मुंबई : 'पंच परिवर्तन आणि विकसित भारत' या विषयावरील एक व्याख्यान मणिपूर विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयातील समिती सभागृहात नुकतेच संपन्न झाले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आसाम क्षेत्राचे प्रचार प्रमुख डॉ. सुनील कुमार मोहंती यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर व्याख्यान कॉलेज डेव्हलपमेंट कौन्सिल, मणिपूर विद्यापीठ; इंटेलेक्च्युअल फोरम ऑफ नॉर्थईस्ट-मणिपूर आणि विश्व संवाद केंद्र, मणिपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
डॉ. सुनील कुमार मोहंती यांनी आपल्या उद्बोधनातून भारताला सबळ व शाश्वत राष्ट्र घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले 'पंच परिवर्तना'च्या बिंदूंविषयी सविस्तर विवेचन केले. कुटुंब मूल्यांवर बोलताना भारतीय कुटुंबव्यवस्था ही भारतीय समाजाची जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी असल्याचे त्यांनी सांगितले.
पाश्चिमात्य भौतिकवादी व वोकिस्ट विचारसरणीच्या प्रभावाखाली पारंपरिक मूल्यांची गळती होत असल्याचा त्यांनी इशारा दिला, ज्यामुळे समाजातील एकोपा कमकुवत होऊ शकतो. अमेरिकन समाजशास्त्रज्ञ डेव्हिड ब्लॅन्केनहॉर्न यांच्या 'फादरलेस अमेरिका' या पुस्तकाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की अमेरिकेत कुटुंबव्यवस्था कोसळल्याने किशोरवयीन गर्भधारणा, घटस्फोटाचे वाढते प्रमाण आणि सामाजिक तुटकपणा यांसारखे संकट निर्माण झाले आहे.
पर्यावरण संरक्षणाविषयी बोलताना मोहंती यांनी उपस्थितांना पाणी जपण्याबाबत, सिंगल-यूज प्लास्टिक व पॉलिथिन टाळण्याबाबत आणि वृक्षलागवडीस प्रोत्साहन देण्यााबाबत आवाहन केले. तसेच सामाजिक समरसतेवर भर देत त्यांनी नागरिकांना जात, धर्म, जमात, भाषिक फरक आणि प्रांतीयता यांवर मात करण्याचे आवाहन केले. 'वोकल फॉर लोकल' च्या भावनेखाली तत्त्वज्ञानिक आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर स्वदेशी आचरण पुन्हा रुजविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
नागरी कर्तव्यांवर बोलताना त्यांनी उपस्थितांना स्मरण करून दिले की संविधानाने दिलेली मूलभूत कर्तव्ये देखील तितकीच महत्त्वाची आहेत जितके मूलभूत हक्क. प्रत्येक नागरिक आपली कर्तव्ये पार पाडेल तर त्याचे हक्क आपोआप संरक्षित होतील आणि न्याय्य व प्रगत समाजाची निर्मिती होईल, असेही ते म्हणाले.
व्याख्यानाचा समारोप करताना डॉ. मोहंती यांनी परिवर्तनाची सुरुवात व्यक्तीपासूनच होत असल्याचे अधोरेखित केले. हे सांगत असताना त्यांनी शैक्षणिक वर्तुळ आणि नागरिकांना वैयक्तिक उदाहरण घालून नेतृत्व करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात मणिपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नाओरेम लोकेन्द्र सिंग यांनी भारताच्या सभ्यताविषयक वारशाचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. स्वावलंबी व समावेशक राष्ट्रनिर्मितीसाठी ते आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला मणिपूर विद्यापीठ, डीएम विद्यापीठ, इन्स्टिट्यूट ऑफ बायो-रिसोर्सेस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इंदिरा गांधी नॅशनल ट्रायबल युनिव्हर्सिटी आणि इतर उच्च शिक्षण संस्थांतील ५६ प्राध्यापक व विद्वान सहभागी झाले होते.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक