घराच्या घरी फुलपाखरांची स्वारी

    08-Sep-2025
Total Views |

भारतात दरवर्षी सप्टेंबर महिना हा ‘बिग बटरफ्लाय मन्थ’ (big butterfly month) म्हणजेच फुलपाखरांचा महिना म्हणून साजरा केला जातो. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आपण घराच्या घरी फुलपाखरांना कशा प्रकारे आकर्षिक करू शकतो, याविषयी माहिती देणारा हा लेख...

घराच्या आवारात किंवा अगदी बाल्कनीत फुलपाखरे किंवा परागीकरण करणार्‍या कीटकांसाठी उद्यान तयार करताना आपल्याला मुख्यतः मधुरस वनस्पती (nectar plants) भक्ष्य/खाद्य वनस्पती (host plant) अशा दोन प्रकारच्या वनस्पतींची आवश्यकता असते. मधुरस वनस्पतींमध्ये आकर्षक फुले, सुगंध आणि विशिष्ट आकाराची फुले असणार्‍या वनस्पतींचा समावेश होतो. फुलांना फुलपाखरांचे वजन पेलेल, अशी गुच्छाकार रचना असणारी (उदा. घाणेरी, रातराणी, आयक्सॉरा, समई) किंवा लांब नळीसारखा अथवा खोल आकार असणारी फुले (जास्वंद, कोरांटी, हमेलिया, तगर, सदाफुली, सोनटक्का) फुलपाखरांना वर्षभर आकर्षित करतात. भक्ष्य किंवा खाद्य वनस्पतींमध्ये मादी फुलपाखरे अंडी घालतात. या बाबतीत फुलपाखरे चांगलीच चोखंदळ असतात. त्यामुळे वनस्पती फुलपाखरांच्या प्रजातीनुसार ठराविकच असतात आणि त्यांची प्रजातीशी जोडी ठरलेली असते. म्हणजे त्या एखाद्या प्रजातीची फुलपाखरे ती विशिष्ट वनस्पती सोडून इतर वनस्पतींवर अंडी घालत नाहीत. यासाठी आपल्या सभोवतालच्या परिसरात जी फुलपाखरे आढळतात, त्यांना अनुसरून खाद्य वनस्पती लावल्यास योग्य ती फुलपाखरे येतात. उदा. जर आपल्या परिसरात ‘कॉमन क्रो’ फुलपाखरे दिसत असतील, तर त्यासाठी स्थानिक वनस्पतींमध्ये कण्हेर, वड, औदुंबर, कुडा यांचा समावेश असावा. याउलट शोभेच्या वनस्पतींमध्ये आपल्याला कण्हेर, अडेनियम किंवा मिल्कवीड (हळदीकुंकू) हे पर्याय उपलब्ध आहेत.

याखेरीच आपण फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी काय करू शकतो किंवा आमच्या बागेत आधीपासूनच खूप झाडे आहेत, पण फुलपाखरे येत नाहीत, मग काय करायचे, हा प्रश्न मला नेहमी सर्वत्र विचारला जातो. यासाठी फुलपाखरू उद्यानात काय असावे आणि काय करू नये, यासाठी काही महत्त्वाची माहिती इथे पाहूया. सर्वप्रथम फुलपाखरे काय किंवा पक्षी काय किंवा अगदी फुलझाडेसुद्धा त्यांच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे काय असेल, तर अधिवास, म्हणजे निवासाचे ठिकाण. तर आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, ज्याचा जो अधिवास तिथेच तो सजीव नैसर्गिकरित्या आढळून येतो. आपण जिथे राहतो, तिथे नैसर्गिकरित्या असलेली वृक्षसंपदा, तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश आणि भौगोलिक परिस्थिती याचा परिणाम फुलपाखरांच्या विविधतेवर होतो. म्हणून आपली बाग जिथे असेल, तिथे त्या परिस्थितीशी अनुकूल झाडे लावली, तर आपल्या बागेत वर्षभर फुलपाखरे दिसतील.

शहरांमध्ये आपण पाहिले तर आंबा, वड, पिंपळ, गुलमोहोर, नारळ, बहावा ही झाडे मोठ्या प्रमाणावर दिसतात. त्यामुळे त्यावर अवलंबून असणारी टेल्ड जे, कॉमन जे, इमिग्रण्ट, पामफ्लाय, बॅरॉन, कॉमन क्रो, ब्लू टायगर ही फुलपाखरे जास्त दिसतात. याउलट, गवताळ प्रदेशात ग्रास यलो, पॅन्सी ही फुलपाखरे जास्त दिसतात. कांदळवन किंवा मिठागरे या भागात स्मॉल सलमान अरब, टिप्स, प्लेन टायगर किंवा कॅस्टर ही फुलपाखरे दिसतात. भारतात फुलपाखरांच्या १ हजार, ४०० हून अधिक जाती आढळून येतात. काही उंच हिमालयात, तर काही दक्षिण घाटात आढळून येतात. त्यामुळे आपल्या भागातील जातींचा थोडासा नीट अभ्यास केला, तर कोणती झाडे लावली, म्हणजे कोणती फुलपाखरे येतील, याची कल्पना येईल.


‘बिग बटरफ्लाय मन्थ’विषयी

भारतात दरवर्षी सप्टेंबर महिना हा ‘बिग बटरफ्लाय मन्थ’ (big butterfly month) म्हणजेच फुलपाखरांचा महिना म्हणून साजरा केला जातो. देशातील सर्व फुलपाखरूप्रेमी या महिन्यात फुलपाखरांची निरीक्षणे करतात (big butterfly month). फुलपाखरांबद्दलची माहिती मिळवणे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करणे, हा त्यामागचा प्रमुख हेतू आहे. फुलपाखरांच्या मोजणीसाठी यंदा ‘बिग बटरफ्लाय मन्थ’ या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याकडे एका सोप्या अ‍ॅपचीही निर्मिती करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आणि अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी ‘बिग बटरफ्लाय मन्थ’च्या वेबसाईटला भेट द्या.

त्यानंतरचा भाग येतो, तो ऋतूमान आणि जमिनीचा, जर आपण अती पावसाच्या ठिकाणी राहात असाल, तर तिथे पावसात टिकून राहतील, अशी झाडे लावा. कोरड्या ठिकाणी राहात असाल, तर मुळांची चांगली वाढ होऊन पाणी धरून ठेवतील, अशी झाडे तिथे लावल्यास फायदा होईल. कुंड्यांत झाडे लावताना पावसाच्या वेळी पाण्याचा निचरा होईल, असे मातीचे प्रमाण आणि झाडांना कमी पाणी देण्याची खबरदारी घ्यावी. उन्हाळ्यात पाणी कदाचित अधिक वेळा द्यावे लागेल आणि तीव्र उन्हापासून मांडवाची सावली करावी लागेल. तसेच खते, कोकोपीट, शेणखत/गांडूळखत यांतून हवी ती पोषणमूल्ये आणि आर्द्रता टिकून राहील, याची काळजी घ्यावी लागेल. याखेरीज, एकप्रकार लागवड (monoculture) टाळून विविध गुणधर्म असलेली झाडे लावणे जास्त फायदेशीर ठरते.

शेवटचा मुद्दा म्हणजे या सर्वांची माहिती कुठे मिळेल? तर, आपण आपण नागरिक विज्ञानाच्या माध्यमातून ‘बिग बटरफ्लाय मन्थ’ हा उपक्रम चालू केला. आपण सर्वांनी जमा केलेल्या माहितीतून प्रदेशनिहाय फुलपाखरे आणि ती भेट देत असलेली झाडे याची माहिती भारतभर गेल्या पाच वर्षांत गोळा झाली आहे आणि यापुढे होत राहील. आज या प्रकल्पातून मुंबईतून आमच्याकडे १००च्या आसपास प्रजातींची पाच हजारांच्या आसपास निरीक्षणे उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील आणि भारताचा विचार केला, तर ही माहिती कितीतरी पटींनी वाढते. म्हणूनच या प्रकल्पात आपल्या फोटोंची, नोंदींची आणि अधिवास संरक्षणातून उद्यान निर्मितीद्वारे योगदान आवश्यक आहे. तेव्हा सर्वांनी या उपक्रमातून सहभाग घेऊन एकमेकांना मदत करूया, बिया आणि सल्ला यांची देवाणघेवाण करूया आणि निसर्गाच्या संवर्धनात हातभार लावूया.

गौरव सोमण
(लेखक ‘बिग बटरफ्लाय मन्थ इंडिया २०२५’ या उपक्रमाचे मुंबई-ठाणे जिल्ह्याचे समन्वयक आहेत.)
९१५८९०२१५५