अखेर १८ वर्षांनंतर तुरुंगाबाहेर! अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची जामिनावर सुटका

    03-Sep-2025   
Total Views |
नागपूर : (Underworld Don Arun Gawli Released After 18 Years in Jail) अंडरवर्ल्ड डॉन आणि माजी आमदार अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून १८ वर्षांनंतर जामीन मंजूर झाला असून, आज (मंगळवारी) त्याची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. नागपूर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत अरुण गवळीला नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळापर्यंत नेले. आणि त्यानंतर अरुण गवळी विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना झाला.


अरुण गवळीवर २००६ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना अटक झाली होती. त्यानंतर २०१२ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने गवळीला जन्मठेपेची शिक्षा आणि १७ लाख रुपयांचा दंड ठोठावला. या निकालाला त्याने मुंबई उच्च न्यायालयात आवाहन दिले होते, मात्र २०१९ मध्ये उच्च न्यायालयानेही त्यांना दिलेली शिक्षा कायम ठेवली.
दीर्घकाळ कारावासाची शिक्षा भोगल्यानंतर वय आणि आरोग्याच्या कारणास्तव गवळीला सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने विविध बाबी लक्षात घेऊन त्याची याचिका मंजूर करून कारागृह उपमहानिरीक्षकांचा वादग्रस्त आदेश रद्द केला. आणि जामीन मंजूर केला. न्यायालयाने स्पष्ट केले की हा जामीन सत्र न्यायालयाने ठरवलेल्या अटींवर आधारित असेल. तसेच, या प्रकरणाची अंतिम सुनावणी फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार आहे.


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\