सतत दुरावस्थेच्या चर्चेतील चिंचोटी-भिंवडी मार्गाच्या दुरुस्तीला लवकरच होणार सुरुवात, वसईच्या आमदारांकडून केलेल्या प्रयत्नांमुळे प्रवाश्यांना मिळणार दिलासा.

    08-Sep-2025
Total Views |

खानिवडे : मागील पाच वर्षांपासून सतत दुरवस्थेच्या चर्चेत असलेल्या चिंचोटी-भिवंडी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार आहे. वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रवाश्यांना आणि चालकांना दिलासा मिळणार आहे.

वसई आणि भिवंडी तालुक्याला जोडणारा चिंचोटी ते भिवंडी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत "बांधा-वापरा-हस्तांतरीत करा" या तत्त्वावर मे. सुप्रीम वसई भिवंडी टोलवेज प्रा. लि. या कंपनीला देण्यात आला होता. मात्र, कंपनीने रस्त्याची नियमित देखभाल आणि दुरुस्ती न केल्यामुळे तो गेल्या पाच वर्षांपासून अतिशय खराब स्थितीत आहे. त्यामुळे वसई-भिवंडी परिसरातील उद्योगधंद्यांच्या मालवाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

चिंचोटी-पोमण-कामण या भागातील आदिवासींसाठी हा एकमेव मार्ग असल्याने त्यांच्या दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे, वाहतुकीतील अडथळे आणि वाढते अपघात यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी डिसेंबर २०२४ मधील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, याआधी काम केलेल्या सुप्रीम कंपनीने या निविदा प्रक्रियेविरोधात न्यायालयात धाव घेतल्यामुळे काम रखडले होते.

स्नेहा दुबे पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानुसार फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्यासोबत विविध बैठका घेतल्या. १६ एप्रिल, ११ जुलै आणि १२ ऑगस्ट २०२५ रोजी मंत्रालयात झालेल्या या बैठकींमध्ये समाधानकारक समन्वय न झाल्याने रस्त्याचे काम सुरू होऊ शकले नव्हते.

मात्र, अखेर २६ ऑगस्ट २०२५ रोजी न्यायालयाने या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला मंजुरी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने लगेच पुढील प्रक्रिया सुरू केली असून काही दिवसांत कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे, अशी माहिती आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त झाल्यास नागरिक, उद्योगधंदे, आदिवासी व प्रवासी यांना मोठा दिलासा मिळणार असून अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.