मुलांना सरकारी शाळेत शिकवल्यास करामध्ये मिळणार ५०% सूट! सोलापुरातील गोगाव ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

    08-Sep-2025   
Total Views |



सोलापूर : (Gogaon) अधिकाधिक मुलांनी सरकारी शाळेत शालेय शिक्षण घ्यावे, याकरिता प्रोत्साहन म्हणून सोलापूर जिल्ह्यातील गोगाव ग्रामपंचायतीने एक आगळावेगळा आणि स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना ग्रामपंचायत करात ५०% सूट मिळणार आहे. गोगांव जिल्हा परिषदेच्या शाळेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा आणि गावातील शिक्षणाचा स्तर उंचावावा, हा ग्रामपंचायतीचा उद्देश आहे.

गोगावमधील या शाळेत सध्या ६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, आणि गावात सुमारे ५०० कुटुंबे राहतात. या कुटुंबांना वार्षिक ३००० रुपयांचा वार्षिक कर भरावा लागतो. सरपंच वनिता सुरवसे आणि उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीकडून रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांही दंड आकारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

याचबरोबर एप्रिलमध्ये म्हणजेच जे लोक लवकर कर भरतील, त्यांनाही अतिरिक्त १०% सूट मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. करातून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या ५% रक्कम दिव्यांगांना आर्थिक साहाय्य आणि त्यांच्या सामाजिक विकासावर खर्च करण्याचा निर्णय गोगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे.



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\