कुणबी सेनेच्या माध्यमातून कुणबी समाज एकवटला, विक्रमगड येथे निर्धार सभा संपन्न!
07-Sep-2025
Total Views |
विक्रमगड : मराठा समाजाला ‘कुणबी’ असल्याचे दाखले देण्यास सरकारने अध्यादेश काढल्यानंतर निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर, विक्रमगड येथे कुणबी सेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात निर्धार सभा आयोजित करण्यात आली. या सभेत कुणबी समाजाच्या अस्तित्वासाठी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्धार करण्यात आला.
हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन मराठा समाजाला ‘कुणबी’ असल्याचे दाखले देण्याचा निर्णय चुकीचा असून, त्याचा कुणबी समाजावर विपरीत परिणाम होत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सरकारला थेट इशारा देत सांगितले की, “मराठ्यांना कुणबी दाखले देण्याच्या विरोधात जर आंदोलन करावे लागले, तर कुणबी समाजही मागे राहणार नाही.”
सभेत बोलताना पाटील म्हणाले, “सरकार मनोज जरांगे यांना घाबरत असून, ते ज्या पद्धतीने अध्यादेश मागतात, सरकार तितक्याच तत्परतेने निर्णय घेत आहे. मात्र या धोरणामुळे कुणबी समाजाच्या ओळखीवर गदा येत आहे. आमचा समाज एकवटला असून आम्हीही आमच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरू.”
ओबीसी समाजामध्ये एकसंघता नसल्यामुळे काही मंडळी कुणबी समाजाला या प्रवर्गातून बाहेर काढण्याच्या सूचना करत आहेत, ही बाब धोकादायक असून त्याविरोधात स्वतंत्र लढा उभारण्याची गरज असल्याचे वक्तव्य यावेळी करण्यात आले.
या निर्धार मेळाव्याला मराठवाडा, विदर्भ, कोकणसह राज्यभरातून असंख्य कुणबी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात 'कुणबी समाजाला स्वतंत्र ओळख, स्वतंत्र आरक्षण' ही मुख्य मागणी सर्वांनी ठामपणे मांडली.
कार्यक्रमाच्या शेवटी, सरकारला इशारा देण्यात आला की, “कुणबी समाजाच्या हिताला धक्का लावणारा कोणताही निर्णय मंजूर होणार नाही. आमचा इतिहास, आमची ओळख कायम ठेवण्यासाठी सर्वत्र संघटित लढा उभारण्यात येईल.”