
आदिमाया महाशक्तीच्या अष्टभूजांमध्ये विश्वाला तारण्याची, संवर्धित करण्याची शक्ती आहे. तिचेच स्वरूप नव्हे, तर जणू तिचेच भूलोकी अवतरलेले रूप म्हणजे स्त्री. एक स्त्री जेव्हा विविध क्षेत्रांत नवनवीन मापदंड निर्माण करते, तेव्हा ती या आदिमाया महाशक्तीचे रूपच असते. या स्त्रीशक्तीचे प्रतिनिधित्व करणार्या अॅड. चेतना विजय कोरगावकर. आईची जबाबदारी निभावताना त्यांनी उत्तम प्रशिक्षक म्हणून वेगळेपण सिद्ध केले आहे. ७०चे दशक होते. काही नातेवाईक प्रमोद शहा यांच्याकडे गेले आणि म्हणाले, "तू मुलीला कराटे शिकवतोस. असे मारामारीचे प्रकार शिकलेल्या मुलीच्या लग्न कसे जुळेल?” मात्र प्रमोद शहा म्हणाले, "तिला शिकायचे आहे.” बाबांनी आपली इच्छा प्रमाण मानली, कुणाचेही न ऐकता आपल्याला संधी दिली. त्यांच्या मुलीने चेतना यांनी त्यावेळी दृढ निश्चय केला. बाबांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी केला. त्यांना अभिमानच वाटेल असेच कर्तृत्व निर्माण करण्याचे मनात निश्चित केले. त्यांनी मन लावून कराटेचा सराव केला. कराटेच्या क्षेत्रातील नामवंत प्रतिष्ठित अशा ‘जपान कराटे असोसिएशन’कडून त्यांना प्रशिक्षण आणि परीक्षेसाठी निवडले गेले. जपानमध्ये जाऊन ‘जपान कराटे असोसिएशन’तर्फे कराटे ब्लॅक बेल्ट मिळवणार्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या.
पुढे चेतना यांनी ‘जपान कराटे असोसिएशन’तर्फे नामांकित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कराटे प्रशिक्षण देणारी केंद्रेही सुरू केली. मुलींना दुर्बल समजून त्यांच्यावर अत्याचार करू पाहणार्याला धडा शिकवता यावा, यासाठी त्यांनी विविध संस्था, मंडळांच्या माध्यमातून मुलींना कराटे प्रशिक्षण देणे सुरू केले.
कराटे चॅम्पियन प्रशिक्षकच नाही, तर निस्वार्थी समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे इंदोर येथे ४०० मुलींचे वसतिगृह आहे. मध्य प्रदेशातील गरीब, गरजू मुलींसाठी असलेल्या वसतिगृहाच्या त्या विश्वस्त आहेत. ‘भारत विकास परिषदे’तर्फे त्या समाजाच्या विविध प्रश्नांवर काम करत असतात. ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’च्या त्या कोषाध्यक्ष आहेत. एक उत्कृष्ट खेळाडू, प्रशिक्षक, सामाजिक कार्यकर्त्या आणि त्याचबरोबर एका नामांकित शैक्षणिक संस्थेची कोषाध्यक्ष अशा विविध जबाबदार्या पेलत असताना काही मानवी मूल्ये कसोशीने जपली आहेत.
प्रमोद शहा हे चार्टड अकाऊंटट, तर त्यांची पत्नी सुधा या गृहिणी. त्यांची कन्या चेतना. त्यांना शालेय जीवनापासूनच विविध खेळांमध्ये गती होती. कबड्डी, गोळा फेक, हॅण्ड बॉल आणि कराटेे. प्रमोद लेकीला नेहमी सांगत, "या समाजाचे आपल्यावर ऋण आहे. कोणत्याही पद्धतीने ते आपण फेडलेच पाहिजे.” चेतना यांना देवधर्म आणि देशाबाबत श्रद्धा आणि निष्ठा होती. पुढे चेतना प्रशिक्षणासाठी मुंबईला आल्या. मुंबईच्या विजय कोरगावकर यांच्याशी कराटेच्या माध्यमातून ओळख होतीच. पुढे या दोघांनी विवाह केला. त्यांना दोन मुले झाली. चेतना यांनी ठरवले की, मुलांच्या उत्तम संगोपनासाठी ती मोठी होईपर्यंत त्यांची सर्व जबाबदारी उचलली. आठवीपर्यंत त्यांनी मुलांना खासगी शिकवणीही लावली नाही. मुले कळत्या वयाची झाली, तेव्हा पतीने उभारलेल्या ‘ओमकार सव्हिर्र्सेस इंडिया प्रा. लिमिटेड कंपनी’मध्ये उत्पादन विभाग तसेच कंपनीचे कार्यालयीन काम सांभाळण्याचे काम त्यांनी उत्तमरित्या केले.
कंपनीची भरभराट होऊ लागली. हे करता करताच त्या विविध शाळा, महाविद्यालय आणि संस्थेच्या माध्यमातून मुलींना कराटे प्रशिक्षण देऊ लागल्या. मात्र, कोरोना काळात यावर मर्यादा आली. पण या काळात थोडा वेळ मिळाला आणि वयाच्या ५२व्या वर्षी त्यांनी ‘एलएलबी’चे शिक्षण पूर्ण केले. ‘भारत विकास परिषदे’च्या माध्यमातून सेवाकार्य सुरू केले.
त्यांचा मोठा मुलगा वरूण परदेशात मोठ्या हुद्द्यावर आहे, तर धाकटा मुलगा पार्थ हा सैन्यात मेजर आहे. आपला मुलगा देशाच्या सेवेत आहे, याचा त्यांना आनंद आणि अभिमान आहे. चेतना यांनी आयुष्यात विविध क्षेत्रांत यश मिळवले. त्याचवेळी एक मुलगी, पत्नी आई आणि प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी आपल्या प्रत्येक पातळीवर नाते जपण्यावर कायम भर दिला. अॅड चेतना कोरगावकर यांना पाहून वाटते की, नारी तू नारायणी!