येत्या ४ ते ५ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील पंचनामे पूर्ण होणार - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    29-Sep-2025   
Total Views |

नागपूर : येत्या ४ ते ५ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व पंचनामे पूर्ण होणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सोमवार, २९ सप्टेंबर रोजी त्यांनी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांमध्ये भेट देत शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "या भागात संत्रा, सोयाबीन, कापूस, तूर आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. तत्काळ पंचनामे करा, त्रुटी होऊ देऊ नका, एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीशिवाय सुटणार नाही, याची काळजी घ्या, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. नागपूर जिल्ह्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे जवळपास ६० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आहे. त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे. राज्यातील संपूर्ण पंचनाम्यांवर मी लक्ष ठेवून आहे."

"नियमाप्रमाणे, शेतकऱ्यांना मदत देऊन फायदा होणार नाही. त्यामुळे त्यांना जास्तीची मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सरकार यावर योग्य विचार करून जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करेल. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणे शक्य आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना न्याय देण्याकरिता सरकार कुठलीही भूमिका घेण्यास तयार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र यातून मार्ग काढतील आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करतील. शेतकरी आत्महत्या करतील अशी परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे त्यांना मदत देऊन मजबूत ठेवावे लागेल, तरच राज्याला विकासाकडे नेता येईल. येत्या ४ ते ५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्यातील पंचनामे होतील. त्यानंतर एकंदरित राज्याचा आढावा घेऊन सरकारवर कितीही बोजा आला तरी शेतकऱ्यांचे समाधान होईल, असा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील," असेही ते म्हणाले.

पंचनाम्यांसाठी ड्रोनचा वापर

"जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानुसार, लवकरच संपूर्ण राज्याचे चित्र स्पष्ट होतील. आज आमच्याकडे सप्टेंबर महिन्यातील २२ लक्ष हेक्टरचे पंचनामे आले आहेत, तर ऑगस्ट महिन्याचे २५ लक्ष हेक्टरचे पंचनामे आहेत. रोजच्या रोज हे पंचनामे येत असून सरकारने आतापर्यंत २५०० कोटी रुपये पाठवले आहेत. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी सर्व नेते बसून त्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासंबंधी चर्चा करतील. यासाठी ई-पंचनामेही करण्यात येत आहे. तसेच कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याकरिता पंचनामा सादर करण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावांची यादी दाखवण्याचे आदेश आम्ही महसूल अधिकाऱ्यांना दिले आहेत. पंचनाम्यांसाठी राज्यात ड्रोनचा वापर होणार असून आमचे तलाठी, कृषी अधिकारी प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीचा अंदाज घेणार आहेत," असेही त्यांनी सांगितले.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....