एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकांसाठी नेस्को येथे दसरा मेळावा

    30-Sep-2025   
Total Views |

मुंबई : यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार असून केवळ एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकच या दसरा मेळाव्याला उपस्थित असतील. उर्वरित राज्यभरातील शिवसैनिक पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “जिथे संकट तिथे शिवसेना हे आमचे धोरण आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र यासह ज्या ज्या भागात पूरपरिस्थिती आहे त्या भागातील कार्यकर्त्यांनी मुंबईत दसरा मेळाव्याला न येता तिथल्या शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदतीचा हात द्यावा, अशा सूचना आम्ही सर्व मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. संकटग्रस्तांचा दसरा आणि दिवाळी चांगली व्हावी यासाठी आम्ही त्या त्या भागातील कार्यकर्त्यांना लोकांच्या मदतीसाठी पाठवतो आहोत. तसेच दसरा मेळाव्याची परंपरा खंडित होऊ नये यासाठी मुंबई, ठाणे आणि एमएमआर भागातील जवळच्या कार्यकर्त्यांनाच दसरा मेळाव्याला बोलवणार आहोत. आझाद मैदानात पावसामुळे चिखल झाला आहे. त्यामुळे नेस्कोमध्ये आम्ही दसरा मेळावा घेणार आहोत. या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी कार्यकर्त्यांची फौज आणि मदत देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात आखडता घेणार नाही

“राज्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असून मुख्यमंत्र्यांसहित आम्ही सर्वांनी पूरग्रस्त भागात भेटी दिल्या. शेतकऱ्यांचे हे संकट खूप मोठे असून त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वेदना जाणवत होत्या. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहील. त्यांना मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही. पुढच्या दोन तीन दिवसांत संपूर्ण नुकसानीचे आकडे समोर येतील. पण शेतकऱ्यांना मदत करताना अटीशर्ती बाजूला ठेवून त्यांच्यामागे उभे राहावे, ही आमची भावना आहे. लवकरच आम्ही बसून शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेणार आहोत. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन दिले आहे. राज्य आणि केंद्र सरकारही वेळोवेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. यामध्ये सत्ताधारी किंवा विरोधक असे राजकारण करण्याची गरज नसून सर्वांनी मोठ्या प्रमाणात मदत करणे आवश्यक आहे,” असेही ते म्हणाले.

फोटोवरून राजकारण करणे दुर्दैवी

विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “लोकांना मदतीच्या टेम्पोवरचे फोटो दिसले पण त्यातील जीवनावश्यक दिसल्या नाहीत. कार्यकर्ते आपल्या नेत्यांचे फोटो लावतात. पण त्याचे राजकारण करायचे नसते. फोटोवरून राजकारण करणे दुर्दैवी असून संकटग्रस्तांना मदत कशी करता येईल याकडे बघितले पाहिजे. त्यांनीही मोठा फोटो लावून मदत करावी. आम्ही त्यांचे स्वागत करू,” असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....