
भारत-अमेरिका संबंधांमधील कटुतेला डोनाल्ड ट्रम्प यांचे आयातशुल्कावरून मनमानी धोरण सर्वस्वी कारणीभूत आहेच. पण, एकेकाळी मोदींशी मित्रत्वाचे दाखले देणाऱ्या ट्रम्प यांनी भारताशी असे टोकाचे व्यापारी वैर पत्करण्यामागे आहेत ते त्यांच्या कुटुंबीयांचे पाकिस्तानशी असलेले वैयक्तिक व्यापारी संबंध. खरं तर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि ट्रम्प यांच्या वाढती जवळीकीमागेही हेच कारण! पण, आता यावर शिक्कामोर्तब केले ते खुद्द अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी. त्यामुळे ट्रम्प यांचा भारताप्रति तोरा असा एकाएकी का बदलला, यामागची समीकरणे समजून घ्यायला हवी.
आज जरी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असले, तरी ते सर्वप्रथम हाडाचे उद्योजक आहेत, हे क्षणभरही विसरून चालणार नाही. कारण, वरकरणी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’च्या कितीही मताकर्षक घोषणा ट्रम्प देत असले तरी, अमेरिकेसोबत स्वतःला, स्वतःच्या कुटुंबीयांना खरबोपती बनवण्याचा अजेंडा त्यांनी गुंडाळला असेल, असे समजणे हे भाबडेपणाचे ठरेल. त्यात पाकिस्तानसारखे दुबळे सावज असेल, तर विचारायलाच नको. पाकिस्तानला आशियाचे ‘क्रीप्टो कॅपिटल’ म्हणून नावलौकिक मिळवून, स्वतःही बक्कळ पैसा कमावण्याचा असीम मुनीरचा मानस आहे. खरं तर मुनीर हे पाकिस्तानचे लष्करप्रमुख. त्यांचा क्रीप्टो चलनव्यवहार वगैरेंशी दुरान्वयाने संबंध असण्याचे मुळी कारणच नाही. तरीही स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी देशालाही विकायला मागे-पुढे न बघणारी पाकिस्तान लष्कर नावाची ही देशही विकून खाणारी जमात. त्यामुळे पाकिस्तानमधील विविध आर्थिक संस्थांना क्रीप्टो चलनाशी संलग्न करण्याचे कंत्राट ‘वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल’ या अमेरिकन कंपनीला दिले गेले. ही अमेरिकन कंपनी कोणाची, तर ट्रम्प यांचा मुलगा एरिक, डोनाल्ड ज्युनिअर आणि जावई जेरड कुशनर यांची. ट्रम्प यांच्या कुटुंबीयांकडेच या कंपनीचा एकूण ६० टक्के मालकी हक्क. विशेष म्हणजे, पाकिस्तान सरकारच्या क्रीप्टो काऊन्सिलबरोबर एप्रिल महिन्यातच या कंपनीचा करार झाला आणि दि. २२ एप्रिल रोजी पहलगामचा दुर्दैवी दहशतवादी हल्ला! आता हा निव्वळ योगायोग होता की, मुनीरने रचलेले एक पद्धतशीर षड्यंत्र, हा प्रश्नही आहेच. कारण, असा करार ट्रम्प यांच्या कुटुंब कबिल्याशी केल्यावर, भारताशी युद्धप्रसंग ओढवलाच, तर ट्रम्प आपल्याला साथ देतील, हा पुरता विश्वासच मुनीरला हे धाडस करायचे बळ देऊन गेला असावा. तर अशा या पाकिस्तान आणि ट्रम्प यांच्या आर्थिक हितसंबंधांवर खुद्द अमेरिकेच्याच माजी सुरक्षा सल्लागाराने बोट ठेवल्यामुळे त्याचे गांभीर्य आपसूकच अधोरेखित होते.
एवढेच नाही, तर सुलिवन यांनी भारत-अमेरिका संबंधांना बसलेला हा मोठा धोका असल्याचे सांगत, यामुळे अमेरिकेवर जगात कोणताही देश विश्वास ठेवणार नाही, अशी रास्त भीतीही वर्तविली. कारण, जगातील दोन मोठ्या लोकशाही देशांमध्ये ट्रम्प यांच्या या वैयक्तिक व्यापारी दृष्टिकोनामुळे वितुष्ट आले, ज्याची मोठी किंमत दोन्ही देशांना मोजावी लागणार आहेच.
पाकिस्तान हे अमेरिकेसाठी केवळ एक प्यादे आहे आणि या देशाला, आजवरच्या त्यांच्या नेतृत्वाला अमेरिकेच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षांनी असेच खेळवले, हा इतिहासच. ट्रम्पही तेच करताना दिसतात. पण, आता चीन आणि अमेरिका या दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याची कसरत करणार्या पाकिस्तानची आगामी वाटचाल कशी होते, हे पाहणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच क्रीप्टो चलन आधीच पाय खोलात असलेल्या पाकिस्तानला तारणार की, हा देश अधिक आर्थिक गर्तेत जाणार, हेदेखील पाहावे लागेल. पण, यानिमित्ताने व्यापार, परस्पर विश्वास आणि मुत्सद्देगिरीमध्ये वैयक्तिक हितसंबंधांची सरमिसळ केली की, त्याची किती मोठी किंमत चुकवावी लागते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ट्रम्प यांनी कौटुंबिक आर्थिक स्वार्थासाठी भारताशी पत्करलेले हे व्यापारी वितुष्ट. भविष्यात जर भारत-अमेरिका संबंध पूर्वपदावर आले तर आनंदच; पण दुर्दैवाने तसे झाले नाही, तर अमेरिकादेखील आशियामधील आपला सर्वांत विश्वासू मित्र गमावून बसेल, हे निश्चित!