मुंबईत ईदच्या सुट्टीत बदल! ५ सप्टेंबर ऐवजी 'या' दिवशी मिळणार सुट्टी

    04-Sep-2025   
Total Views |

मुंबई : (Eid-e-Milad Holiday in Mumbai Rescheduled) महाराष्ट्र सरकारने मुंबईसाठी ईदच्या सुट्टीत बदल केला आहे. यापूर्वी शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता मुंबई आणि मुंबई उपनगर करिता ही सुट्टी सोमवार, दि. ८ सप्टेंबर रोजी असणार असल्याची घोषणा सामान्य प्रशासन विभागाने केली आहे.

अनंत चतुदर्शीनिमित्त ६ सप्टेंबर रोजी मुंबईत मोठ्या प्रमाणात श्रीगणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्यामुळे अनेकांनी ईदची सुट्टी पुढे ढकलण्याची मागणी केली होती. ही मागणी विचारात घेत सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात शासन परिपत्रक काढले आहे. परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यासाठी ८ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र ५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी कायम असेल. शुक्रवारी ५ सप्टेंबरला मुंबईतील सर्व शासकीय कार्यालये नियमित पद्धतीने काम करतील. शाळा आणि महाविद्यालयेही सुरूच राहणार आहेत. शुक्रवार ऐवजी त्यांना सोमवारी सुट्टी देण्यात येईल.

राज्यात बंधुता आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी विविध मुस्लिम संघटनांची बैठक झाली. या बैठकीत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जन्मदिनी काढण्यात येणारा जुलूस सोमवार दि. ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्याचा सर्वानुमते निर्णय झाला. त्यामुळे या दिवशी राज्य शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने सुट्ट्यांमध्ये बदल करत निर्णयाची अंमलबजावणी केली आहे.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\