भारतीय संस्कृतीची परदेशवारी

    10-Jan-2026
Total Views |
Dr. Lalita Namjoshi
 
भारतीय संस्कृतीचा प्रवास परधर्मीयांपुढे अधिकारवाणीने मांडत, आपली संस्कृती परदेशातही पोहोचवणार्‍या संस्कृतीजोपासक आणि संस्कृतअभ्यासक डॉ. ललिता नामजोशी यांच्याविषयी...
 
संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे. ती पुरातन भाषा असल्याने, ‘वेद’, ‘वेदांत’, ‘भगवद्गीता’ अशा बहुतेक ग्रंथांची रचना संस्कृतमध्येच झाली. आपल्या संस्कृतीची मुळे संस्कृतमध्येच सापडत असल्यामुळे, ‘संस्कृतं संस्कृतेर्मूलम्’ असे म्हटले जाते. संस्कृत ग्रंथांच्या माध्यमातून हीच आपली संस्कृती समजून घेत, देशाच्या सीमा लंघून, परकीयांनादेखील ती समजावून सांगण्याचे महत्कार्य केले ते डॉ. ललिता नामजोशी यांनी.
 
ललिता यांचे बालपण सांगलीसारख्या छोट्या शहरात गेले. पण, आईवडील उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांनी आपल्या चारही मुलांना मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्रे, मासिके वाचायची सवय लावली. त्यामुळेच ललिता यांना वाचनाची गोडी लागली. त्यांना शालान्त परीक्षेतही उत्तम गुण मिळाले. पुढे हुशार मुलांनी विज्ञान शाखेतूनच शिक्षण घ्यावे, हा प्रघात मोडून काढत त्यांनी कला शाखेत प्रवेशही घेतला. परंतु, लहानपणापासून असलेली गणिताची आवड त्यांनी जपली. तेव्हाच्या शिक्षणपद्धतीनुसार, त्या पाच विषय कला शाखेचे आणि विज्ञान शाखेतील गणित हा विषय, अधिकचा वेळ थांबून शिकत. परंतु, पुढे प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना ते अशक्य झाल्याने, त्यांनी अधिक वेळ न थांबता शिकता येणारा एखादा विषय म्हणून ‘संस्कृत’ची निवड केली.
शाळेमध्ये ललिता यांचा संस्कृतचा अभ्यास झाला होताच. अंगीभूत असलेल्या हुशारीमुळे, ललिता यांनी ‘बीए-संस्कृत’मध्येही प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे ललिता यांना महाविद्यालयाकडून काही शिष्यवृत्ती आणि अभ्यासासाठी विशेष सहकार्य देखील मिळाले. त्यानंतर ललिता यांनी ‘वेदांत’ या विषयामध्ये ‘एमए’देखील केले. याच काळात त्यांचे लग्न ठरले. मात्र, परीक्षा पुढे गेल्यामुळे विवाह आणि परीक्षा दोन्ही एकाच आठवड्यात आले. तरीही, ललिता ध्येयापासून यांनी किंचितही विचलित न होता, विद्यापीठातून पहिला क्रमांक मिळवला.
 
ललिता विवाहानंतर डोंबिवलीत राहू लागल्या. मुंबईत नवख्या असल्याने, त्या कोणाला ओळखतही नव्हत्या. तरीही हुशार असल्याने, त्यांच्या महाविद्यालयातील शिक्षकांच्या ओळखीने मुंबई विद्यापीठात ‘पीएचडी’ करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यावेळच्या नियमानुसार, त्यांना ‘एमए’च्या गुणांच्या आधारावर ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप’ देखील मिळाली. १९८०मध्ये ललिता यांनी ‘भगवद्गीता आणि बादरायणांची ब्रह्मसूत्रे यांचा आंतरसंबंध’ हा विषय मांडत, ‘पीएचडी’ पूर्ण केली. खरे तर, ललिता यांनी नेमका हाच विषय ‘एमए’च्या वेळी ‘ऑप्शन’ला टाकला होता! तसेच, त्या काळी प्रबंध हा फक्त इंग्रजीत सादर करावा लागेे. ललिता यांना लहानपणापासूनच इंग्रजी वाचनाची सवय असली, तरी मुंबई विद्यापीठातील त्यांचे मार्गदर्शक डॉ. टी. जी. माईणकर या ज्येष्ठ मान्यवर विद्वानांच्या मार्गदर्शनामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणवला.
 
डॉ. ललिता यांना अध्यापन करण्यात रस होता, पण संस्कृत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने कुठेही संधी मिळत नव्हती. नंतर तब्बल १५ वर्षांनी त्यांना, मुंबईतील सोमय्या विद्यापीठात नव्याने चालू झालेल्या ‘भारतीय संस्कृतिपीठम्’मध्ये, कला आचार्य यांच्यासह साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेथे त्या ‘वेदान्ता’शिवाय संस्कृतच्या अन्य शाखाही शिकवत असल्यामुळे, त्यांचे स्वतःचेही ज्ञानवर्धन झाले. आजमितीला त्यांचे ४० पेक्षा अधिक शोधनिबंधही प्रसिद्ध झाले आहेत. याच काळात ललिता यांनी, अभ्यासक्रम निर्मितीचे कसबही आत्मसात केले. त्यांचे अध्यापनकौशल्य पाहून, त्यांना नागपूरच्या ‘कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालया’त योगशास्त्राच्या अध्यापनासाठी आमंत्रित केले गेले. त्याच विद्यापीठाने त्यांना पुढे ‘पीएचडी गाईड’ म्हणूनही मान्यता दिली. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातही ‘पीएचडी गाईड’ म्हणून काम केले.
 
‘भारतीय संस्कृतिपीठम्’मधील सहकारी असलेल्या एका ख्रिश्चन फादरच्या सहकार्याने, ‘हिंदू-ख्रिश्चन आंतरधर्मीय सुसंवाद परिषदे’च्या व्यवस्थापक समुहामध्येदेखील त्यांनी काम केले. त्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व या सगळ्यात विशेष बाब ठरली. या जोरावरच त्या कझाकस्तान, व्हॅटिकन सिटी, इटली, फिलीपिन्स अशा ठिकाणी जाऊन, परकीयांनाही भारतीय संस्कृतीबद्दल साधार माहिती देत. आजही विशेषतः ‘वेदान्ता’तून ज्ञात झालेले हिंदुत्व, जगभरातील परधर्मीयांपुढे त्या अधिकारवाणीने मांडतात. त्या परिषदांचे वर्णन करणारी पुस्तकेही त्यांनी संपादित केली आहेत.
 
ललिता यांच्या कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे ‘संस्कृत साधना पुरस्कार’, ‘कविकुलगुरू कालिदास पुरस्कार’, ‘विश्वदर्शन योगकेन्द्रा’चा ‘योगधर्मी पुरस्कार’ आणि ‘कै. सौ. जयंती वासुदेव विश्वस्त निधी, सांगली’ यांच्याकडून संस्कृत भाषासंवर्धन आणि संशोधनासाठी दिला जाणारा ‘पुरुषोत्तम पुरस्कार’ अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यातही आले. डॉ. ललिता या सध्या विविध विद्यापीठांत ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करतात. संस्कृतच्या माध्यमातून आकलन झालेला भारतीय संस्कृतीचा प्रवास त्या उलगडून दाखवत असल्यामुळे, ठिकठिकाणाहून व्याख्यानांसाठीही त्यांना आमंत्रित केले जाते. तसेच ‘विवेकानंद केंद्रा’साठीही काही त्या, काही पुस्तकांचे इंग्रजीतून मराठीत भाषांतर करीत आहेत. आपल्या साहित्य आणि वाणीच्या जोरावर, भारतीय संस्कृती परदेशांपर्यंत घेऊन जाणार्‍या डॉ. ललिता नामजोशी यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या खूप खूप शुभेच्छा!
 
 - ओवी लेले