मुंबई : अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासाठी हिंदू मंदिरांनी कोट्यवधी रुपयांची पारदर्शक मदत सरकारकडे पाठवली. पण राज्यातील अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळे दर्गा-मशिदी मागे का आहेत?, असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी केला.
केशव उपाध्ये म्हणाले की, "अतिवृष्टी आणि महापूराच्या वेढ्यात सापडलेल्या महाराष्ट्रात लाखो कुटुंबे संकटात सापडली, शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अशा कठीण प्रसंगी तुळजाभवानी मंदिर, शेगाव गजानन महाराज संस्थान, सिद्धिविनायक मंदिर यांसारख्या हिंदू मंदिरांनी कोट्यवधी रुपयांची पारदर्शक मदत सरकारकडे पाठवली. कितीतरी मंदिरे, ट्रस्ट, सार्वजनिक मंडळांनी आपापल्या परीने अन्न, निधी आणि जीवनावश्यक वस्तू संकटग्रस्तांपर्यंत पोहोचवून माणुसकीचे दर्शन घडविले. पण राज्यातील अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळे दर्गा-मशिदी मागे का आहेत? त्यांच्या व्यवस्थापनाकडे कोट्यवधींचा निधी असतानाही एकही ठोस मदतीची जाहीर घोषणा, निधीची उघड माहिती किंवा पूरग्रस्तांसाठी दिलासा का नाही?," असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "कधी बोगस हिंदुत्वाचे बेगडी मुखवटे चढवून तर कधी गंगाजमनी तहजीबचे प्रेम दाखवत मंदिरांची टिंगल आणि हिंदूंवर टीका करणाऱ्या लांगूलचालनवादी नेत्यांनी आणि विचारवंतांनी हे प्रश्न आज स्वत:ला विचारायला हवेत. प्रश्न हिंदू-मुस्लिमचा नाही प्रश्न संवेदनशीलतेचा आहे," असेही केशव उपाध्ये म्हणाले.
"जवळपास सगळा महाराष्ट्र आज अतिवृष्टीच्या संकटात सापडला आहे. अशावेळी हिंदूंची सगळी देवस्थाने या आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावून आली आहेत. शेगावचे संस्थान, पंढरपूरचे मंदीर, साईबाबा मंदीर, सिद्धीविनायक मंदीर, तुळजाभवानी मातेचे मंदीर या सर्व देवस्थानांनी आपापल्या परीने मदत केली आहे. पण आज महाराष्ट्रातील दर्गे आणि मशीदी कुठे गेल्यात? गंगा जमुनी तहजीब, हिंदू मुस्लिम ऐक्य आणि सर्वधर्म समभाव असा टेंभा मिरवणारे आता कोणत्या बिळात लपून बसलेत? मशिदी आणि चर्चमधून महाराष्ट्राला मदत का होत नाही?" - आचार्य तुषार भोसले, भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....