानाने मान डोलावली. लग्नात भेटलेल्या त्या धास्तावलेल्या मुलांना भेटून हे सर्व सांगण्याचे त्यांनी आता ठरवले होते.
 
 
- डॉ. कुलदीप देशपांडे