एकांत... नुसता हा शब्द जरी उच्चारला तरी मनाला एक आत्मीय समाधानाची झुळूक हलकेच स्पर्शून जाते. असा हा एकांत सगळ्यांनाच अगदी हवाहवासा, कोणाला निसर्गाच्या सान्निध्यात गवसणारा, तर कोणाला समुद्री लाटांच्या गर्जनातही आत्मानुभूतीचा अनुभव देणारा...त्यामुळे एकांताची ज्याची-त्याची परिभाषा भिन्न असली तरी भावना मात्र एकच. तेव्हा, या एकांताची गरज, एकांत आणि एकटेपणामधील नेमका फरक याचे चिंतन करणारा हा लेख...आजच्या धावपळीच्या आवाजाने आणि सूचनांनी भरलेल्या जीवनात ‘एकांत’ हा शब्द ऐकला तरी काहींना बेचैनी वाटते, तर काहींना तो आनंदाचा वाटतो. मोबाईलच्या सततच्या नोटिफिकेशन्स, सोशल मीडियाची गर्दी आणि काम-घर यांतील अस्पष्ट सीमारेषा या सगळ्या गोंगाटातून स्वतःसाठी थोडा वेळ काढणं, म्हणजे जणू असाध्य गोष्ट भासते. पण, खरं म्हणजे एकांत हा तणाव कमी करण्यासाठी, मानसिक शांती मिळवण्यासाठी आणि स्वतःला नव्याने समजून घेण्यासाठी सर्वांत उपयुक्त साधन आहे.
एकांत म्हणजे एकाकीपणा नाही, तर स्वतःशी गाठ घालण्याची वेळ आहे. जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक संवाद साधतो, तेव्हा ताणाची खरी कारणं समोर येतात आणि त्यांना हाताळणं सोपं होतं. एकांत आपल्याला बाहेरील गोंगाटातून सुटकारा देतो आणि अंतर्मनाला बळकटी देतो. अनेक संशोधनांतून सिद्ध झाले आहे की, नियमितपणे स्वतःसोबत वेळ घालवणार्या लोकांमध्ये ताण आणि चिंतेची पातळी कमी दिसून येते. त्यांचे भावनिक समाधान वाढते आणि नातेसंबंधही अधिक निरोगी राहतात.
शरीरालाही एकांत फायद्याचा ठरतो. काही काळ संपणे एकटे राहिल्याने कॉर्टिसॉल (ीीींशीी हेीोपश) पातळी कमी होते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, झोपेचा दर्जा उंचावतो आणि मन प्रसन्न होतं. खरं तर हा एकांत म्हणजे मेंदू आणि शरीराला दिलेला छोटा सुटीचा आनंद असतो. एकांत हा केवळ गोंधळातून बाहेर पडण्याचा मार्ग नसतो, तर तो स्वतःशी संवाद साधण्याचा नवा प्रारंभ असतो. जेव्हा आपण थोडा वेळ एकटे राहतो, तेव्हा आपलं मन जणू ‘रिसेट’ होतं. बाहेरील आवाज शांत होतात आणि अंतर्मनातील आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागतो.
एकांतात राहणे म्हणजे तृप्तीत एकटे राहणे, स्वतःच्या आवडीच्या कामात मग्न राहणे, इतरांच्या अनुपस्थितीपेक्षा स्वतःच्या उपस्थितीच्या परिपूर्णतेची जाणीव असणे. कारण, एकटेपणा ही एक संपन्न उपलब्धी आहे.
एकटेपणा म्हणजे फक्त लोकांपासून दूर राहणे नव्हे, तर एकांत आणि एकटेपणा यांमध्ये सूक्ष्म पण अतिशय महत्त्वाचा फरक आहे. एकांत म्हणजे तो क्षण, जेव्हा संपूर्ण विश्व आपल्याभोवती प्रसन्न होऊन जणू आपल्याला उबदार आलिंगन देते. त्यावेळी आपण एकटे असलो, तरी मनात एक गोड संगत चालू असते. एकांतात आपण स्वतःशी संवाद साधतो, मनाच्या गाभार्यात डोकावतो आणि अंतर्मनातील शांतीला स्पर्श करतो.
परंतु, एकटेपणा ही वेगळीच अवस्था आहे. एकटेपणा म्हणजे बाहेर कितीही लोक असले, तरी आतून जाणवणारी पोकळी. ज्यावेळी आपल्या नात्यांची, आधाराची गरज आपल्या अंतर्मनातील सामर्थ्यापेक्षा जास्त होते, तेव्हा ही रिक्तता जाणवते. एकटेपणा हा पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ अनुभव आहे. तो आपल्या सभोवतालच्या लोकांच्या संख्येने ठरत नाही, तर आपण त्यांच्या उपस्थितीचा अनुभव कसा घेतो, यावर अवलंबून असतो.
अमेरिकन तत्त्वज्ञ हेन्री डेव्हिड थोरो यांनी याचे अप्रतिम वर्णन केले आहे. ते म्हणतात, "मला असा कोणताही साथीदार भेटला नाही, जो एकांताइतका सुंदर सोबती ठरला!” ही उक्ती एकांताचे महत्त्व आणि त्यातील गोडी स्पष्ट करते. ‘एकांत’ हा आपल्याला स्वतःच्या जवळ आणतो, तर ‘एकटेपणा’ आपल्याला इतरांपासून दूर नेतो.
तणावाच्या क्षणी नाती तुटतात, धुसर होतात, कधी एखाद्या वादळासारखी विस्कटतात किंवा उलट, नात्यांतील गाठी-गुंता हा तणावाचे मूळ ठरतो. अशा वेळी, अनेकदा अंतर्ज्ञानाच्या विरुद्ध जाऊन, एकांताचं सामर्थ्य उपयोगात आणता येतं. कारण, एकांतात घालवलेला वेळ आपल्याला आत्मपरीक्षणाची, आत्मचिंतनाची आणि आत्मजागरूकतेची भेट देतो. हीच तर भावनिक बुद्धिमत्तेची मुळे आहेत. जेव्हा आपण स्वतःशी बोलायला शिकतो, स्वतःच्या मनाच्या लहरींना ऐकतो, तेव्हा आपण इतरांना अधिक सच्चेपणाने ऐकू शकतो. अशा वेळी एकांत आपल्याला आपल्या नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवतो. आपण ओळखतो की नाती टिकवण्यासाठी मनाशी मिळणं गरजेचं असतं. तसं एकांतात घेतलेलं चिंतन नात्यांच्या मुळांमध्ये नवं जीवन ओततं. एकटेपणातून जन्मणारी आत्मजाणीव हीच खरा नात्यांचा पूल रचते.
एकांतात माणूस भूतकाळातील अनुभवांचे चिंतन करून गोड-तिखट क्षणांचे भान ठेवतो. या साधनेतून दृष्टिकोन विस्तृत होतो, सहानुभूती जागृत होते आणि भविष्याचा सामना करण्याची ताकद मिळते. जेव्हा आपण शांततेच्या या क्षणांत मनःपूर्वक योजना आखतो, तेव्हा जीवनातील ताणतणाव आपोआपच मागे सरकतात आणि पुढे उलगडते एक हलके, सुशोभित, नात्यांनी समृद्ध असे आयुष्य.
थॉमस ए. एडिसन म्हणतात, "सर्वोत्तम विचार एकांतात केले जातात, तर सर्वांत वाईट विचार अशांततेत केले जातात.” एकांत हा आपल्याला विचारांचे पंख देतो, सर्जनशीलता खुलवतो आणि आत्मशांतीची नवी दारे उघडतो. परंतु, एकटेपणाचा भास झाला, तर त्याला सामोरे जाण्यासाठी संवाद साधणे, संबंध घट्ट करणे आणि अंतर्मनाशी मैत्री करणे गरजेचे ठरते. म्हणूनच इतिहासातील क्रांतिकारी संशोधन असो वा कालातीत कलाकृती, त्यामागे बहुदा एकांताची निःशब्द प्रेरणा दडलेली दिसते. अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतात, "शांत आणि साध्या जीवनातील एकसुरीपणा व एकांत हेच मनाला सृजनशीलतेकडे जागृत करतात.” त्यांच्या या विचारातून आपल्याला कळते की, एकांत म्हणजे केवळ एकटे राहणे नसून, ते मनाला कल्पनाशक्तीची नवी दारे उघडून देणारे साधन आहे. पाब्लो पिकासो स्पष्ट सांगतात, "मोठा एकांत नसेल, तर गंभीर कलाकृती घडूच शकत नाही.” यावरून समजते की, कला व साहित्य हे गर्दीत नव्हे, तर अंतर्मुख शांततेत उमलतात.
म्हणूनच जीवनात एकांताची भीती बाळगू नये. उलट त्या क्षणांचा आस्वाद घ्यावा. तसेच हा एकांत तणाव व्यवस्थापनाचेही श्रेष्ठ साधन ठरतो. बाह्य गोंगाटापासून अलिप्त झाल्यावर माणूस स्वतःच्या मनाशी संवाद साधतो, विचारांची गाठ सोडवतो आणि जगण्याच्या ओझ्याला हलकेपणाने वाहून नेण्याची ताकद मिळवतो. अशा शांत संवादातूनच अंतःकरण स्थिर होते आणि प्रतिभेला नवीन दिशा मिळते.
डॉ. शुभांगी पारकर