मृत्यूचे रहस्य भाग - ६०

    01-Jan-2026
Total Views |

जन्म आणि मृत्यू ही व्यक्त जीवनाची दोन टोके होत. दोन्हीपलीकडील अव्यक्त प्रदेश दिव्य असतो, पण अव्यक्तातील अज्ञानाामुळे त्याचे दिव्यत्व कळत नाही. ही दोन्ही भिन्न टोके वर्तुळातील दोन टोकांप्रमाणे एकत्र आणली, तर जीवनाचे वर्तुळ सतत चालू राहून त्यात अगम्य, अव्यक्त असे काहीच राहणार नाही. सर्व जीवन ज्ञानमय बनेल, व्यक्ती पूर्ण बनेल, सुंदर बनेल, परमेश्वर बनेल. उपनिषद्‌‍ सांगते,

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते|
पूर्णस्यपूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते|
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
वेद आणि पुराणातील जन्मशास्त्र


वेदात जन्माविषयी भरपूर ऋचा आहेत, त्यांपैकी एक पाहा. गर्भात सन्निद्ध झालेला जीवात्मा आत्मरुप परमेश्वराला, त्याचे मूलज्ञान होण्याकरिता प्रार्थना करतो.

न विजामामि यदि वेदमस्मि निम्नः सन्नद्धो मनसाचरामि|
यदा मागन्‌‍ प्रथमजा ऋतया दिद वाचो अश्नुवे भागमस्याः| (ऋग्वेद 1|164|33)

आशय असा, मी कोण आहे, कोठून आलो इत्यादी प्रथम ज्ञान मी आता जाणत नाही. मनाने सन्निद्ध झाल्याकारणाने मी अनेक योनींद्वारे सदा फिरत आहे. माझ्या वाचारूप अवस्थेचा सुयोग्य भाग बनण्याकरिता मला, प्रथम स्वरूपातून जन्माला आलेल्या ऋताची माहिती व ज्ञान प्राप्त करून द्या. तेव्हा कोठे मी स्वतःला समजू शकेन. सर्व विश्वोत्पत्तीची मूळ अवस्था ऋत आहे; त्या ऋत अवस्थेला जाणणारा तो ऋषी होय. वेद सांगतात, ‌‘ऋतं च सत्यं चाभिद्धात्तपसोऽद्धजायत‌’ वरील ऋचेचा संपूर्ण आशय अधिक स्पष्ट करण्याकरिता एक स्वतंत्र ग्रंथच लिहावा लागेल, इतके त्यात ज्ञानविज्ञान आहे. आईनस्टाईनने सापेक्षतावादाचा आपला प्रबंध केवळ चार पानांतच दिला होता, पण त्याच्या स्पष्टीकरणाकरिता जगात विविध भाषांत अनेक पुस्तके लिहिली गेली. मात्र, त्यातील सत्य जाणणारे जाणकार जगात बोटावर मोजण्याइतकेच आहेत. वेद ऋचांचेही तसेच आहे. यजुर्वेदात विवरण आले आहे,

अप्स्वग्ने साधिष्टव सौषधीरनु रुध्यसे गर्भे सन्‌‍ जायसे पुनः॥12॥
याचा आशय असा की, आत्मतत्त्वाद्वारे जीवात्म्याची मूळ उत्पत्ती होते. जीवात्मा औषधी आपतत्त्व व अग्नितत्त्वद्वारे गर्भात पुनः प्रवेश करतो. ही औषधी खाऊनच पित्यामध्ये पितृबीज तयार होते. ते पितृबीज मातृउदरात स्थित होते. या ठिकाणी आप म्हणजे पर्जन्य नसून आपतत्त्व आहे, हे पृथिवी तत्त्वाच्या वर आहे. त्यावर तेजस तत्त्व आहे. देहाची उत्पत्ती अग्नितत्त्वाद्वारे आपतत्त्वात व आपतत्त्वाद्वारे पृथ्वीतत्त्वात होते. गीतेत स्पष्टच सांगितले आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातन| पितृउदरात शरीरबीज उत्पन्न होते व त्याची वाढ व जोपासना मातृ उदरात होते. जीवात्मा या सर्वांवरील परमेश्वरस्वरूप चेतन अवस्था आहे. जीवात्मा व शरीर दोन्ही घटनांद्वारे जन्म घटना होते. भागवतात स्कंद 3 अध्याय 31 मधील लोक 12 ते 31 पर्यंत कपिल महामुनी आपली माता देवहुतीला जन्माचे रहस्य सांगतात. ते म्हणतात,

तं जीवकर्म पद्धिम्‌‍ अनुवर्तमानाः तापत्रयोपशमनाय वयं भजेत्‌|
आरम्य सप्तमान्‌‍ मासात्‌‍ लब्ध बोधऽपि वेपितः| नैकभास्तेसूतिवातैः ष्ठिभुखि सोदरः॥

सातव्या महिन्यानंतर जीवात्मा जीवकर्म पदवीला योग्य असा होतो आणि सात महिन्यानंतर जीवात्मा स्वतःला जाणू शकतो. उपनिषद सांगतात, ‌‘आकाशात्‌‍ वायुः वायोरग्निः अग्ने आपः अदभः पृथिविः पृथिव्या ओषधीभ्यो अत्रः अन्नात्‌‍ पुरुषः‌’. या ठिकाणी पुरुषाचा अर्थ जडशरीर घेतल्यास वचनाचा योग्य अर्थ ध्यानात येईल. आत्म्याला अन्नाची आवश्यकता नसते. अन्नाची आवश्यकता जडशरीराला असते. म्हणून ‌‘अन्नात्‌‍ पुरुष‌’चा अर्थ अन्नापासूनच शरीर उत्पन्न होते असा धरल्यास ,वरील वचनाचा अर्थ योग्य असा लागेल. भगवंताचा अंश जीवात्मा सनातन असल्याने, तो सर्गासह उत्पन्न होतो. शेवटी तो परमात्म्यातच विलीन होतो. भगवंताच्या अंशाला औषधी वनस्पतीची आवश्यकता नसते. यामुळेच पुरीचे बाबाजी, म्हणजे भगवंताचा एक महान अंश, केवळ दोन महिन्यांनी कोलकात्यातील बेहालास्थित हरिमोहन यांच्या घरी जन्माला जाऊ शकले. म्हणून गर्भधारणेच्या प्रथम दिवशी नाही, तर गर्भाच्या सातव्या महिन्यापासून आपला जन्म होतो, ही गोष्ट सत्य वाटते.

पुनर्जन्माची व्यावहारिकता :

अग्नीला आम्ही मानले नाही, तरी स्पर्श करताच अग्नी दाहकपणा दाखवतोच. तद्वत्‌‍ जन्मपुनर्जन्म आम्ही नाकारला, तरी ते बुद्धीला धरून होणार नाही. असल्या अशास्त्रीय विचारांनी आम्ही आमचेच जीवन अर्थशून्य बनवू एवढेच. पुनर्जन्माची सत्य अवस्था मानण्याने व्यक्ती बेछूट, क्रूर, अत्याचारी न बनता, जन्मजन्मांतरीच्या हिशोब ठेवून वागणारी बनते. असला जन्मजन्मांतरीचा हिशेब ठेवणारी व्यक्ती परदुःख जाणून सहिष्णू होईल, व्यक्तींचा व्यवहार प्रेममय होईल. प्रेमाच्या व्यवहारात पंथ वा अशास्त्रीय कल्पनांना मुळीच स्थान राहणार नाही. जीवनातील सारे व्यवहार जीवाला सुसंस्कृत करुन, पुढील जन्मीच्या उच्च सुसंस्कृत उत्क्रांत जीवनाकरिता राहतील. केवळ ‌‘उदरभरण‌’ हे ध्येय अशा जीवांचे राहणार नाही.

पुनर्जन्माचा सिद्धांत मानण्याने जीवनाला एक शिस्त लागते, जीवनाला विशिष्ट अर्थ येतो, त्यामुळे व्यक्तीही सुसंस्कृत होते. अन्यथा शरीरच सर्वस्व मानल्यास, शरीर जे जे मागेल त्याचीच पूत करण्याकडे व्यक्तीची इच्छा राहील. शरीर सर्वस्व मानल्याने, प्रत्येकजण व्यक्तिगत स्वार्थापलीकडे न जाता, इतरांना त्रास देऊनही स्वार्थ साधेल. सामाजिक जीवन अशा स्वाथ पद्धतीने असंभव बनेल आणि समाज रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. जीवन जडदेहासह मातीमय होईल. मग उत्क्रांती, उन्नती, सुधारणा या तरी कशाकरिता हव्यात? सर्व मातीच आहे! असल्या मृण्मय निरर्थक अवस्थेला कोणीही गांभीर्याने मानेल, असे वाटत नाही. असली निरर्थक अवस्था दूर करण्याकरिता तरी, पुनर्जन्माची कल्पना मानणे क्रमप्राप्त आहे. त्याशिवाय मानवीय समाजाला अन्य पर्याय नाही. पुनर्जन्माची कल्पनाच आम्हाला त्या घोर अवस्थेतून वर उचलू शकते. म्हणूनच भक्त कबीर म्हणतात, ‌’करले सिंगार चतुर अलबेली साजन के घर जाना होगा॥‌’

- योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357