मराठी हा शिवसेनेचा प्रमुख मुद्दा होता. पण, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपशी फारकत घेतल्यावर ठाकरे हे ना हिंदुत्ववादी राहिले, ना मराठी अभिमानी! मराठी जनतेसाठी त्यांनी काहीही केले नाही. ‘उर्दू भवन’ बांधले; पण ‘वारकरी भवन’ बांधण्याचे त्यांना सुचले नाही, ना मराठी माणसाला मुंबईत घरे दिली. याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण मात्र केले. हे यांचे फसवे हिंदुत्व! त्यामुळे अशा बाटग्यांनी फडणवीसांना ते हिंदू आहेत का, असा प्रश्नच उपस्थित करणे मुळी हास्यास्पद!
मोटारचालकाला रस्ता चुकल्याचे लगेच लक्षात आले नाही, तर तो अनेक मैल चुकीच्या दिशेने जात राहतो. पण, आपण रस्ता चुकल्याचे त्याच्या लक्षात येते, तोपर्यंत तो आपल्या लक्ष्यापासून बराच दूर गेलेला असतो. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा दुसरा भाग पाहताना हीच गोष्ट प्रकर्षाने जाणवली. या बंधूंच्या वक्तव्याचा सगळा रोखच चुकीच्या दिशेने वळविला गेला. तो भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उरलेल्या वेळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वजण महाराष्ट्राला कसे लुटत आहेत, त्याची पोकळ आणि पूर्णपणे बिनबुडाची वर्णने करण्यावरच बेतलेला. आपण मुंबईचा कोणता आणि कसा विकास केला, भविष्यात काय योजना-प्रकल्प आहेत यावर एक शब्दही या दीड-दोन तासांच्या मुलाखतीत या दोन्ही नेत्यांकडून निघालेला नाही. महापालिका निवडणुकीशी संबंधित नसलेल्या विषयांवरही मध्येच ही मुलाखत भरकटत जाते. इतकेच नव्हे, तर त्यांचे काही-काही तर्क ऐकताना लहान मुलेही अधिक बुद्धिमान असतील, असे वाटते. अर्थात, मूळ संस्कृती!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर हा मराठी माणूस आणि हिंदूच असेल, हे खणखणीतपणे स्पष्ट केल्यावर ठाकरे यांच्या मनातील कुटिल हेतू मुंबईकरांपुढे उघड झाला. त्यामुळे यावर बचावात्मक पवित्रा घेताना उद्धव ठाकरे यांनी “मराठी हा हिंदू नसतो का, फडणवीस हे हिंदू आहेत का,” असा भलताच फाटा फोडला. ‘मराठी’ आणि ‘हिंदू’ हा फरक कोण करीत आहे? राज्यातील मुसलमान हे मराठी भाषा बोलतात, असाही बचाव ठाकरेंनीच केला. पण, वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी. त्यांना राज्यातील बहुसंख्य मुस्लीम हे मराठी नव्हे, तर हिंदीत बोलतात हे ठाऊक नसेल. म्हणूनच, ठाकरे यांनी मुंबईत महापालिकेच्या उर्दू शाळाही सुरू केल्या. उलट, तामिळनाडू, प. बंगाल, केरळ, गुजरात या राज्यांतील मुस्लीम हे त्या त्या राज्याची भाषा बोलतात. पण, महाराष्ट्रातील जवळपास सर्वच मुस्लीम - मग ते मुंबईत असोत की, छत्रपती संभाजीनगरमध्ये असोत, हे मराठी बोलत नाहीत.
‘एआयएमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील हे नेहमीच हिंदीतून भाषणे करतात. ठाकरे हे या मुस्लिमांना मराठीत बोलण्यास भाग पाडू शकत नाहीत. पण, मुस्लीम व्यक्तीला महापौर करायचे त्यांचे स्वप्न फडणवीस यांच्या घोषणेमुळे उद्ध्वस्त झाले.
ठाकरे यांना निष्कारण बुद्धिभेद करायचा आहे. पण, मराठी माणूस त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक सुज्ञ आणि हुशार आहे. फडणवीस हिंदू आणि हिंदुत्ववादी आहेत का? असा बाष्कळ प्रश्न ठाकरे यांनी या मुलाखतीत उपस्थित केला. पण, त्याआधी उद्धव ठाकरे हे किती हिंदुत्ववादी आहेत, ते तपासले पाहिजे. दगाबाजी करून मुख्यमंत्रिपद हडपल्यावर ते सेक्युलरांच्या कळपात सामील झाले आणि त्यांना आपण अधिक सेक्युलर आहोत, हे सिद्ध करण्याची गरज भासू लागली. कारण, ‘बाटगा अधिकच जोरात बांग देतो’ अशी मराठीत एक म्हण. त्यामुळे ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या नजरेसमोर पालघरमध्ये तीन साधूंचे हत्याकांड झाले. त्यावर त्यांच्या सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. इतकेच नव्हे, तर मुंबईत बॉम्बस्फोट घडविणाऱ्या याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण त्यांच्या सरकारच्या काळात झाले. त्यांच्या पक्षाने राज्यात ‘अझान’ स्पर्धा भरविल्या आणि ‘उर्दू भवना’ची निर्मिती केली. स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्या उद्धवना राज्यात ‘वारकरी भवन’ उभारावे असे वाटले नाही. ज्यांनी आपल्या पित्याचे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव ‘जनाब बालासाहेब ठाकरे’ असे लिहिल्यावरही आक्षेप घेतला नाही, त्यांनी हिंदुत्वावर न बोललेलेच चांगले!
केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटी जन्माला आल्याने उद्धवराव तुम्ही हिंदुत्ववादी ठरत नाहीत. त्यासाठी हिंदूंच्या हिताची कामे करावी लागतात आणि हिंदू आंदोलनांमध्ये सहभागी व्हावे लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाबरी ढाँचा पाडला तेव्हा अयोध्येला देखील गेले होते. 18 दिवस तुरुंगवासही त्यांनी भोगला. पण, तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते? फडणवीस यांनी राज्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास केला. तीर्थक्षेत्रांना जोडणारा नवा ‘शक्तिपीठ कॉरिडॉर’ हा महामार्गही येत्या काळात उभारला जाईल. त्यांनी कुंभमेळ्याला निधी दिला आणि अयोध्येच्या राम मंदिरालाही भेट देऊन प्रभू रामललांचे दर्शन घेतले. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उद्धव ठाकरे घेतात, त्या छत्रपतींच्या गड-किल्ल्यांवरील अनधिकृत इस्लामी आक्रमणे फडणवीस यांनी मोडून काढण्यास सुरुवात केली आहे. प्रतापगडावरील अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर फडणवीस यांनी आपल्या मुलीवरही हिंदुत्वाचे संस्कार केलेले दिसतात. त्यांची मुलगी रोज कृष्णभक्ती केल्याशिवाय झोपत नाही. मात्र, आदित्य ठाकरे यांना मुंबईच्या ‘नाईट लाईफ’ची चिंता लागलेली असते.
मोदी सत्तेवर आल्यावर त्यांनी महाराष्ट्राला विकासात मागे ढकलले आणि गुजरातला देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुलाखतकार संजय राऊत यांनी केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली त्याचा सूड हे दोन गुजराती (मोदी-शाह) आता मुंबईची लूट करून घेत आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीला पैशाच्या थैल्या घेऊन जातात वगैरे भरपूर बडबड संजय राऊत यांनीही करून आपल्या स्वामीनिष्ठेचे प्रदर्शन केले. मोदी यांनीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, हे मात्र ते विसरले.
दुसरीकडे राज ठाकरे यांनीही नेहमीप्रमाणे काहीतरी असंबद्ध आणि निरर्थक बडबड मुलाखतीत केली. यापूर्वीच्या काँग्रेसच्या पंतप्रधानांवर कोणत्याही राज्याचे लेबल नव्हते. पण, ‘मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांच्यावर गुजरातचे लेबल लागले आहे,’ असे ते म्हणाले. या भंपक विधानाचा अर्थ काय, ते तेच जाणोत. पण, जणू एखाद्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री असल्यावर त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारणे हे कमीपणाचे आहे, असे काहीतरी त्यांना म्हणायचे आहे का? अगम्य बडबड करण्याचा राहुल गांधींचा ‘वाण’ राज यांनाही लागला असावा. महेश मांजरेकर यांनी नेहमीप्रमाणे भलत्याच विषयाकडे मोटार वळविली. मुंबईत मोटारगाड्यांची संख्या फार अधिक झाली आहे, असे ते म्हणाल्यावर राज ठाकरे यांनी या मोटारींच्या नोंदणीवर नियंत्रण आणले जावे, असे सुचविले. आपल्या स्वत:कडे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे किती मोटारी आहेत, ते राज ठाकरे यांनी सांगितले असते, तर बरे झाले असते.
एकंदरीत, मुंबईच्या विकासाच्या योजनांवर बोलण्याऐवजी भाजप आणि मोदी-फडणवीस यांच्याविषयी असलेली असूया व्यक्त करणे, हाच या मुलाखतीचा उद्देश होता. तेव्हा, ठाकरे बंधूंकडे मुंबईकरांना देण्यासारखे यापूवही कधी काही नव्हते आणि आताही नाही, हेच या मुलाखतींचे तात्पर्य!