मुंबई : काँग्रेसची वाटचाल हा ओबीसी समाजावरील अन्यायाचा इतिहास असून काँग्रेसचे ओबीसी प्रेम म्हणजे मगरीचे अश्रू आहेत, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवार, ८ सप्टेंबर रोजी केली. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या शासन निर्णय हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यावरून सध्या राजकारण तापले आहे.
याबद्दल बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, "आता संपूर्ण काँग्रेस ज्यांच्या दावणीला बांधलेली आहे, त्या पक्षाचे सर्वेसर्वा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे वडील राजीव गांधी हे बरोबर ३५ वर्षापूर्वी, ६ सप्टेंबर १९९० रोजी लोकसभेतील भाषणात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीस कडाडून विरोध करत होते. तसेच संधी पाहून राजकारण करणारे शरद पवार त्यावेळी काँग्रेस पक्षातच होते. १९५५ मधील ओबीसी आरक्षणाचा काका कालेलकर या पहिल्या आयोगाचा अहवाल वर्षानुवर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसने मांडला नाहीच, उलट तो दडपून टाकला. काँग्रेसची वाटचाल हा ओबीसी समाजावरील अन्यायाचा इतिहास आहे. आता ओबीसी अन्यायाचा इतिहास असलेल्या काँग्रेसकडून ओबीसींवर अन्याय होत असल्याचा टाहो फोडला जात आहे. गांधी घराण्याच्या पायाशी निष्ठा वाहून पद टिकविण्याची कसरत करणारे विजय वडेवट्टीवार ओबीसी आरक्षणासाठी नक्राश्रू ढाळत आहेत," अशी टीका त्यांनी केली.
ओबीसींच्या प्रश्नांसाठी भाजप कायम आग्रही “मविआकडून मराठा आंदोलनात भडकवण्याचा, सरकारला अडचणीत आणण्याचा भरपूर प्रयत्न झाला पण देवेद्रजींच्या नेतृत्वात राज्य सरकारने ते आंदोलन यशस्वीपणे सोडविल्याने फसलेली मविआ मंडळ आता ओबीसींना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्या काँग्रेसने ओबीसी समाजाला फसविले, कायम मतांपुरते वापरले, त्यांनी ओबीसी समाजाची चिंता करावी, यालाच मगरीचे अश्रू म्हणतात. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोघांनीही मंडल आयोग अहवाल दाबून ठेवला. ज्यावेळी हा अहवाल भाजपाचे समर्थन असणाऱ्या व्ही. पी. सिंग सरकारने आणला त्याला काँग्रेसने थेट विरोध केला. केंद्रात मोदी सरकारने ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला, ओबीसींच्या प्रश्नांसाठी भाजपा कायम आग्रही राहिली. ओबीसी समाजास काँग्रेसी फसवणुकीच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याचे काम भाजपने केले आहे. हा काँग्रेसवर काळाने उगवलेला सूड आहे,” असा घणाघातही केशव उपाध्ये यांनी केला.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....