मुंबई, मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना धारावीकरांना मात्र वेगळ्याच चिंतेने ग्रासले आहे. गणेशोत्सवापूर्वी झालेला मुसळधार पाऊस आणि इतर विविध कारणांमुळे धारावीतील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये मूषकांचा सुळसुळाट वाढला आहे. हा उपद्रव रोखण्यासाठी धारावीकरांनी लाडक्या बाप्पालाच साकडे घातले आहे.
वास्तविक, उंदरांचा प्रादुर्भाव धारावीसाठी नवा नाही. जागोजागी साचलेले पाणी, सणासुदीमुळे गोडधोड पदार्थांची असलेली रेलचेल, ठिकठिकाणी मंडपांसाठी केलेले खड्डे, उत्सवाच्या दिवसांत वाढलेला फळांचा- फुलांचा वापर अशा विविध कारणांमुळे उंदरांचा उपद्रव अधिकच वाढलेला दिसत आहे. याला कारणीभूत असलेली अस्वच्छता, दुर्गंधी, उघडी गटारे, खड्डेमय रस्ते या सगळ्यांपासून मुक्ती देणारा पुनर्विकास लवकरच व्हावा, अशी प्रार्थनाही स्थानिकांनी गणरायाकडे केली आहे.
"यंदा उंदराचा त्रास वाढलेला दिसून येतो. बहुतांशी सार्वजनिक मंडळांना आम्ही उंदीर पकडण्याचे बॉक्स दिले आहेत. हे बॉक्सेस आम्ही गणपती मंडपाच्या चारही बाजूला ठेवतो. यात खाद्यपदार्थ असल्याने उंदीर आकर्षित होतात आणि या बॉक्समध्ये अडकतात. त्यानंतर या उंदरांना कोणतीही इजा न करता राजीव गांधी नगरमधील खाडीमध्ये सोडून देतो."
- रोहित परब,जय बजरंगबली मित्र मंडळ, खांबदेव"आमच्या चाळीच्या मधूनच छोटे नाले जात असल्याने आणि आजुबाजूचा परिसर तितकासा स्वच्छ नसल्याने उंदरांचा त्रास हा वर्षभर असतोच. बाप्पाच्या समोर घरातील लोकांना सतत पहारा द्यावा लागतो. या बिकट परिस्थितीतून आम्हाला गणपती बाप्पाच बाहेर काढेल, याची मला खात्री आहे. आमच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या पुनर्विकासासाठी बाप्पा आमच्या पाठीशी उभा राहील आणि आमच्या नव्या घरात कोणत्याही त्रासाशिवाय बाप्पा विराजमान होईल."
- लव चाळके, जनता नगर, धारावी "धारावीत दिवसापेक्षा रात्री उंदरांचा सुळसुळाट जास्त असतो. पालिका प्रशासनाच्या अपुऱ्या सोयीमुळे उंदरांचा उपद्रव वाढला आहे. माझ्या मते, धारावीचा सुयोग्य पुनर्विकास झाला तर इथे मूलभूत सुविधा मिळतील आणि स्थानिकांना उंदरांच्या उपद्रवापासून दिलासा मिळेल."
- वकील अहमद शेख, माजी नगरसेवक वॉर्ड क्रमांक १८८