
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते ऑनलाईन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत, ‘जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-२’चे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमात, "भारत-सिंगापूर संबंध राजनैतिकतेच्या पलीकडे आहेत,” असे पंतप्रधान मोदी यांनी वोंग यांच्या उपस्थितीत सांगितले. त्यामुळे कंटेनर जहाजे हाताळण्यात जगातील दुसर्या क्रमांकावर असलेल्या सिंगापूरसोबत भारताने सागरी क्षेत्रात केलेली हातमिळवणी, भारताला निश्चितच नवी उंची गाठण्यात मदत करेल, यात शंका नाही. अशावेळी सिंगापूरमधील ‘पीएसए’विषयी जाणून घेणे इथे क्रमप्राप्त ठरते.
‘पीएसए’ सिंगापूर म्हणजेच ‘पोर्ट ऑफ सिंगापूर ऑथोरिटी’ हा इंटरनॅशनल टर्मिनल क्षेत्रात, जागतिक स्तरावर एक आघाडीचा बंदर समूह आहे. याचे जागतिक नेटवर्क ४५ देशांमध्ये १७९ ठिकाणी आहे. ‘पीएसए’ सिंगापूर एकूण ५५ बर्थ आणि ४३.९ दशलक्ष टीईयुची वार्षिक क्षमता असलेले जगातील सर्वांत मोठे ‘कंटेनर ट्रान्सशिपमेंट हब’ चालविते. २०२३ मध्ये ‘पीएसए’ सिंगापूरने ३८.८ दशलक्ष टीईयु कंटेनर हाताळले. या समूहाची जागतिक स्तरावर ६०० बंदरांशी जोडणी असल्याने, शिपर्सना जगातील प्रत्येक प्रमुख बंदरावर दररोज नौकाविहार करण्याची सुविधा आहे, जे वर्षभर २४ तास कार्यरत असतात.
पूर्वी ‘पोर्ट ऑफ सिंगापूर ऑथोरिटी’ म्हणून ओळखले जाणारे ‘पीएसए’, १९६०च्या दशकात सिंगापूर बंदराचे नियमन, संचालन आणि प्रचार करणारे एक वैधानिक मंडळ होते. १९७०च्या दशकात ‘पीएसए’ने कंटेनर पोर्ट सुरू केले आणि त्यांचे पहिले कंटेनर जहाज हाताळले. पुढील दशकांमध्ये ‘पीएसए’चा विस्तार झाला आणि १९९० सालापर्यंत पाच दशलक्ष टीईयुचा टप्पा गाठला. यामुळेच सिंगापूर हे त्यावेळचे जगातील सर्वांत मोठे कंटेनर पोर्टही बनले. १९९६ साली ‘पीएसए’ची नियामक कार्ये, सिंगापूरच्या नवीन सागरी नियामक ‘मेरीटाईम अॅण्ड पोर्ट ऑथोरिटी ऑफ सिंगापूर’कडे (एमपीए) हस्तांतरित करण्यात आली. दि. २५ ऑगस्ट १९९७ रोजी ‘पोर्ट ऑफ सिंगापूर ऑथोरिटी’ या संस्थेचे स्वतंत्र व्यावसायिक कंपनीत रूपांतरित करण्यासाठी, एक संसदीय विधेयकही मंजूर करण्यात आले. त्यामुळे दि. १ ऑटोबर १९९७ रोजी हे कॉर्पोरेटाइज्ड कंपनी झाले. याचवेळी ‘पोर्ट ऑफ सिंगापूर ऑथोरिटी’ हे नाव वगळण्यात आले. त्यानंतर कंपनीला ‘पीएसए’ इंटरनॅशनल किंवा फक्त ‘पीएसए’ असे संबोधण्यात येऊ लागले, अशी माहिती त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळते. आज ‘पीएसए’ हा जगातील आघाडीचा बंदर आणि टर्मिनल गट आहे.
‘पीएसए’चे मुख्य कार्य ट्रान्सशिपमेंट म्हणजे, एखादे मालवाहू सामान आपल्या अंतिम गंतव्यस्थानाकडे जाताना एका जहाजातून दुसर्या जहाजात हलविण्याची प्रक्रिया करणे हे आहे. हीच ‘पीएसए’ सिंगापूरची मुख्य व्यावसायिक क्रिया आहे. आग्नेय आशियाच्या मध्यभागी असलेले सिंगापूरचे धोरणात्मक स्थान आणि प्रमुख शिपिंग मार्गांच्या जोडणीमुळे, ते एक महत्त्वाचे लॉजिस्टिक हब आणि जागतिक पुरवठा साखळीतील एक प्रमुख केंद्र झालेे आहे. या कनेटिव्हिटीमुळेच लहान फीडर जहाजे मोठ्या जहाजांवर लोड करण्यासाठी सिंगापूर बंदरात कंटेनर आणता. ट्रान्सशिपमेंटचे मूल्य वेळेची बचत आणि खर्चाच्या कार्यक्षमतेमध्ये आहे. शिपिंग लाईन्स ट्रान्सशिपमेंटच्या पद्धतींसाठी ‘पीएसए’ वापरतात. ट्रान्सशिपमेंटची संकल्पना खर्या अर्थाने जगाला जोडते, यामुळे कोणत्याही भागातून कंटेनर पाठवता येतो.
‘पीएसए’ सिंगापूर (पीएसए) आणि ‘कार्गो कम्युनिटी नेटवर्क’ (सीसीएन) यांनी ऑगस्ट महिन्यात, ‘ऑप्टेमॉडल लॉन्च’ करण्याची घोषणा केली. हा एक नेस्ट जनरेशन डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ‘ऑप्टेमॉडल’ हे एक ‘इंटरमॉडल शिपमेंट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म’ आहे, जे लॉजिस्टिस समुदायाला मल्टीमॉडल शिपमेंट ट्रॅक करण्यास आणि मोड ट्रान्सफर दरम्यान संभाव्य जोखीम व्यवस्थापित करण्यास सक्षम करते. अशा रितीने अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज आणि जागतिक पातळीवर सर्वोच्च ट्रान्सशिपमेंट सेवा देणार्या ‘पीएसए’ने, भारतात आणि उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्रात आपली सेवा सुरू केली आहे. भारतातील सर्वांत अद्ययावत आणि ‘डीएफसी’सोबत अनुरूप असलेले पहिले कंटेनर टर्मिनल पोर्ट जवाहरलाल नेहरू बंदर पीएसए, मुंबई ठरले आहे.