" ‘केडीएमसी’च्या निवडणुकीत प्रगती, विकास आणि सुरक्षा या मुद्द्यावर विशेष भर दिला आहे. तसेच सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पक्षाने आमच्यावर जो विश्वास दाखविला आहे, तो सार्थ ठरवणार आहोत,” असा निर्धार भाजपच्या पॅनेल क्रमांक २९ मधील अधिकृत उमेदवार अॅड. कविता मिलिंद म्हात्रे, आर्या ओमनाथ नाटेकर, अॅड. मंदार टावरे आणि अलका पप्पू म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्याशी या निवडणुकीनिमित्त केलेली ही खास बातचीत...
आपण निवडणुकीला पहिल्यांदाच सामोरे जात आहात. तेव्हा एकूणच प्रचारादरम्यानचा अनुभव कसा आहे?
अॅड. कविता म्हात्रे : राजकारण हे माझ्यासाठी खूप नवीन क्षेत्र आहे, पण ओळखीचं आहे. हा प्रभाग बाहेरून पाहिल्यास विकसित भाग आहे, असे दिसते. पण, आतमध्ये आल्यावर येथील समस्या जाणवतात. लोक आमच्याकडे एक बदल म्हणून पाहात आहेत. नागरिकांच्या मनात नगरसेवक म्हणून एका सुशिक्षित उमेदवाराची प्रतिमा आहे आणि तशी संधी भाजपने आम्हाला दिली आहे.
निवडणुकीचा प्रचार अगदी दारोदारी सुरु आहे. तुम्ही पहिल्यादांच निवडणूक लढवत आहात. काय अनुभव आहे?
आर्या नाटेकर : माझे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झाले आहे. माझ्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम सुरू आहे. त्यातच सुनीलनगर, आयरेगाव आणि तुकारामनगर या प्रभागांतून निवडणूक लढण्याची संधी चालून आली. त्यामुळे आजपर्यंत पती ओमनाथ यांना केवळ समाजकार्यात मदत करत होते. पण, निवडणूक लढण्यासाठी आलेल्या संधीचे सोने करायचे ठरविले आणि मग निवडणूक लढण्याचा विचार पक्का झाला. आता निवडणुकीला पहिल्यांदा सामोरे जात आहे. लोकांना सुशिक्षित उमेदवार हवा आहे. ‘डोअर-टू-डोअर’ प्रचार करताना नागरिक प्रेमाने स्वागत करीत आहेत. हे पाहून खूप चांगले वाटते.
भाजप आणि शिवसेना (शिंदे) हे दोन्ही पक्ष केडीएमसीची निवडणूक युतीमध्ये लढवित आहेत. पण, तुमच्या पॅनेल क्रमांक २९ मध्ये शिवसेनेचे(शिंदे) उमेदवारही उभे ठाकले आहेत; तर त्याविषयी काय सांगाल?
अॅड. मंदार टावरे : या प्रभागात मैत्रीपूर्ण लढत आहे, असे म्हणता येणार नाही. मैत्री कधी असते? जेव्हा दोन पक्षातून निष्ठावंत कार्यकर्ते उभे असतात आणि पक्षाची विचारधारा घेऊन पुढे जात असतात. निष्ठा आणि मैत्री यांचा येथे काही संबंध नाही. दर निवडणुकीत एखादी व्यक्ती पक्ष बदलत असेल, तर त्यांचा निष्ठेशी काही संबंध नसतो. एखाद्या पक्षात जाऊन तीन तिकिटांची मागणी करणे, याला काही निष्ठा म्हणत नाहीत. आम्ही उमेदवारी अर्ज भरायला गेलो, तेव्हा शिवसेनेचे चार उमेदवार त्याठिकाणी अधिकृतरित्या अर्ज भरण्यासाठी आले होते. त्यावेळी आम्ही जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधला. उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितले. तेव्हा दोन दिवस फोन बंद ठेवला होता. आता तर त्यांच्या घरातच भांडणे होत आहेत. एकमेकांच्या विरोधात मते मागत आहेत. ही बाब त्या एकमेकांना समजली आहे. त्यामुळे त्यांचा एकत्रित प्रचार होत नाही. भाजपला लोकांनी खूप चांगल्या प्रकारे स्वीकारले आहे. हे चित्र पाहता, त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून मतदानापूर्वीच माघार घेतली आहे.
मी हे देखील सांगू इच्छितो की, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी युती धर्म पाळण्याचा प्रयत्न केला; तरी जमिनी स्तरावर ज्यांचा निष्ठेशी, पक्षाशी, पक्षाच्या विचारधारेशी संबंध नाही, असे कार्यकर्ते भरले तर असेच होणार. सर्व पक्ष फिरून आलेल्या लोकांना शिवसेनेत थारा दिल्याने शिवसेनेला त्यांचा फटका पडत आहे.
या प्रभागात तुम्ही दोनदा नगरसेवकपद भूषविले आहे. तेव्हा, या काळात केलेल्या कामांविषयी काय सांगाल?
अलका म्हात्रे : या प्रभागातील रस्त्यांची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. पाण्याची सोयदेखील चांगली आहे. विजेचीही कोणतीही कामे शिल्लक राहिलेली नाहीत. विकास हे ‘व्हिजन’ घेऊन काम करत असल्याने नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्यात आम्हाला यश आले आहे.
तुमच्या प्रभागात नेमक्या कोणत्या समस्या आहेत आणि त्या तुम्ही कशा प्रकारे सोडवणार आहात?
आर्या नाटेकर : तुकाराम नगर विभागात रस्त्यांचे रुंदीकरण केलेले नाही. नागरिकांना रस्त्यावर चालायलाही जागा नाही. फेरीवाल्यांनी रस्ते व्यापले आहेत. शिवाय वाहतुककोंडीचीही समस्या मोठी आहे. अस्वच्छ गटारांमुळेही नागरिकांना त्रास होतो. तसेच अनधिकृत बांधकामांनी प्रभागाला विळखा घातलेला आहे. पावसाळ्यातही ठिकठिकाणी पाणी साचते. विजेच्या देखील समस्या आहेत. त्यामुळे सुनीलनगर आणि आयरेनगर हे दोन्ही ‘रोल मॉडेल’ समोर ठेवून तुकारामनगरमध्ये काम आम्हाला करावे लागेल. नियोजन करून या प्रभागात चांगल्या प्रकारे विकास करता येईल.
तुम्ही राजकारणाकडे कसे वळलात?
आर्या नाटेकर : माझ्यासाठी राजकारण हे क्षेत्र नवीन आहे. आजकाल महिला सर्वच क्षेत्रांत भरारी घेत आहेत. महिलांनीही राजकारणातही आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. माझे पती गेली अनेक वर्षे सामाजिक काम करत आहे. या प्रभागासाठी महिला आरक्षण जाहीर झाले. त्यावेळी माझ्या पतींनीच मला निवडणुकीला उभी राहशील का, अशी विचारणा केली. त्याआधी एकीकडे समाजकारण आणि दुसरीकडे नोकरी असं माझं सुरू होतं. त्यामुळे मला असं वाटतं की, एका सर्वसामान्य व्यक्तीला प्रभागाचे नेतृत्व करायची संधी मिळत असेल, तर तिने ती स्वीकारली पाहिजे. केवळ ‘ही’ कामे होत नाही, अशी टीका न करता, आपणही त्या क्षेत्रात उतरून जमिनी स्तरावर काम केलं पाहिजे, असे वाटले आणि म्हणूनच मी राजकारणात प्रवेश केला.
काही ठिकाणी विरोधकांकडून उमेदवारांमध्येच एकमेकांविरुद्ध प्रचार सुरु असल्याचेही निदर्शनास आले आहे. तेव्हा, या सगळ्याचा भाजपला कितपत फायदा होईल, असे वाटते?
अॅड. मंदार टावरे : एकाच घरात तीन-तीनजणांना तिकीटं दिली आहेत. त्याऐवजी साध्या कार्यकर्त्याला संधी द्यायला हवी होती. पण, तसे झाले नाही. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये घराणेशाही गाडून टाकली, तशी आता कल्याण-डोंबिवलीही घराणेशाही गाडून टाकेल. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सुशिक्षित आणि दोनदा नगरसेवक राहिलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे. भाजपसाठी शहरात खूप चांगले वातावरण आहे.
आपण सर्व उमेदवार मतदारांना काय आवाहन कराल?
आम्ही मतदारांना हेच सांगू इच्छितो की, आता आमिषे दाखवायला खूप लोक येतील. पण, कोणत्याही आमिषाला बळी न पडता, विचार करून आपला नगरसेवक निवडा. आम्ही पॅनेल क्रमांक २९ मधून निवडणुकीला सामोरे जात आहोत; तर चारही उमेदवारांसमोरील ‘कमळा’चे बटण दाबून भाजपला मोठ्या संख्येने विजयी करा!