दार उघड बये, दार उघड

    30-Sep-2025   
Total Views |

विरारच्या त्या महाविद्यालयामध्ये नवरात्रोउत्सव साजरा होत होता. गरबा असल्याने अर्थातच हिंदू कुटुंबातल्या मुली महिला, नटूनथटून रात्री उशिरापर्यंत गरबा खेळणार हे निश्चित होते. नेमके याचवेळी तिथे असणाऱ्या शाहीद आणि फैज या दोघांचे मोबाईल संभाषण उघड झाले. त्यात ते म्हणत होते, एकाही हिंदू मुलीला सोडू नका. तसेच त्या मुलींशी अश्लील वर्तन आणि छेडछाड करण्यासंदर्भातही संभाषण त्यांच्यात झाले. काय म्हणावे याला? यांना मूर्तिपूजा हराम आहे. यांच्या मते हिंदू काफीर आहेत, म्हणजे एका अर्थाने शत्रूच. मात्र, त्याचवेळी हिंदूंच्या मुलींचे शोषण म्हणजे यांच्या मते पुण्य आहे का? मुलींच्या वेशभूषा किंवा नृत्याबद्दल आक्षेप नाही मात्र, त्यानिमित्ताने या असल्या घाणेरड्या मनोवृत्तीच्या लोकांचे काय करायचे? नवरात्रोत्सवामध्ये नटून-थटून घोळक्याने येणार्या मुली आपल्यासाठीच असून, त्यांचे शोषण केलेच पाहिजे ही मानसिकता या धर्मांधांमध्ये आहे. दुसरीकडे काही हिंदूही असे आहेत की, ज्यांचे म्हणणे आहे की त्यांच्यातले काही लोक असे वाईट आहेत, म्हणून सगळ्यांवरच संशय का घ्यावा? पण सत्य हेच आहे की, निर्घृणपणे खून होणार्या अत्याचाराचा सामना करणार्या हिंदू मुलींची संख्या जास्त असून, त्या मुलींचीही अशी अवस्था करणार्यांबद्दलची सुरुवातीची भूमिका ‘मेरा अब्दुल वैसा नही’ हीच होती. असो!

आता पोलिसांनी विरारच्या घटनेमध्ये संबंधितांवर ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’नुसार ‘२९९’, ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’नुसार ‘३(५)’, ‘महिला तस्करी अधिनियम, २०००’नुसार ‘६७अ’ यानुसार गुन्हा नोंदवला आहे. पण या घटनेतील आरोपी शाहीद आणि पैज या दोघांनीही हिंदू मुलींना प्रताडित करण्याचे नियोजन का केले? यातून त्यांचा काय फायदा होता? याचा सांगोपांग मागोवा कायदा सुव्यवस्थेने घ्यायलाचा हवा आणि तो प्रसिद्धही करायला हवा. कारण हिंदूचे प्रत्येक सणउत्सव, गाव-तालुक्यातला आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालय रस्ते यावर असले कितीतरी शाहीद आणि फैज हिंदू मुलींच्या डोळ्यांत धूळ फेकत आहेत. त्यांचे सत्य समाजासमोर आलेच पाहिजे. नवरात्रीनिमित्त देवीला प्रार्थना आहे, आई अंबाबाई, विकृतांविरोधात हिंदू शक्तीचे दार उघड, दार उघड बये दार उघड!

सेलिब्रिटी देव आहेत का?


करूर येथे ४१ लोक मरत होते आणि १००च्या वर लोक जखमी होत होते. त्यावेळी हे लोक ज्यांच्यासाठी आलेले, त्या विजय थलपती-खरे नाव सी. जोसेफ विजय तिथून निघून गेला. लोकांना ‘कॉमरेड’ म्हणणारा विजय, सुरक्षाकवचामध्ये थेट चेन्नईला पोहोचला आणि तिथून त्याने समाजमाध्यमावर लिहिले की, माझं हृदय विदीर्ण झाले असून, असह्य वेदनेने तळमळतोय. मात्र, यावर असेच वाटते की, चाहते तडफडून हकनाक मरत असताना,तो ते गाव सोडू तरी कसा शकला? इतकी असंवेदनशीलता?
तामिळनाडूच्या करूरमध्ये विजयच्या तमिलगा वेत्त्री कजगम या राजकीय पक्षाच्या रॅलीसाठी लोक जमले होते. मुख्य आकर्षण होते, सुपर हिरो थलपती विजयला जवळून पाहाणे.

ठरलेल्या वेळेपेक्षा विजय सात तास उशिरा आला, तोपर्यंत प्रचंड गर्दी जमली होती. दहा हजारांची क्षमता असलेल्या जागेत ३० हजार लोक गोळा झाले. या गर्दीत विजय वाहनावर उभे राहून बोलत होता. आपल्या आवडत्या अभिनेत्याला जवळून पाहण्यासाठी, लोक धक्काबुक्की करत होते. सात-आठ तासांपासून तिथे असलेले लोक तहानलेले आणि भुकेलेले होतेच. काही लोक झाडावरही बसले होते. लोकांच्या गर्दीमध्ये काही अघटित घडू नये, यासाठीचे कोणतेच नियोजनही नव्हते. अशा या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी तिथे कोणती यंत्रणाही नव्हती. भाजपला सगळ्यांत मोठा विरोधक मानणार्या तमिलगा वेत्त्री कजगम पार्टीचे कार्यकर्ते यावेळी कुठे गेले होते? पोलीस किंवा अॅम्ब्युलन्सही गर्दीपर्यंत पोहोचूच शकली नाही. लोकांना बाहेर जाण्यासाठी अधिक मार्गही उपलब्ध नव्हते. त्यामुळे अनियंत्रित गर्दीमध्ये प्रचंड चेंगराचेंगरी झाली. या सगळ्यात ४१ लोक हकनाक मृत्युमुखी पडले, तर १०० लोक जखमी आहेत. या घटनेचे आरोपी म्हणून पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना पकडले आहे. पण यामुळे निर्माण होतो तो म्हणजे, खरंच अशा कार्यक्रमांची गरज आहे का? या अशा सभांचे नियोजन आयोजकांनी योग्य केले का, हे कसे पाहणार? सेलिब्रिटींनी उपस्थित राहताना असल्या कार्यक्रमाची माहिती घेणे आवश्यक आहे की नाही? सगळ्यांत महत्त्वाचे की, सेलिब्रिटींना देव किंवा श्रद्धास्थान मानणाऱ्या लोकांचे काय करायचे? सेलिब्रिटी देव आहेत का?




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.