शतकातील पहिला संत?

    07-Sep-2025   
Total Views |

तंत्रज्ञानाच्या युगामध्ये धर्माचार, धर्मप्रसार तसेच धर्माचे लोकांवरील नियंत्रण कमी होईल, असे मत काही समाजशास्त्रज्ञांनी एकेकाळी व्यक्त केले होते. आधुनिक युगातील सामाजिक, राजकीय संकल्पना मानवाच्या उत्कर्षाभोवती फिरताना, धर्म ही बाब माणसाच्या उपयोगाची असेल की नाही, यावरसुद्धा बराच विचार केला गेला. मात्र, माणसाच्या जीवनातील धर्माचे स्थान अबाधितच राहिले. किंबहुना, धर्मविचारानेसुद्धा स्वीकारलेले आधुनिकतेचे प्रारूपामुळे, आपला विचार शाश्वत ठेवण्यासाठी किती वेगवेगळ्या मार्गांनी धार्मिक संस्थांचे प्रयोजन सुरू आहे, याची आपल्याला प्रचिती येते. उदाहरण घ्यायचे झाल्यास रविवारी व्हॅटिकन सिटी येथील एका सोहळ्याचे देता येईल.

ख्रिस्ती धर्मातील ‘कॅथलिक पंथाचे शक्तिपीठ’ अशी व्हॅटिकन सिटीची ओळख आणि पोप हे तिथले सर्वोच्च पद. आधुनिक युगामध्ये धर्माच्या विचाराला तिलांजली देत, चुकीच्या मार्गावर चालणारे अनेक तरुण आपल्याला दिसतात. अशा तरुणांच्या आयुष्याला दिशा मिळावी, त्यांनी ख्रिस्ती धर्माचं पालन करावं, यासाठी विविध उपयोजना चर्चच्या माध्यमातून केल्या जातात. धर्मप्रसार, धर्म परिवर्तन हा त्यातलाच एक भाग. परंतु, विशेषतः युवकांना आपल्या समूहामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी, त्यांच्यातल्याच एखाद्या उमद्या तरुणाची प्रतिमा त्यांच्यासमोर ठेवणे आवश्यक असल्याची जाण, चर्चच्या वरिष्ठांना आहेच. हाच विचार मनात ठेवून, रविवारी कार्लो युटिस या दिवंगत तरुणाला संतपद बहाल करण्यात आले.

हजारो ख्रिस्ती प्रचारक, अनुयायी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. कार्लो युटिस हा या शतकातील पहिला संत असल्यामुळे, त्याला ‘गॉड्स इन्फ्लुएन्सर’ असेसुद्धा संबोधण्यात आले. ‘मिलेनियम’ आणि ‘जेन-झी’ या श्रेणीतील युवकांना ख्रिस्ती धर्माच्या वाटेवर चालण्यास याची मदत होईल, असे मतही अनेकांनी व्यक्त केले. कार्लो युटिस या इटलीतील युवकाचे वयाच्या १५व्या वर्षी, रक्ताच्या कर्करोगामुळे निधन झाले. त्यापूर्वी त्याचे आयुष्य चारचौघांप्रमाणेच होते. टी-शर्ट, जीन्सवर फिरणार्या कार्लोला प्राण्यांचे व्हिडिओ काढण्याचा छंद होता. कार्लोच्या मनावरही ख्रिस्ती धर्माच्या संस्कारांचा प्रभाव होता. अनाथ आणि बेघर मुलांना मदत करणे, घटस्फोटित पालकांच्या मुलांना मदत करणे अशा अनेक गोष्टी तो लहानपणी करायचा, असे त्याच्या आईने माध्यमांना सांगितले. डिजिटल युगामध्ये इंटरनेटचा वापर अनेक चुकीच्या कारणांसाठी होऊ शकतो, याची त्याला जाणीव होती. म्हणूनच आपण इंटरनेटचा वापर धर्मप्रसारासाठी करायला हवा, असा विचार करून त्याने तरुणांमध्ये धर्मप्रसाराला सुरुवात केली.

कार्लो युटिसबरोबर पियर जॉर्जिओ फ्रासॅटी या तरुणालाही संतपद बहाल करण्यात आले. पियर जॉर्जिओ फ्रासॅटी हा मागच्या शतकातील तरुण. कार्लो युटिस या तरुणाने अनेक चमत्कारांचे डिजिटल दस्तऐवजीकरण केले. चेलेसा येथील एका चर्चमध्ये, हे दस्तऐवज सध्या प्रदर्शनासाठी उपलब्ध आहेत. कार्लोला मृत्यूनंतर संतपद मिळावे यासाठी, त्याच्या आईने चर्चकडे याचना केली होती. संतपद बहाल करण्यासाठी सदर विभूतिकडून चमत्कार घडला आहे, हे सिद्ध करावे लागते. अर्थात ते कार्लोच्या आईकडून सिद्धदेखील करण्यात आले. कार्लो मृत्यूशय्येवर असताना त्याच्यासाठी एका महिलेने प्रार्थना केली, त्यानंतर तिचा कर्करोग बरा झाल्याचा दावा कार्लो यांच्या आईने केला. हे आणि अशा आणखी काही चमत्कारांना स्वीकारून, कार्लो या दिवंगत तरुणाला संतपद देण्यात आले आहे. मध्यंतरी पोप फ्रान्सिस यांच्या मृत्यूमुळे ही प्रक्रिया लांबली होती.

कार्लो हा येणार्या पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल, अशी अनेक ख्रिस्ती बांधवांना आशा आहे. त्यायोगचे या धर्मसंस्थेशी लोक जोडले जातील आणि ख्रिस्ती धर्माचा प्रचार-प्रसार होईल. अलीकडे युरोपीय राष्ट्रांमध्ये ‘जेन झी’चा कल ख्रिस्ती धर्माकडे वळला आहे, असे काही सर्वेक्षणांमधून दिसतेे. दुसर्या बाजूला चर्चमधील पाद्र्यांच्या माध्यमातून किशोरवयीन मुलांचे होणारे लैंगिक शोषण आणि त्याविरोधातील चळवळ, अशा दोन टोकांमध्ये आपल्याला या संतपदाच्या सोहळ्याचा विचार करावा लागतो. तंत्रज्ञानाचे युग असो किंवा औद्योगिकरणाचे, संतपदाचे असे ‘चमत्कार’ मानवजातीची पाठ सोडत नाही हे मात्र खरे!

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.