मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने द्वेषपूर्ण पोस्ट करत दंगली भडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत एक्स हॅण्डल विरोधात भाजप महाराष्ट्र प्रवक्ते ॲड. अनिकेत निकम यांनी सोमवार, २९ सप्टेंबर रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आपल्या 'एक्स' हँडलवरून एक प्रक्षोभक पोस्ट केली होती. "भाजपने जनतेचा अंत पाहू नये. नाहीतर, लेह मधील 'जेन झी'ने भाजप कार्यालय पेटवले तसे अख्ख्या देशात परिस्थिती निर्माण होईल," असा मजकूर या पोस्टमध्ये लिहिण्यात आला होता. त्यानंतर अॅड. अनिकेत निकम यांनी ही पोस्ट हटवण्याचा इशाराही दिला होता.
दरम्यान, आता या द्वेषपूर्ण पोस्टद्वारे दंगली भडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ॲड. अनिकेत निकम यांनी 'भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३' च्या कलम १९२ अंतर्गत पोलीस आयक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. यावेळी भाजप महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख प्रकाश गाडे, भाजप मुंबई सचिव महेश पारकर, उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष वीरेंद्र म्हात्रे, माजी अध्यक्ष सुषम सावंत आणि उपाध्यक्ष राजेश दाभोळकर उपस्थित होते.
काँग्रेसची धमकी निषेधार्ह
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ॲड. अनिकेत निकम यांनी म्हणाले की, "महाराष्ट्र काँग्रेसची ही पोस्ट म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोख्याला गंभीर धोका आहे. २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या दंगलीमध्ये भाजप कार्यालय जाळले गेले तसेच ४ जणांचा बळी गेला. त्याच घटनेचा संदर्भ देत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्र काँग्रेस देशभरात हिंसेची धमकी आणि त्यासाठी प्रोत्साहन देत असून ते अत्यंत निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतत्वातील महाराष्ट्र सरकार खंबीर असून महाराष्ट्र राज्यात शांतता भंग करण्याचे कोणतेही प्रयत्न सहन करणार नाही. महाराष्ट्रातील जनता भाजपसोबत असून ती असे कोणतेही प्रयत्न निश्चित हाणून पाडेल," असे ते म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....