सफाळे, पालघर तालुक्यातील अथांग समुद्र किनाऱ्यालगत निसर्गरम्य परिसर लाभलेलं एडवण गाव हे विविध जाती-धर्माचे नागरिक एकत्र राहणारे, पारंपरिक व्यवसाय करणारे गाव आहे. याच गावात ५ सप्टेंबर १९३५ रोजी रामचंद्र केरोबा केळवेकर यांचा जन्म झाला.
त्यांनी आपल्या आयुष्यात शिपाई,शिक्षक,उपमुख्याध्यापक ते मुख्याध्यापक अशी वाटचाल करत बृहन्मुंबई महापालिकेतून सेवानिवृत्ती घेतली. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारासह संत रोहिदास पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
शिक्षणप्रेमी, नाट्यकर्मी, सामाजिक कार्यकर्ते म्हणून केळवेकर यांचा लौकिक आहे. त्यांच्या प्लॅटिनियम म्हणजेच ९०व्या वाढदिवसानिमित्त शहाजीराजे क्रीडा संकुलात एक भावनिक आणि प्रेरणादायी समारंभ पार पडला. या कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबियांसह ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडीलकर, संत रोहिदास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदेश जाधव, उपाध्यक्ष संदीप राऊत, पालघर तालुका रोहिदास समाजचे अध्यक्ष सुभाष पाटील, आरटीओ मेजर शिरीषकर, चंद्रकांत उसनकर, डॉ. विजय केळवेकर, राजन वनमाळी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केळवेकर यांची नात आणि लोकमत सखी गार्गी गोरेगावकर हिने केले. तर लहानशी नात स्वानंदी हिने स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात भावनिक केली. योगेश केळवेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
संत रोहिदास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदेश जाधव यांनी "गुरुजी म्हणजे एक सार्थ जीवन जगणारे आदर्श व्यक्तिमत्व" असे गौरवोद्गार काढले. त्यांनी गुरुजींच्या कार्याचा आणि एडवण गावाच्या सामाजिक-शैक्षणिक योगदानाचा आढावा घेत आठवणींना उजाळा दिला.