मुंबई : राज्यातील ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून सव्वा ते दीड कोटी एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “महाराष्ट्रात मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सर्वात जास्त अतिवृष्टी झाली असून ३३ जिल्ह्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, सव्वा ते दीड कोटी एकर क्षेत्रावरील पीकांचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. जमीन वाहून गेली, घरांमध्ये पाणी शिरले, घरांची पडझड झाली, इलेक्ट्रिक मोटर वाहून गेल्या. त्यामुळे हा आकडा खूप मोठा असून आमचे सर्वच अधिकारी नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करत आहेत. दीड कोटी एकर क्षेत्रापैकी सप्टेंबर महिन्यात एक कोटी एकर क्षेत्राचे नुकसान झाले. जिथे पंचनामे पूर्ण झाले त्या शेतकऱ्यांना आजपर्यंत २२५० कोटी रुपयांची मदत दिली आहे. उर्वरित पंचनामे पूर्ण झाल्यानंतर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. जिल्हाधिकारी पातळीवर तात्पूरते १० हजार रुपये सानुग्रह अनुदान देत असून जनावरांना चाराही उपलब्ध करून दिला आहे. तसेच १० किलो तांदूळ, १० किलो गहू, ३ किलो डाळही उपलब्ध करून दिली आहे,” असे त्यांनी सांगितले.
कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री निर्णय घेतील
“शेतकरी पुन्हा कसा उभा राहील यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना राज्याच्या परिस्थितीची माहिती दिली. केंद्रामार्फतही शेतकऱ्यांना चांगली भरपाई देण्यात येईल. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत कुणाचेही दुमत नाही. त्यासाठी सगळेच सकारात्मक आहेत. पण आज अतिवृष्टीच्या काळात पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्याला उभे करणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निश्चितपणे कर्जमाफीबाबतचा निर्णय घेतील. हे सरकार शेतकऱ्यांचे हित साधणारे असल्याने त्यांना जास्तीत जास्त मदत केली जाईल. दुष्काळ या धर्तीवर सर्व सवलती शेतकऱ्यांना देण्यात येतील. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही,” असे आश्वासनही मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन अतिवृष्टीग्रस्तांना
“कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचे पत्र मला दिले आहे. जवळपास ६ कोटी १७ लाख ५० हजार रुपये हा पगार आहे,” अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....