कल्याण, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या पु.ल. कट्टा कल्याण या संघटनेचे संस्थापक सदस्य रमेश करमरकर यांचे दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता राहत्या घरी अकस्मात निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात मुलगी स्वप्नगंधा आणि पत्नी स्नेहल असा परिवार आहे.
करमरकर यांनी तीस ते पस्तीस वर्ष युनियन सेकेट्ररी म्हणून कामगारांसाठी लढा दिला आहे. मध्य रेल्वे कर्मचारी पतपेढीत कार्यरत राहून असंख्य कामगारांना मदत करून एक लोकप्रिय कामगार नेता अशी ख्याती मिळवून सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर पु.ल. कट्टा कल्याण या संघटनेचे संस्थापक सदस्य होते. पु.ल. कट्टय़ाने आयोजित केलेल्या बालकला संमेलन पोलिस प्रतिभा संमेलन पु.ल. देशपांडे जन्मशताब्दी उत्सव अशा अनेक मोठमोठय़ा उपक्रमात आपले वय विसरून तरूणांच्या बरोबरीने त्यांनी सक्रीय सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. करमरकर यांची कन्या ही सुप्रसिध्द तबलावादक आहे. तर पत्नी स्नेहल यांनी देखील राष्ट्रसेविका समितीच्या कार्यात सक्रीय सहभाग घेतला आहे. करमरकर यांनी सेवानिवृत्तीनंतर त्यांनी लेखन साधनेत स्वत:ला झोकून दिले. ‘गुंफियेला शेलाएॅ या पुस्तकाद्वारे त्यांनी आपले संपूर्ण लेखन जतन केले आहे. तर श्री रेणूका कला मंदिरासाठी केलेल्या त्यांच्या लेखनामुळे संस्थेला अभूतपूर्व यश लाभले आहे. करमरकर यांची अंत्ययात्र गावदेवी चौक येथून निघून लाल चौक येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पु.ल. कट्टा प्रतिनिधी आणि इतर सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे प्रवीण देशमुख यांनी श्रध्दांजली अर्पण करून शांती मंत्राचे पठण केले.