महानगरपालिका निवडणुकीचे मतदान अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले आहे. ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार असे वाटत असतानाच, त्यांनी मुंबईत अचानक सभा-संबोधन कमी करून पक्षांच्या शाखाभेटींवर भर दिलेला दिसतो. पण, ज्या कार्यकर्त्यांनी गेली अनेक वर्षे पक्षाचे काम करून शाखा वाढविल्या, त्या कार्यकर्त्यांना वार्यावर सोडून, त्यांची नाराजी ओढवून या शाखाभेटी घेणे ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. विशेषतः मनसेत ही नाराजी उफाळून आली. काही दिवसांपूर्वी संतोष धुरी यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करुन भाजपमध्ये प्रवेश केला. आता शुक्रवार, दि. ९ जानेवारी रोजी शिवडी विभाग अध्यक्ष संतोष नलावडे यांनीही मनसेला भलेमोठे पत्र लिहून पक्षाला राम राम ठोकला. पत्रात त्यांनी स्वतःचा ‘अभिमन्यू’ होऊ देणार नाही, असे म्हटले. यात ‘उबाठा’सोबत युती करून मनसेला जागावाटपात मिळालेला ‘ठेंगा’ हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे आणि तीच भावना घेऊन कार्यकर्ते पक्ष सोडत आहेत.
उबाठा पक्षातही कमी-अधिक पातळीवर हीच परिस्थिती. कारण, ज्यांनी दिवसाची रात्र करीत शाखा वाढवून अनेक वर्षे पक्षाचे निरपेक्षपणे काम केले, त्यांना या निवडणुकीत तिकीट न देता, आपल्या मर्जीतील लोकांना उबाठाने तिकीट दिले. म्हणूनच आठ वर्षे शाखाप्रमुख आणि पक्षाचे तब्बल ३६ वर्षे काम करणारे विजय इंदुलकर यांसारखे प्रामाणिक लोक अपक्ष लढत आहेत. त्यांना ‘फायर आजी’सारख्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांची मिळालेली साथ आणि तब्बल १२६ पदाधिकार्यांनी दिलेले राजीनामे यावरून हे स्पष्ट होते की, शाखा वाढवणारे कार्यकर्ते दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीत कुठेतरी बाजूला फेकले गेले. यात पुन्हा पक्षातील प्रस्थापितच आपली जागा शाबूत ठेवून कार्यकर्त्यांवर अन्याय करताना दिसतात. तिकीटवाटपाच्या वेळी शाखाप्रमुख आणि सामान्य कार्यकर्त्याला विचारात घेऊन निर्णय घेतले असते, तर ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षात एवढी उघड नाराजी उफाळून आली नसती. कोळीबांधव असो की, शिवडीमधील कार्यकर्ता मराठी माणसासाठी काम करणारा मूळ कार्यकर्ताच या युतीत बाहेर फेकला गेला. त्यामुळे शाखाभेट घेऊन फारसे काय साध्य होईल, असे दिसत नाही.
पवारांना जाब विचारणार का?
निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची अथवा आता तर महानगरपालिकेची, देशातील विरोधकांना अदानी आणि अंबानींवरुन सत्ताधार्यांवर शरसंधान साधल्याशिवाय जणू चैनच पडत नाही. पण, महाविकास आघाडीतील एक घटक असलेल्या शरद पवार यांनी मात्र आपली भूमिका याबाबत वेगळी असल्याचे वारंवार प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली. कारण, डिसेंबर महिन्यातच बारामती येथे ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एसेलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या इमारतीचे उद्घाटन गौतम अदानी यांच्या हस्ते झाले होते. "देशातील २३ राज्यांत ‘अदानी ग्रुप’चा व्यवसाय असून, लाखो हातांना त्यांनी काम दिले आहे," असे गौरवोद्गारही त्यावेळी शरद पवारांनी काढले. यावेळी शरद पवार, अजित पवार यांसह संपूर्ण पवार कुटुंबीय जातीने हजर होते. शरद पवारांनी गौतम अदानी पती-पत्नींसाठी स्नेहभोजनाचे देखील आयोजन पण केले होते; तर अदानी जातानाच्या गाडीचे सारथ्य रोहित पवार करीत होते. यावेळी रोहित पवार यांच्या बाजूला अजित पवार बसले होते.
शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेत गौतम अदानींचा उल्लेख ‘एक कष्टाळू, मेहनती आणि शून्यातून विश्व उभे करणारा उद्योजक’ म्हणून केला आहे, ज्यात मुंबईच्या लोकलमध्ये वस्तू विकण्यापासून ते मोठा उद्योगसम्राट बनण्यापर्यंतचा प्रवास समाविष्ट आहे, असाही उल्लेख आहे. आता आत्मकथन असल्याने नक्कीच हा उल्लेख अंतरात्म्यातून आला असणार. मात्र, शरद पवार सहयोगी असलेल्या महाविकास आघाडीतील घटकपक्ष मग उबाठाचे उद्धव ठाकरे असोत किंवा काँग्रेसचे राहुल गांधी किंवा आता मुंबईतील ठाकरे युतीतील राज ठाकरे हे निवडणुका आल्या की, त्यांच्या राजकीयकथेत मात्र सातत्याने अदानी यांच्यावर टीका करीत असतात. मध्यंतरी खासदार सुप्रिया सुळे यांनीही एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार आणि अदानी यांचे कौटुंबिक संबंध ३० वर्षे जुने आहेत, अदानी मला मोठ्या भावासारखे आहेत, असे सांगितले होते. म्हणजेच पवारांना अदानींची कोणतीही अडचण नाही. उलट त्यांच्या सहकार्याने विकास करण्याला प्राधान्य देताना दिसतात. मग ठाकरे बंधू आता पवारांना अदानींच्या भेटीगाठीवरुन जाब विचारणार का?
- अभिनंदन परूळेकर