१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राज्यात सेवा पंधरवाडा - मंत्री ॲड. आशिष शेलार ; राज्यातील ७५ गावे होणार 'स्मार्ट व्हिलेज'

    09-Sep-2025   
Total Views |

मुंबई : येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राज्यात सेवा पंधरवडा राबविण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.

मंत्रालयात मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या सेवा पंधरवड्यात माहिती तंत्रज्ञान विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभागाने @75 ही संकल्पना घेऊन विविध लोकाभिमुख उपक्रम राबवावे, असे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा होणाऱ्या सेवा पंधरवडा निमित्ताने अत्याधुनिक तंत्रज्ञान, वायफाय आदिंचा वापर करून राज्यातील ७५ गावे शोधून ती ‘स्मॉर्ट व्हिलेज’ करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत उपक्रम राबवा

मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "सध्याच्या नवीन पिढीला नवीन तंत्रज्ञानयुक्त प्लॅटफॉर्म सोबतच प्रशिक्षणही मिळाले पाहिजे. यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने कार्यवाही करावी. राज्यात राबविण्यात येत असलेल्या या सेवा पंधरवडाच्या निमित्ताने फिल्मसिटीमध्ये स्वच्छता अभियान, रक्तदान, कलाकारांसोबत चर्चा, आरोग्य केंद्र, दिव्यांग कलाकारांसोबत चर्चा, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम राबविण्यात यावे. सांस्कृतिक कार्य विभागाने पुस्तक प्रकाशन, प्रदर्शन, चित्र स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कला स्पर्धा, तमाशा कलावंतांशी चर्चा, वैशिष्ट्यपूर्ण असे सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम राबवावे. आज काही वाद्ये लुप्त होण्याच्या मार्गावर असून ही वाद्ये जगासमोर प्रदर्शित करावीत," असे निर्देश त्यांनी दिले. तसेच

राज्यातील ७५ वारसा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवा

राज्यातील ११ किल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा मानांकन मिळाले असून या गडकिल्याचे आभासी वास्तव तसेच संवर्धित वास्तव तयार करावे. तसेच राज्यातील ७५ वारसा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....