आ. प्रविण दरेकर यांना मंत्रिपदाचा दर्जा; शासन निर्णय जारी - स्वयं/ समूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियूक्ती

    29-Sep-2025   
Total Views |

मुंबई : राज्यातील नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या स्वयं पुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात येणाऱ्या स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भाजप विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांची नियूक्ती करण्यात आली आहे. सोमवार, २९ सप्टेंबर रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून प्राधिकरण अध्यक्षाला मंत्रीपदाचा दर्जा असणार आहे.

दि. २४ एप्रिल २०२५ रोजी आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतींचा स्वयं पुनर्विकास करण्याकरिता प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सवलती देण्याबाबत १३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयातील विविध मुद्यांची पुर्तता आणि अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची शासनास शिफारशी करण्यासाठी अभ्यासगट नेमण्यात आला होता. या अभ्यासगटाने १४ जुलै २०२५ रोजी विधानभवन येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे अहवाल सादर केला. या अभ्यासगटाने सादर केलेल्या शिफारशींची प्रभावी अंलबजावणी होण्याकरीता स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरण स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. तसेच, या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून प्रविण दरेकर यांना नियुक्त करून त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यासही त्यांनी मान्यता दिली आहे. दरम्यान, आता याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.


शासन निर्णयात काय?

राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या स्वयं/समुह पुनर्विकासाकरीता स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरण स्थापन करण्यात येत असून या स्वयं/समूह पुनर्विकारा प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदावर पुढील शासन आदेश होईपर्यंत प्रविण दरेकर यांची नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच या प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांना शासन निर्णयान्वये मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येत आहे.

प्रवीण दरेकर यांना मंत्रीपदाच्या दर्जाकरिता प्रचलित देय भत्ते आणि सुविधा म्हाड प्राधिकरणातर्फे अदा करण्यात याव्यात. राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतीचा स्वयंपुनर्विकास करण्याकरीता स्थापन करावयाच्या प्राधिकरणाकरीता समन्वय संस्था (नोडल एजन्सी) म्हणून 'म्हाड प्राधिकरण' यांनी आवश्यक कामकाज करावे. तसेच प्रवीण दरेकर यांच्या कार्यालयाकरीता जागा आणि कार्यालयीन कामकाजाकरीता आवश्यक कर्मचारी वर्गाची नेमणूक आणि त्यांचे भत्ते इत्यादी आवश्यक प्रशासकीय बाबींची पूर्तता म्हाड प्राधिकरणामार्फत त्यांच्या खर्चातून करण्यात यावी, अशा सूचना या शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....