ज्ञानदाता प्रदीप

    08-Sep-2025   
Total Views |

शिक्षण पूर्ण झाल्यावर चांगली नोकरीची संधी अव्हेरून, ग्रामीण पातळीवर विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्याची ध्येयासक्ती घेऊन कार्य करणार्‍या प्रदीप चव्हाण यांच्याविषयी...

परीस आणि गुरू हे समान असले, तरी त्यांच्यात अंतर आहे. परीस आपल्या स्पर्शाने लोखंडाचे सोने करतो; पण गुरू आपल्या शिष्याला आपल्यासारखा बनवतो. गुरूंचे महत्त्व सांगणारे हे वचन ज्या शिक्षकांना लागू पडते, त्यापैकीच एक म्हणजे प्रदीप वाळकू चव्हाण! प्रदीप चव्हाण यांनी ‘बीए’, ‘डीएड’, ‘जीडीसीए’ आणि ‘डीएसएम’ असे शिक्षण प्राप्त केले आहे. समोर असलेली उत्तम नोकरीची संधी अव्हेरून, त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्यासाठी शिक्षकीपेशा स्वीकारला. गेली २८ वर्षे ते आदिवासी भागात विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्याचे कार्य करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवरचे त्यांचे लेखन, अनेक वृत्तपत्रातून प्रसिद्ध होते. तसेच ते विविध व्याख्यानांच्या माध्यमातूनही मार्गदर्शन करीत असतात. नुकताच त्यांचा ‘ऋणानुबंध’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून, त्याचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. तसेच, त्या संग्रहास विविध पुरस्कार मिळाले आहेत. ग्रामीण क्षेत्रात शहराप्रमाणे सुखसोयी नसतात, त्यामुळे इथे कष्टाला पर्याय नाही. वेळप्रसंगी निधी जमवणे किंवा पदरमोड करून विविध उपक्रम राबवण्यासारख्या गोष्टीही, प्रदीप सातत्याने करतात. अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये लोक सहभागातून स्टेजचे बांधकाम, शाळेची सजावट, रंगरंगोटी त्यांनी करून घेतली आहे. शाळेसाठी पंखे, डेक, चार-पाच कपाटे, पाण्याच्या फिल्टर या गोष्टींची सुविधाही त्यांनी ‘जिंदाल’ कंपनीच्या माध्यमातून करून घेतली.

सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दप्तरे, खाऊ, तसेच व्हिडिओ शूटिंग, डिजिटलायझेशन या गोष्टींची पहिली ओळख प्रदीप चव्हाण यांनीच करून दिली. त्यांच्या प्रयत्नामुळे बेलपाडा येथील जिल्हा परिषद शाळेला २०१७ साली, विभागातील पहिली डिजिटलाईज शाळा होण्याचा बहुमान लाभला. ग्रामपंचायत नडगाव यांच्या माध्यमातून शाळेमध्ये स्मार्ट टीव्ही, प्रिंटर या सर्व गोष्टींची सुविधा त्यांनी करून घेतली.

विद्यार्थ्यांचे हस्तलिखित तयार करणे, बाल आनंद मेळावा, मुलाखत तंत्राचा वापर, स्पर्धा परीक्षांची तयारी, पोस्टर स्पर्धा, घोषवाय स्पर्धा, भव्यदिव्य विज्ञान प्रदर्शन, लेझीम प्रात्यक्षिक, विद्यार्थ्यांच्या मुक्त अभिव्यक्तीला संधी, कार्यानुभव कार्यशाळा यांसारख्या विविध उपक्रमांचे ते आयोजन करतात. ठाणे जिल्ह्यात एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. २००३ साली इयत्ता चौथीची १०० टक्के मुले शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाली होती. त्यानंतर या इतिहासाची अनेक वेळा पुनरावृत्तीही झाली. डोंगर येथील जिल्हा परिषद शाळेचे अनेक विद्यार्थी दरवर्षी गुणवत्ता यादीमध्ये येतात. यामध्ये प्रदीप यांचे मोठे योगदान आहे.

विद्यार्थी विकासासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. वृक्षारोपण कार्यक्रम, वनराई बंधारा बांधकाम, स्वच्छता अभियान, विद्यार्थ्यांसाठी ‘एमपीएससी’च्या प्लॅटफॉर्मवर दीक्षा अ‍ॅपमध्ये शैक्षणिक व्हिडिओ तयार करणे, कोरोना काळात मुलांच्या घरी जाऊन अध्यापन करणे अशा अनेक गोष्टी त्यांनी सक्रियपणे केल्या. ‘पर्यावरण उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था’, भारत कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून कार्य करताना विविध आरोग्य शिबिरे, शैक्षणिक साहित्याचे वाटप, ब्लॅन्केट वाटप, योगाचे मार्गदर्शन, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ लक्ष सूर्यनमस्कार उपक्रम, वृक्षारोपण मोहीम, लेझीम प्रात्यक्षिकात तालुयापर्यंत मजल, गीत-गायन, नाट्य, निबंध, हस्ताक्षर, वक्तृत्व तसेच इतर अनेक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. शैक्षणिक साहित्यनिर्मिती स्पर्धेतही प्रदीप यांना अनेकवेळा तालुका स्तरावर बक्षिसे मिळाली आहेत.

प्रदीप यांचा समाजसंपर्क खूप दांडगा असून, पालकांशी मिळून-मिसळून त्यांनी शाळेचा गुणवत्ता विकास साधला आहे. विविध प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. त्यांच्या विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचा यथायोग्य गौरव झाला नसता, तर नवलच! पंचायत समिती शहापूर यांच्याकडून ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, ‘राज्यस्तरीय पर्यावरणस्नेही पुरस्कार’, ‘पर्यावरण उत्कर्ष बहुद्देशीय संस्था भारत’ यांच्याकडून ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१’, ‘आनंद कल्याणकारी संस्था भारत’ यांच्यामार्फत ‘राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार-२०२२’, ‘एमएसपी’ यांच्याकडून पुणे येथे ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२२’, कुणबी समाज मुंबई व विरार यांच्यावतीने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२२’, ‘एमएसव्ही व एमएलकेएस’ यांच्यावतीने ‘राज्यस्तरीय जनगौरव कार्यदर्पण’, ‘आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२२’, नडगाव केंद्र यांच्यावतीने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२२’, महाराष्ट्र शिक्षक पॅनेलच्यावतीने ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२२’, ‘राष्ट्रीय लोक गौरव पुरस्कार-२०२३’, राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती २०२३ द्वितीय क्रमांक, ‘राष्ट्रीय सुवर्णरत्न पुरस्कार-२०२४’ आणि नुकताच ‘रोटरी लब ऑफ ठाणे’ यांच्यावतीने ‘नेशन बिल्डर’ अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करणारे, त्यांच्यासाठी झटणारे, त्यांना विविध उपक्रमांत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणार्‍या प्रदीप चव्हाण यांच्या कार्याला दै. ’मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!