मुस्कुरा लाडले मुस्कुरा...

    30-Sep-2025
Total Views |

मुस्कुरा लाडले मुस्कुरा
देखो रोना हैं बुरा
राग हैं ये बेसुरा...
जो सदा हसते रहे
आसू ना जिनके बहे...
मुस्कुरा लाडले मुस्कुरा...
गुलशन बावरा यांनी लिहिलेल्या आणि मेहमूद या गुणी नटाने गायलेल्या खूप जुन्या हिंदी गाण्याच्या ओळी ऐकत असताना मला या लेखाचे सूत्र सापडले. आपल्या दैनंदिन जीवनातील गडबडीत आपण किती वेळा हसायला विसरतो, याचा विचार केला आहे का? पण, एखाद्या साध्या हास्याच्या लहरीने, अगदी नकळत, आपले
मन हलके होते, शरीराला ऊर्जा मिळते आणि आयुष्य उजळून निघते.

शस्य ही अशी भाषा आहे, जी जगभर समजली जाते. कोणत्याही भाषेत किंवा संस्कृतीत, हसू नाती घट्ट करते. एखाद्या मित्राचा किंवा अपरिचित व्यक्तीचा हसरा चेहरा सहज विश्वास निर्माण करतो. हसण्याचे महत्त्व तत्त्वज्ञानातही अभ्यासले गेले आहे. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ, सॉक्रेटिस आणि प्लेटो यांनी हास्याला आपल्या अंतरात्म्याच्या आनंदाचे प्रतिबिंब मानले आहे. अरिस्टॉटल आपल्या ‌‘सुख‌’ या तत्त्वग्रंथात म्हणतात की, “खरा हसरा चेहरा म्हणजे युडेमोनिया-माणसाच्या समृद्धी, आरोग्य आणि मानसिक तृप्तीची अभिव्यक्ती!”

अस्तित्ववादानुसार, जीन-पॉल सार्त्र आणि फ्रेडरिक नित्शे यांनी हसण्याच्या अर्थावर विरोधाभासी दृष्टिकोन मांडले आहेत. सार्त्रच्या मते, हसू कधीकधी खोट्या भावनांचा आवरण असू शकते, जे सामाजिक मुखवटे म्हणून वापरले जाते, तर नित्शे हसण्यास आपल्या ऊर्जेची अभिव्यक्ती, निराशेविरुद्ध एक प्रतिकार आणि जीवनाला सामोरे जाण्याचा प्रतीक मानतो. पूर्वेकडच्या तत्त्वज्ञानातदेखील हसण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

बौद्ध तत्त्वज्ञानात हसू प्रबोधन आणि शांतीशी संबंधित आहे. बुद्धांच्या सूक्ष्म हसऱ्या तेजस्वी चेहऱ्याची प्रतिमा अंतर्मनातील शांततेचे आणि दुःखापासून मुक्तीचे प्रतीक आहे. ताओ तत्त्वज्ञानात हसू नैसर्गिक जीवनप्रवाहाशी सुसंगती दर्शवते, ज्यामुळे मनःशांती आणि संतुलन हसण्याद्वारे साधता येते.

सौंदर्याचे नैसर्गिक औषध

सौंदर्य स्पर्धेत सर्वांत महत्त्वाचे सौंदर्य साधन म्हणजे तुमचे हास्य! खऱ्या हास्याने, एक सरासरी चेहरा सुंदर बनवला जातो आणि एक सुंदर चेहरा अप्रतिम बनवला जातो. आपण सौंदर्यप्रसाधनांवर भर देतो, पण खरं सौंदर्य आपल्या हसऱ्या चेहऱ्यात दडलेलं असतं. हलक्या, विनोदी नजरेतून आयुष्याकडे पाहिलं, तर व्यक्तिमत्त्व खुलतं, तुमचे मन उंचावतं, आकर्षण वाढतं आणि इतरांना आनंद देण्याची क्षमता निर्माण होते. ते खासगी हास्य असो किंवा मित्रांसोबत सामायिक हास्य असो, ही साधी पण शक्तिशाली अभिव्यक्ती केवळ क्षणच नव्हे, तर मानसिकतेत बदल घडवून आणते.

हसण्याचे आरोग्य फायदे

हसू फक्त सौंदर्याचा विषय नाही; हसणे म्हणजे फक्त सभ्य असणे नव्हे, तर त्याचा मेंदूवर थेट परिणाम होतो. संशोधनाने सिद्ध केले आहे की, हसल्यामुळे मूड सुधारतो, ताण कमी होतो आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतात. हसल्यामुळे मेंदूमध्ये एंडॉर्फिन्स, सेरोटोनिन आणि डोपामाईन ही आनंददायी रसायनं स्रवतात. हे नैसर्गिक मूड बूस्टर आपल्याला आनंदी करतात, ताण कमी करतात, आंतरिक समाधान देतात. हसू स्नायूंना आराम देते, हृदय गती नियंत्रित करते, रक्तदाब संतुलित राहतो, झोप सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीरात नैसर्गिक ऊर्जा निर्माण करते.

संशोधनानुसार, जे लोक नियमित हसतात, त्यांची आयुष्याची गुणवत्ता सुधारते आणि दीर्घायुष्य मिळण्याची शक्यता जास्त असते. संशोधन असेही सूचवते की, जबरदस्तीने हसण्याचा प्रयोग मेंदूला आनंदी वाटण्यास भाग पाडू शकतो. एका स्वीडिश अभ्यासात असे आढळून आले आहे की, हसणे संसर्गजन्य आहे. एखाद्याला हसताना पाहून आपल्यातही आपोआप हसण्याची प्रतिक्रिया निर्माण होते. मानसशास्त्रातील आणखी एका अभ्यासात असे सूचित केले आहे की, जे लोक जास्त हसतात, ते जास्त काळ जगतात आणि त्यांचे एकूण आरोग्य उत्तम असते.

परंतु, सर्व हास्ये सारखी नसतात. स्मायलिंगचा मानसशास्त्रीय अभ्यास ‌‘डचेन हास्य‌’ (डोळे आणि तोंड यांचा समावेश असलेले विशुद्ध हास्य) आणि सभ्य किंवा जबरदस्तीने हसण्यातील फरक स्पष्ट करतो. मनापासून आलेले हास्य मजबूत नातेसंबंध, चांगले आरोग्य आणि आनंदाशी जोडलेले आहे, तर बनावट हास्य कधी अस्वस्थता, तिरस्कार, फसवेपणा तर कधी सामाजिक शिष्टाचाराचे संकेत देऊ शकते.

हास्याचा प्रभाव

एका लहानशा शहरातील शाळेत शिक्षकांनी मुलांना दिवसातून काही मिनिटे हसण्याचा सराव करण्यास सांगितलं. काही दिवसांत मुलांचा आत्मविश्वास वाढला आणि शाळेतील वातावरण सकारात्मक बनलं. तसेच, दुसऱ्या प्रयोगात, रुग्णालयात वैद्यकीय जोकर (medical clown) आजारी मुलांना हसवत असे. त्यामुळे मुलांची वेदना कमी झाली. औषधांची गरज घटली आणि मूड सुधारला. हसू फक्त मनोरंजन नाही, तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपचारात्मक आणि आरोग्य संवर्धन करणारे आहे. ते तणावाच्या जाळ्यातून क्षणात बाहेर काढणारे, निष्क्रियतेतून जागृत करणारे जादुई साधन आहे. एखाद्या कठीण प्रसंगी हास्य आत्मविश्वास वाढवतं आणि इतरांपर्यंत ‌‘तुम्ही करू शकता,‌’ अशी प्रेरणा पोहोचवतं. हास्य सामाजिक नातेसंबंध दृढ करण्यास मदत करते.

रोज थोडा वेळ हसण्यासाठी आणि इतरांना हसवण्यासाठी काढा. हसू म्हणजे जीवनाचा प्रकाश आहे. ते आपल्या आरोग्याला, आनंदाला आणि सामाजिक नात्यांना उजाळा देते. ते आपल्या अंतर्मनाला, शरीराला आणि आजूबाजूच्या जगाला ऊर्जा देणारे एक नैसर्गिक, प्रभावी आणि अनमोल साधन आहे.

स्टीफन कोल्बर्ट, लोकप्रिय अमेरिकन विनोदी कलाकार गंभीरपणे म्हणतात, “हास्य हे केवळ सर्वोत्तम औषध नाही, तर ते त्याहूनही अधिक महत्त्वपूर्ण आहे, ते ॲण्टिबायोटिक्स आणि स्टिरॉईड्सचा संपूर्ण पर्याय आहे.”

- डॉ. शुभांगी पारकर