हिंदू धर्मात स्त्रीशक्तीच्या जागर करण्यासाठी वर्षभरात नवरात्र साजरी करण्यात येतात. त्यांपैकी शाकंभरी नवरात्राचे महत्त्व थोडे वेगळे. निसर्ग संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत, पोषक आहाराचे महत्त्वही या उत्सवातून अधोरेखित होते. सध्या पौष शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या उत्सवाचा विविध अंगांनी घेतलेला आढावा...
भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा जरी ‘निसर्गपूजन’ असला, तरी या पूजनाचा सर्वांत व्यावहारिक आणि थेट संबंध आपल्या दैनंदिन आहाराशी येतो. निसर्ग आणि मानवी शरीर हे एकाच चक्राचे भाग असल्याने, निसर्गाच्या लयीनुसार पिकणारे आणि ऋतूंना साजेसे अन्न स्वीकारणे, हीच खरी निसर्गपूजा मानली जातेे. आपल्या सणावारांची रचनाही याच तत्त्वावर आधारित आहे. वर्षात येणाऱ्या चैत्र आणि शारदीय नवरात्रांचा जल्लोष आपण पाहतोच, पण पौष महिन्यात येणारे ‘शाकंभरी नवरात्र’ हे मानवी अस्तित्वाच्या मुळाशी, म्हणजेच अन्नाशी जोडलेले आहे. त्यामुळेच हा उत्सव केवळ धार्मिक विधी उरत नाही, तर तो ‘निसर्गानुरूप आहारशैली’चा आणि आरोग्याचा एक दिशादर्शक वस्तुपाठ ठरतो. पौष शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत चालणारा हा उत्सव म्हणजे केवळ देवीची आराधना नसून, तो निसर्गाचा, कृषी संस्कृतीचा, आरोग्याचा आणि दुष्काळावर मात करणाऱ्या मानवी जिद्दीचा गौरवशाली इतिहासच आहे. आजच्या आधुनिक युगात हवामानबदल आणि जीवनशैलीतील विकारांच्या पार्श्वभूमीवर, या उत्सवाकडे एका नव्या आणि प्रगल्भ दृष्टीने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
शाकंभरी देवीच्या अवताराची कथा ही केवळ एक पुराणकथा नसून, तो निसर्ग आणि मानवी अस्तित्व यांच्यातील संघर्षाचा आणि समन्वयाचा अद्भुत इतिहास आहे. ‘देवी भागवत’ आणि पुराणात उल्लेख असल्याप्रमाणे, प्राचीन काळी दुर्गम नावाच्या दैत्याच्या अधम वर्तनामुळे, पृथ्वीवर मोठेच अरिष्ट ओढवले. वेदांचे ज्ञान लुप्त झाले, निसर्गाचा समतोल ढासळला आणि परिणामी पृथ्वीवर सलग 100 वर्षे पाऊस पडला नाही. नद्या- सरोवरे आटली, विहिरी कोरड्या पडल्या, जमिनीला भेगा पडल्या आणि अन्नाच्या कणाकणासाठी सजीव सृष्टी तडफडू लागली. या भीषण संकटातून सुटका करण्यासाठी, हिमालयातील ऋषी-मुनींनी आदिशक्तीची कठोर आराधना केली. भक्तांच्या आणि लेकरांच्या या आर्त हाकेने देवी प्रसन्न होऊन, सर्वांसमोर प्रकट झाली. त्यावेळी तिचे रूप अत्यंत आगळेवेगळे व भव्य होते! सृष्टीमधील उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडेझुडपे, नानारंगी फुले, पाने आणि रसरशीत डौलदार फळे या सर्वांनी मिळूनच तिचे शरीर तयार झाले होते. तिचे रूप विविधरंगी असूनही अत्यंत तेजस्वी वाटत होते.
या विराट रूपात जिकडे पहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते, म्हणूनच सर्वजण तिला ‘शताक्षी’ (100 डोळे असलेली) म्हणू लागले. आपल्या लेकरांची झालेली दयनीय अवस्था पाहून, जगन्मातेच्या या 100 नेत्रांमधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. या अश्रूरूपी कृपामृताच्या वर्षावाने, कोरड्या नद्यांना पुन्हा पाणी मिळाले. सर्वजण उल्हासित झाले, सृष्टीत नवा जोम आला आणि सर्वांना नवे जीवन लाभले. पाण्यामुळे सृष्टीला नवसंजीवन मिळाले खरे, मात्र अन्नावाचून व्याकूळ झालेल्या जीवांची क्षुधाशांती करणे, हे आव्हान अजूनही समोर होतेच. तेव्हा या मातेने आपल्या स्वतःच्या शरीरातूनच विविध प्रकारच्या वनस्पती, पालेभाज्या (शाक), कंदमुळे आणि फळे उत्पन्न केली. तिने अनेक रुचकर पदार्थ निर्माण करून, एका आईच्या मायेने भुकेल्या जगाला पोटभर खाऊ घातले आणि तृप्त केले. स्वतःच्या अंगाखांद्यावर उगवलेल्या या शाक-भाजीने तिने जगाची भूक भागवली, म्हणूनच तिला ‘शाकंभरी’ अर्थात शाक धारण करणारी हे सार्थ नाव प्राप्त झाले. पुढे याच शक्तीने दुर्गम दैत्याचा वध करून, वेदांचाही उद्धार केला. ही कथा आपल्याला सांगते की, जेव्हा निसर्ग कोपतो, तेव्हा काय प्रलय होऊ शकतो आणि तोच निसर्ग मातेच्या रूपात जेव्हा प्रसन्न होतो, तेव्हाच सृष्टी जगू शकते.
या पौराणिक कथेची ऐतिहासिक साक्ष, कर्नाटकातील बदामी येथील सातव्या शतकातील चालुक्यकालीन बनशंकरी मंदिरात मिळते. हे मंदिर पूव तिलकारण्य या घनदाट जंगलात वसलेले असल्याने, वनात राहणाऱ्या या देवीला ‘वनशंकरी’ किंवा लोकभाषेत ‘बनशंकरी’ म्हणून ओळखले जाते. हे मंदिर द्रविड स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची काळ्या पाषाणातील अष्टभुजा मूत आहे, जी सिंहावर आरूढ असून, तिने एका पायाखाली असुराला दाबले आहे. तिच्या आठ हातांत त्रिशूळ, डमरू, खड्ग, वेद आणि घंटा अशी विविध आयुधे आहेत. विशेष म्हणजे, देवीचे हे रूप अत्यंत तेजस्वी असूनही तिचे डोळे अत्यंत बोलके आणि करुणामय वाटतात. ते तिच्या शताक्षीरूपाचीच साक्ष देतात. मंदिरासमोर हरिद्रा तीर्थ नावाचे विशाल सरोवर आणि त्याकाठचे दगडी दीपस्तंभ, रात्रीच्या वेळी एक अलौकिक दृश्य निर्माण करतात.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील राहू काळातील पूजा. भारतीय परंपरांमध्ये राहू काळ हा अशुभ मानून, त्यात शुभ कार्ये वर्ज्य केली जातात. मात्र, बनशंकरीच्या दरबारात नेमके याच्या उलट घडते. येथे मुद्दाम राहू काळात देवीची पूजा आणि आरती केली जाते. ही अनोखी प्रथा, दुःख आणि अशुभतेपासून मुक्ती मिळविण्याच्या परंपरेचे प्रतीक आहे. हा प्रघात समाजाला असा उदात्त संदेश देतो की, जो भक्त निसर्गशक्तीशी एकरूप होतो, त्याच्यासाठी कोणताही काळ अशुभ नसतो. संकटांवर आणि खुद्द काळावरही मात करणारी ही आदिशक्ती आहे, हेच यातून अधोरेखित होते.
शाकंभरी नवरात्र हे केवळ धार्मिक किंवा ऐतिहासिक नाही, तर ते पूर्णतः वैज्ञानिक आणि आयुर्वेदाला धरून आहे. ‘शाकंभरी’ या शब्दातच ‘शाक’ म्हणजेच पालेभाज्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हा उत्सव पौष महिन्यात येतो. आयुर्वेदानुसार, हा काळ कडाक्याच्या थंडीचा असतो (हेमंत/शिशिर ऋतू.) या काळात, मानवी शरीरातील जठराग्नि अत्यंत प्रदीप्त असतो, म्हणजेच पचनशक्ती उत्तम असते आणि शरीराला सकस, पौष्टिक आहाराची गरज असते. निसर्गाची रचना अशी आहे की, नेमक्या याच दिवसांत शेतात विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, कंदमुळं आणि धान्य विपुल प्रमाणात उपलब्ध असतात. शाकंभरी देवीचा नैवेद्य, प्रामुख्याने 60 प्रकारच्या भाज्यांपासून बनवला जातो असे मानले जाते. हे प्रतीकात्मकरित्या आपल्याला सांगते की, आहारात वैविध्य असणे आरोग्यासाठी किती आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांत होणारे वात आणि कफ दोषांचे असंतुलन रोखण्यासाठी बाजरीची भाकरी, तीळ, शेंगदाणे आणि एकत्रित भाज्यांचा आहार शरीरात उष्णता आणि ऊर्जा निर्माण करतो. पचायला हलका आणि सत्त्वगुणांनी युक्त असा हा आहार, या काळात शरीराचे नैसर्गिकरित्या शुद्धीकरण करण्यास मदत करतो. थोडक्यात ऋतुचर्या कशी असावी, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
हवामानबदल आणि ढासळत्या निसर्ग संतुलनाच्या पार्श्वभूमीवर, आज शाकंभरी मातेच्या पूजेला एक वेगळेच संदर्भ प्राप्त झाले आहेत. पुराणात वर्णन केलेली 100 वर्षांच्या दुष्काळाची ती कथा, आजच्या संदर्भात आपल्याला एका धोक्याच्या घंटेसारखी ऐकू यायला हवी. त्यामुळेच या उत्सवाकडे केवळ धार्मिक दृष्टीने न पाहता, त्यातून सामाजिक बोध घेणेही क्रमप्राप्त आहे. ज्याप्रमाणे देवीने स्वतःच्या शरीरातून भाज्या उगवून जगाचे पोषण केले; तसेच भरण-पोषणाचे काम आज आपला बळीराजा करतोय; त्यामुळे या उत्सवात शेतकऱ्याचा सन्मान होणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. तसेच, भारतीय संस्कृतीत ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ मानले गेले असताना, आज लग्नसोहळे आणि उपहारग़ृहांहमध्ये होणारी अन्नाची नासाडी थांबवणे, हा देखील या देवीचा खरा सन्मान ठरेल. सिमेंटच्या जंगलात हरवलेल्या माणसाने पुन्हा वृक्षसंवर्धनाकडे वळणे, ही आता पर्यायी गरज नसून ती अपरिहार्यता झाली आहे.
अखेरीस, शाकंभरी नवरात्राचे सार हेच आहे की, देव केवळ दगडी गाभाऱ्यात बंदिस्त नसून तो आपल्याला जगवणाऱ्या अन्नात, वाहणाऱ्या पाण्यात आणि हिरव्यागार निसर्गात व्यापलेला आहे. आजच्या ‘फास्ट फूड’ आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या जमान्यात, आपण पुन्हा एकदा आपल्या मुळांकडे, म्हणजेच सात्त्विक, नैसर्गिक आणि स्थानिक आहाराकडे वळले पाहिजे. दुष्काळमुक्त जग आणि रोगमुक्त शरीर हेच शाकंभरी देवीचे, मानवजातीला दिलेले खरे वरदान आहे. म्हणूनच, या नवरात्रात केवळ देवीची आरती ओवाळून कृतकृत्य होण्याबरोबरच; ताटात पडणाऱ्या अन्नाचा कण अन कण वाचवण्याची, स्थानिक भाज्या खाऊन शेतकऱ्याला बळ देण्याची आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याची शपथ घेणे हीच या अन्नपूर्णेला वाहिलेली खरी आदरांजली ठरेल. निसर्गरक्षण आणि आरोग्यसंवर्धन हाच या उत्सवाचा खरा प्रसाद आहे, हे आपण लक्षात ठेवूया.
- आसावरी पाटणकर
(लेखिका संगीताचार्य असून, कला, शिक्षण, मानसिक आरोग्य आणि अध्यात्म या क्षेत्रांमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. सनातन धर्माच्या प्रसार-प्रचाराचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या ‘उद्गार’ संस्थेच्या संस्थापकही आहेत.)