अतिवृष्टीमुळे फूल विक्रेत्यांची कोंडी; ओल्या फुलांमुळे व्यापाऱ्यांचे अर्थकारण कोलमडले

    30-Sep-2025   
Total Views |

मुंबई : नवरात्रीच्या उत्सवासोबत यावर्षी महाराष्ट्राने अतिवृष्टीचे गडद संकट सुद्धा अनुभवले. मराठवाड्यामध्ये रुद्ररुप धारण केलेल्या पावसामुळे हजारो शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली वाहून गेली. मागच्या आठवड्यापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाचा हाहाकार सर्वसामान्यांना अनुभवायाला मिळतो आहे. विजयादशमी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना, फूल विक्रेत्यांना सुद्धा या ‘आसमानी’ संकटाने खिंडीत गाठले आहे. सततच्या पावसामुळे फूलांचे नुकसान झाले असून, फूल विक्रेत्यांचे अर्थकारण कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे.

दादर रेल्वे स्थानकाजवळचे फूल बाजार सणावाराच्या निमित्ताने कायमच गजबजलेले असते. नवरात्रीनिमित्त सुद्धा आपल्याला फूलांच्या खरेदीसाठी गर्दी बघायाला मिळते. यावेळी अतिवृष्टीने व्यापाऱ्यांची चांगलीच कोंडी केल्याचे दिसून आले आहे. पावसामुळे फूलांचे नुकसान झाले असून, विजयादशमीच्या आधीच फूलं महागल्याची चिन्हं बाजारात दिसून येत आहे. दसऱ्याच्या दिवशी झेंडू तसेच शेवंतीच्या फूलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. देवीला वाहण्यासाठी शेवंतीच्या वेण्या विशेष खरेदी केल्या जातात. या वेण्या ५० रुपयांपासून सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यंदाच्या वर्षी झेंडूच्या फूलांची किंमत दसऱ्याच्या आधीच १५० ते २०० रुपये किलोच्या घरात पोहोचली आहे.अतिवृष्टीमुळे झेंडूची फूलं महागली असून, ओल्या फूलांमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे., तसेच ओल्या फूलांकडे ग्रहकांनी सुद्धा पाठ फिरवली आहे. बोंड्याची पिवळी फूलं तथा केसरी फूलं सुद्धा महागली असून १५० रुपये किलोपासून फूलं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याकाळात निशिगंधाच्या फूलांना सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, पावसामुळे फुलांचे नुकसान झाले आहे.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक