मुंबई : पुढच्या दोन तीन दिवसात नुकसानीची संपूर्ण आकडेवारी जमा होणार असून त्यानंतर सगळ्या प्रकारच्या नुकसानीसंदर्भात एक व्यापक धोरण तयार करून पुढील आठवड्यात संपूर्ण मदतीची घोषणा करणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी दिली.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यासंदर्भातील आढावा आम्ही घेतला असून जवळपास ६० लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापैकी ऑगस्टपर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील नुकसानीकरिता २ हजार २१५ कोटी रुपये राज्य सरकारने वितरित करणे सुरु केले आहे. ई-केवायसीची अट शिथिल करून अॅग्रीस्ट्रकच्या रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा निर्णय आम्ही घेतला असून त्यासंदर्भातील कारवाई सुरु केली आहे. पुढच्या २-३ दिवसांत आमच्यापर्यंत सगळ्या प्रकारची माहिती पोहोचेल. काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारे मूल्यांकन करता येत नसल्याने त्यांना अधिकचा वेळ दिला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत, खरडून गेलेली जमीन, विहीरी, घरे, तातडीची मदत यासह सगळ्या प्रकारच्या नुकसानासंदर्भात एक व्यापक धोरण तयार करून पुढच्या आठवड्यात या सगळ्या मदतीची घोषणा करणार आहोत. ही सगळी मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे."
दुष्काळ पडल्यावर देण्यात येणाऱ्या सर्व सवलती देणार
"सातत्याने ओल्या दुष्काळाची मागणी होत असते, पण नियमांमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. त्यामुळे ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या उपाययोजना आणि सवलती दिल्या जातात त्या सगळ्या सवलती आता दुष्काळी टंचाई पडली आहे, असे समजून यावेळी लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. पुढच्या दोन तीन दिवसात नुकसानीची आकडेवारी जमा होईल. कुठल्याही परिस्थितीत पुढच्या आठवड्याच्या आत मी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यासंदर्भात बसून घोषणा करणार आहोत," असेही त्यांनी सांगितले.
दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता मदत
"अतिवृष्टीच्या परिस्थितीत केंद्र सरकारने पूर्ण मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याकरिता आपल्याला आपला प्रस्ताव पाठवावा लागतो. जोपर्यंत आपला पूर्ण डेटा संकलित होत नाही तोपर्यंत आपला प्रस्ताव पाठवला जाऊ शकत नाही. मात्र, दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत सुरु केली असून पुढेही ती करणार आहोत. दिल्लीतून तो पैसा आपल्याला परतफेडीमध्ये मिळतो. केंद्राला एकदाच प्रस्ताव पाठवता येतो. त्यामुळे सगळे नुकसानीचे अंदाज आल्यानंतर प्रस्ताव पाठवल्यावर पैसे मिळतील. काही गोष्टी केंद्राच्या किंवा एनडीआरएफच्या निकषात बसणार नाहीत. त्यासाठी निकषांच्या बाहेर जाऊन पूर्णपणे मदत करू," असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
नुकसानग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट
"नुकसानग्रस्त कुटुंबांना आरोग्य किट, गहू, तांदूळ, डाळ यासह अनेक महत्वाच्या वस्तूंचे कीटही आम्ही देणार आहोत. जेणेकरून, पुढचे १-२ महिने ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना त्रास होऊ नये, अशी व्यवस्था आम्ही करतो आहोत," असेही त्यांनी सांगितले.
वसूली न करण्याचे बँकांना निर्देश
धाराशीव जिल्ह्यात बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती पुढे आली होती. यावर बोलताना ते म्हणाले की, "एकाच जिल्ह्यात शेतकऱ्यांना बँकांकडून नोटीस प्राप्त झाल्या आहेत. त्या नोटीसही जुन्या आहेत. पण सगळीकडे आम्ही बँकांना स्पष्ट निर्देश दिले असून कुठेही वसूली करू देणार नाही," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.