मुंबई : कर्जत तालुक्यातील दामत गावात केवळ मुस्लिमांसाठी 'हलाल लाइफस्टाइल'वर आधारित टाउनशिप तयार केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंबंधित माहिती देणारा एक व्हिडिओ नुकताच समोर आलाय. व्हायरल व्हिडिओनंतर संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापर्यंत पोहोचले आहे. आयोगासमोर दाखल केलेल्या तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, ही टाउनशिप केवळ मुस्लिम समुदायासाठी विकसित आणि प्रचारित केली जात आहे, जी सांप्रदायिक पृथक्करणाला प्रोत्साहन देते आणि संविधानातील समानता आणि भेदभावविरोधी तरतुदींचे उल्लंघन आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पाठवलेल्या तक्रारीत तक्रारदाराने अशी भीती व्यक्त केली आहे, की या प्रकारचा प्रकल्प केवळ सामाजिक आणि संवैधानिक मानकांच्या विरुद्ध नाही तर सुरक्षितता आणि सामाजिक दृष्टिकोनातून धोकादायक देखील ठरू शकतो. भविष्यात हा परिसर कट्टरपंथी क्षेत्रात बदलू शकतो असा आरोप आहे. आयोगाने या तक्रारीला प्रथमदर्शनी गंभीर मानवाधिकार उल्लंघन मानत महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये दोन आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्यास आणि रेराने कोणत्या तरतुदींनुसार अशा प्रकारची परवानगी किंवा परवाना दिला आहे, हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियंक कानूनगो यांनी त्यांच्या एक्सवर सदर व्हिडिओ शेअर करत लिहिले, “ही जाहिरात नाही तर एकप्रकारे विषप्रसार आहे. मुंबईजवळ कर्जत भागात फक्त मुस्लिम धर्मियांसाठी हलाल लाइफस्टाइलवर आधारित टाउनशिप तयार केली जाणे हे 'नेशन विदिन द नेशन' आहे.
व्हिडिओ मध्ये नेमके काय?
व्हिडिओमध्ये हिजाब घातलेली एक महिला म्हणताना दिसते, “जेव्हा सोसायटीमध्ये आपल्या कुटुंबासाठी तत्त्वांमध्ये तडजोड करावी लागते, तेव्हा ते योग्य आहे का? ‘सुकून एम्पायर’मध्ये ऑथेंटिक कम्युनिटी लिव्हिंग आहे, समान मूल्यं शेअर करणाऱ्या समविचारी कुटुंबांसोबत राहता येते. मुलं अगदी हलाल वातावरणात सुरक्षितपणे वाढतात. वडीलधाऱ्यांना सन्मान आणि काळजी मिळते. ही इन्व्हेस्टमेंट फक्त तुमच्या पैशांना नाही, तर तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासुद्धा सुरक्षित करेल.” या टाऊनशिप परिसरात थोड्याच अंतरावर इस्लामिक प्रार्थनास्थळाची सुविधा देखील उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रतिक्रिया :
नेरळचा इस्लामीक स्टेट करण्याचा डाव हा गझवा-ए-हिंदचा प्रकार आहे. सुकून एम्पायर हलाल रेसिडेन्सी नेरळ जवळच्या दामत येथे तयार होत आहे. त्यामुळे इस्लामच्या दृष्टीने सुखसुविधा देण्यात येणार आहेत. धर्माच्या आधारावर असे प्रकल्प उभारू शकत नाही. दामतच्या आजूबाजूच्या प्रकल्पांमधून हिंदूंचे पलायन होत आहे. हिंदूंना नाहक त्रास दिला जात आहे. तसे वातावरण तयार केले जात आहे. विशिष्ट समुदायाची लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यांना कोणीतरी बोलवत आहे.व्होट जिहादचा नारा देणारा सज्जाद नोमाणी हा मदरसा चालवतो. त्याला भेटायला पाकिस्तानचा मौलाना येतो. यातून कनेक्शन उघड आहे. त्यांनी नेरळचे एन्ट्री पॉईंट बंद केले आहेत. पडघ्यात जसा इस्लामीक स्टेट करण्याचा प्रयत्न झाला तसा नेरळमध्ये डाव आहे. नेरळचा मिनी पाकिस्तान झाला आहे. - शाम कडव, प्रखंड मंत्री, विश्व हिंदू परिषद कर्जत
हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथे सर्वधर्म समभाव असतानाही केवळ एकच धर्मासाठी बांधकामांना परवानगी देणे चुकीचे होईल. याबाबतीत महाराष्ट्र सरकारने कारवाई करणे जरुरीचे आहे. - रवींद्र भोईर, सहचिटणीस, शेकाप, कर्जत
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक