चिंचोटी- कामण काँक्रीट रस्ता कॉंक्रीटचा होणार; कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश
07-Sep-2025
Total Views |
भिवंडी : मुंबई- आग्रा महामार्ग आणि मुंबई- अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या चिंचोटी -कामण रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाची २२९ कोटी ११ लाख रुपयांची निविदा मंजूर झाली असून, येत्या दोन महिन्यांत कॉंक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या रस्त्याच्या कामामुळे दररोज हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या रस्त्याच्या मंजुरीसाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून पाठपुरावा केला जात होता.
चिंचोटी -कामण रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. त्यामुळे काही महिन्यांपासून वाहतूककोंडीत प्रवाशांचे हाल होत होते. या रस्त्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्याच्या २२९ कोटी ११ लाख रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, या कामाच्या निविदेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले होते. गेल्या तीन महिन्यांपासून मुसळधार पावसामुळे दररोज प्रवाशांच्या हालात भर पडली होती.
या प्रश्नासंदर्भात माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर निविदेतील तांत्रिक अडचणी दूर करण्यात यश आले. आता पावसाळा संपल्यानंतर लगेच रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळवून देण्याबाबत महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत.