मुंबई : जरांगे पाटील यांनी निस्पृह आणि निस्वार्थपणे हे आंदोलन चालवले. त्यामुळे ते तर कालच्या निर्णयाचे शिल्पकार आहेतच. पण या निर्णय प्रक्रियेत आणि हे सगळे घडवून आणण्यात देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे त्यांचेसुद्धा मनापासून अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवार, ३ सप्टेंबर रोजी दिली.
माध्यमांशी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "कोणताही निर्णय घेताना त्याला फार मोठे पाठबळ लागते. त्यामुळे या सगळ्या निर्णय प्रक्रियेत सातत्याने मुख्यमंत्र्यांशी चर्चा व्हायची. यामध्ये काय प्रश्न निर्माण होऊ शकतात, त्यासाठी पर्याय काय? या सर्व विषयांवर त्यांचे मार्गदर्शन लाभले. परंतू, काही मंडळी त्यांना विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करत होती. जरांगे पाटील यांनी निस्पृह आणि निस्वार्थपणे हे आंदोलन चालवले. त्यामुळे ते तर कालच्या निर्णयाचे शिल्पकार आहेतच. पण या निर्णय प्रक्रियेत आणि हे सगळे घडवून आणण्यात देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे त्यांचेसुद्धा मनापासून अभिनंदन करतो."
निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे
"यापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्याच लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत मतभेद व्यक्त केले. त्यामुळे आरक्षणाचा संघर्ष अधिक मजबूत होण्यापेक्षा वेगवेगळ्या विचारप्रवाहांमुळे तो सौम्य होत गेला. आता सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. ही निर्णयप्रक्रिया कशी पुढे जाईल, यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, अशी माझी सर्वांना विनंती आहे. वेगवेगळे मतप्रवाह निर्माण करून आपल्याला आरक्षण मिळाले का? मागच्या तीन-चार वर्षांपासून व्यक्त करण्यात आलेल्या मतांतून आपल्या पदरात शेवटी अपयशच पडले. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयातही टिकला. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ते आरक्षण घालवले. त्यावेळी मराठा समाजाच्या सगळ्या विचारवंतांनी एकत्र येऊन त्याचा खंबीरपणे विरोध करून त्यांना उघडे पाडायला पाहिजे होते. पण असे कधी घडलेले दिसत नाही. त्यानंतर महायूतीने १० टक्के आरक्षण दिले. सुदैवाने सरकारच्या इच्छाशक्तीमुळे ते अद्यापही सर्वोच्च न्यायालयात टिकून असून त्याची अंमलबजावणी सुरु आहे. या सगळ्या बाबींचा विचार करता सर्व विचारवंतांनी या निर्णयावर टीका करण्यापेक्षा काही दिवस शांत बसावे. जरांगे पाटील यांनी एक योद्धा म्हणून याचे नेतृत्व केले आणि त्यांना यश आले. सरकार एक निमित्त असते. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे," असेही ते म्हणाले.
भुजबळ यांचा गैरसमज
"छगन भुजबळ यांचा गैरसमज आहे, असे मला वाटते. हैदराबाद गॅझेटियरमध्ये काही नावांच्या नोंदी आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात त्यावेळी शेती करणाऱ्या लोकांना कुणबी दाखले मिळाले. हैदराबाद गॅझेटियमध्ये तो नंबर आहे पण नाव नाही. त्यामुळे त्याची छाननी केल्यानंतर पात्र लोकांना संधी दिली पाहिजे. त्याला प्रवाहाच्या बाहेर कसे ठेवणार? त्यामुळे हा एक धाडसी निर्णय केला आहे. परंतू, त्यातून ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. त्यामुळे विनाकारण गैरसमज केल्यापेक्षा वास्तव स्विकारले पाहिजे. आम्ही कुणाचेही आरक्षण काढून घेत नसून वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे. व्यापक चर्चेतून आणि विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे," असेही त्यांनी सांगितले.
लक्ष्मण हाके यांनी लुडबूड करू नये
"तुम्ही अन्य लोकांच्या आरक्षणात का लुडबूड करता? तुमच्या राजकीय पोळ्या का भाजून घेता? असा सल्ला मी मागेच लक्ष्मण हाके यांना दिला आहे. ओबीसींचे आरक्षण कुणीही काढून घेत नाही. एखाद्या विषयाबद्दल उपसमितीचे अज्ञान आहे, आम्हाला कळत नाही, असे नाही. ज्यांना फार कळते त्यांनी अतिशहाणपणा करु नये," अशा शब्दात मंत्री विखे पाटील यांनी हाके यांना खडेबोल सुनावले.
रोहित पवार यांनी एवढा उथळपणा दाखवू नये
"रोहित पवार यांना अजून काहीच आंदोलन काय आहे, ते काहीच समजलेले नाही. रोहित पवार हे स्वत: बोलतात की, त्यांच्या आजोबांचे बोलतात ते समजत नाही. मी त्याची माहिती घेतो. त्यांना त्यांच्या आजोबांचे मार्गदर्शन आहे. त्यांनी मराठा समाजाला आरणापासून वंचित ठेवले. मंडल आयोगातून आरक्षण दिले नाही. त्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही, असे स्वत:च सांगितले. त्यामुळे रोहित पवार यांनी आपण आरक्षण का देऊ शकलो नाही, हे आजोबांना विचारायला हवे. त्यांना अजून बरेच शिकायचे आहे. त्यामुळे त्यांनी एवढा उथळपणा दाखवू नये," असा टोलाही त्यांनी लगावला.
उशीरा सुचलेले शहाणपण
"कालच्या निर्णयाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांचेच आहे, या संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "मराठा आरक्षणाच्या निर्णयाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांनाच दिले पाहिजे, हे मी काल जाहीरपणे बोललो. संजय राऊत यांना हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे. त्यांना नेहमीच उशीरा सुचत असल्यामुळे त्यांच्या पक्षाची अधोगती होत चालली आहे," अशी टीकाही त्यांनी केली.