किरकसालमध्ये प्रथमच दिसला बदामी डोक्याचा राघू; पक्ष्यांची यादी २१२ पक्ष्यांवर

    01-Jan-2026
Total Views |
kiraksal


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सातारा जिल्ह्यातील किरकसालच्या माळरानावर 'बदामी डोक्याचा राघू' (Chestnut-headed Bee-eater) या पक्ष्याची नोंद कररण्यात आली आहे (kiraksal). पक्षी मूळचा महाराष्ट्रातीलच रहिवासी असला, तरी माण देशात त्याचे दिसणे तसे दुर्मीळ आहे (kiraksal). भरकटून तो या प्रदेशात आल्याची शक्यता किरकसाल संवर्धन प्रकल्पातील संशोधकांनी व्यक्त केली आहे. (kiraksal)
 
सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यातील किरकसाल हे गाव गवताळ परिसंस्थेच्या संवर्धनासंदर्भात आदर्शगाव ठरले आहे. येथील गवताळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी स्थानिक तरुण आणि अनुभवी गावकरी मिळून किरकसाल संवर्धन प्रकल्प राबवित आहेत. आता निसर्गसंपन्न 'किरकसाल वनक्षेत्रात' एका अत्यंत देखण्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. पक्षी निरीक्षणादरम्यान येथे 'बदामी डोक्याचा राघू' आढळून आला आहे. हा पक्षी मूळचा महाराष्ट्रातीलच रहिवासी असला, तो स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करतो. अभ्यासकांच्या मते, हा पक्षी प्रामुख्याने पश्चिम घाटातील जंगलात वास्तव्य करतो. मात्र, हे पक्षी ऋतूंनुसार अन्नाच्या शोधात किंवा प्रजननानंतर 'स्थानिक स्थलांतर' करतात. सध्या हा पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवासात असताना त्याने किरकसालमध्ये विश्रांती घेतल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र,तसे नसून हा पक्षी याठिकाणी भरकटून आल्याची शक्यता आहे. या नोंदीमुळे किरकसालमध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांची यादी २१२ पक्ष्यांवर गेली आहे.
 
 
या पक्ष्याच्या स्थानिक स्थलांतराच्या प्रदेशात माणसारख गवताळ प्रदेशाचा समावेश नसतो. त्यामुळे तो याठिकाणी भरकटलेल्या अवस्थेत आल्याची शक्यता किरकसाल संवर्धन प्रकल्पातील संशोधक चिन्मय सावंत यांनी व्यक्त केली आहे. किरकसालचे गवत, झाडी आणि ओढे,पाणवठे हे अशा 'प्रवासी' पक्ष्यांसाठी संजीवनी ठरत आहेत. हा पक्षी येथे कायमचा अधिवास करणार नसून तो काही दिवसांकरिता याठिकाणी मुक्कामी आला आहे. सातारा जिल्ह्याच्या ई-बर्डवरील (eBird) नोंदीनुसार या पक्ष्याची किरकसाल मधून ही पहिलीच नोंद आहे. त्यामुळे ही नोंद केवळ त्या पक्षाच्या उपस्थितीची नसून, पक्ष्यांच्या स्थानिक स्थलांतराचे मार्ग समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. स्थानिक पक्षीप्रेमींनी या पाहुण्याचे स्वागत करत त्याच्या संरक्षणाची ग्वाही दिली आहे.