खानिवडे (पालघर) , कामण येथील आश्रमशाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन गिरिजाराम वेल्फेअर फाऊंडेशनच्या सहकार्याने करण्यात आले. शाळेचे चेअरमन केदारनाथ म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात, फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भोस्कर यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.
भोस्कर यांनी सांगितले की, "शिक्षक हे केवळ ज्ञानदान करणारे नाहीत, तर विद्यार्थ्यांचे आणि समाजाचे शिल्पकारही आहेत." विशेषतः आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक तन, मन आणि धन अर्पण करून योगदान देत आहेत, याची त्यांनी विशेष प्रशंसा केली.
या कार्यक्रमात फाऊंडेशनच्या वतीने सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ व हरिपाठाची पुस्तके देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात केदारनाथ म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "शिक्षकांचा सन्मान हा केवळ एक दिवसापुरता मर्यादित नसावा. विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिक्षकांकडून मिळणाऱ्या ज्ञानाचा आदरपूर्वक स्वीकार करावा आणि त्यासोबतच निसर्ग, प्राणी, समाज यांच्याकडून मिळणारे अनुभवजन्य ज्ञान आत्मसात करावे."
त्यांनी पुढे असेही नमूद केले की, "स्वतःला, स्वात्म्याला गुरु मानून ज्ञानार्जनाची वाट चालणे हेच खरी शिक्षणाची दिशा आहे."
मुख्याध्यापक पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाची सांगता स्वाती पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आली.