स्त्रियांसाठी आश्रयाची ज्योत...

    29-Sep-2025
Total Views |

स्त्रीमुळे घराला घरपण येते, कुटूंब हे पूर्ण होते आणि आताची स्त्री ही सर्व क्षेत्रात उंच भरारी घेताना आपल्याला सर्वांना दिसते. मात्र, एखाद्या स्त्रीला गर्भधारणा होत नाही, या कारणांमुळे मारहाण करणे किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार करणे हे योग्य नाही. अशाच लैंगिक छळाला बळी पडलेल्या महिलांना आधार देण्याचे काम ज्योतीताई पठानीया करतात.


ज्योतीताईंचा जन्म मुंबईमध्येच झाला. क्विन मेरी शाळेत दहावीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले, अकरावी आणि बारावी त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयामधून पूर्ण केले. त्यांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून बीएस्सी (अॅग्री) पदवी संपादन केली. तसेच, फक्त शिक्षणात नाही तर त्या राष्ट्रीय जलतरणपटूही होत्या. वय वर्ष १५ असताना ताईंनी चक्क धरमतर ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत २६ किलोमिटरचे अंतर पार केले.

ज्योती ताईंनी चाकण येथे स्वत:चा लघु उद्योग सुरू केला. त्यासाठी त्या भोसरी येथे रहायला गेल्या. लग्नानंतर त्या पुण्यातच स्थायिक झाल्या होत्या. लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा भोसरी येथे होती, त्यावेळी त्यांचे भाषण ऐकून १९९२ मध्ये राजकारणाच्या माध्यमातून ताईंनी समाजकार्यास सुरूवात केली. भोसरी येथील काही महिला-मुली आपल्या समस्या घेऊन ताईंकडे येऊ लागल्या. त्या पीडित महिलांचे म्हणणे ऐकून त्यांना मार्गदर्शन देताना ताईंना जाणवले की आपण इतरांसाठी काही तरी करू शकतो.

राजकारण नाही तर सामाजिक कार्य करण्याचे आवाहन त्यावेळी सर्वांना केले होते. ताईंसोबत असलेल्या काही महिलांसह १९९४साली ‘चैतन्य महिला मंडळा’ची स्थापना केली. लैंगिक अत्याचाराला बळी जाणार्या महिलांची मदत ही संस्था करते. मदत आणि सल्ला मागणार्या महिलांची संख्या वाढू लागली, त्यासाठी ‘कुटूंबसखी-समुपदेशन केंद्र’ सुरू केले. त्यातूनच अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी निवास व्यवस्थादेखील असावी यासाठी ‘आश्रय’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला. हा प्रकल्प राबवत असताना बाजारू लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुलींबद्दल ताईंना समजले आणि त्यांच्या बाळांना आसरा देण्यासाठी पुण्यातील लालबत्ती विभागात रात्रीचे पाळणाघर सुरू झाले. तसेच, जागृती आणि आरोग्य शिबिरदेखिल त्यांनी सुरू केले. स्त्रीने नेहमी आत्मनिर्भर रहावे आणि आर्थिक दृष्ट्या कोणावरही अवलंबुन राहू नये म्हणून ताईंनी स्वावलंबची सुरूवात केली.

ताईंच्या सर्व कार्यांसाठी त्यांना ‘क्रांतिदूत पुरस्कार’, ‘सखीगौरव पुरस्कार’, ‘सावरकर पुरस्कार’, ‘महात्मा ज्योतिबा फुले समरसता पुरस्कार’, चैतन्य महिला मंडळास ‘जनसेवा पुरस्कार’, ‘स्त्री-शक्ति गौरव पुरस्कार’ ‘संतेश्वर पुरस्कार’ या पुरस्कारांनी ताईंच्या कार्याची छाप समाजात उमटली आहे. हे कार्य करत असताना अडचणी तर येतात मात्र त्यासोबत त्या अडचणींवर मात करण्याचे बळही येते. तसेच, मदत करत रहाण्याचे ध्येय हे आपोआपच येत असते हे ताईंच्या कार्यातून दिसून येते.

एखाद्या व्यक्तीला कामाची कल्पना मिळाली की, त्या कामासाठीची प्रेरणा ही आपोआप मिळते. असे म्हणतात. तसेच. ताईंनीसुद्धा आपल्या मनाचे ऐकले आणि आपली वाटचालही सुरू ठेवली. आज त्या लाखो महिला आणि लहान मुलांसाठी एक खंबीर साथ आहेत. असे म्हणतात की, स्त्री ही स्त्रीची शत्रू असते; पण ते खरे नाही, हे आपल्या कर्माने सिद्ध करून दाखवावे. एखादी अडचणीत असलेली महिला किंवा मुलगी दिसली तर तिला नाव ठेवण्याऐवजी तिच्याकडे आपुलकीने पहावे आणि शयतो तिच्या समस्येतून कसे बाहेर काढता येईल, असा विचार सर्वांनी करावास, असे ताईंचे ठाम म्हणणे आहे.

एखादी स्त्री ही कुटूंबासाठी फार महत्त्वाची असते. कधी आई म्हणून आपले कर्तव्य पार पाडते, तर कधी बहिण म्हणून आपली जबाबदारी पूर्ण करते. अडचणी असल्यावर आपल्याला खंबीर साथ ही घरातल्या स्त्रीचीचे मिळते हे मात्र खरे! प्रत्येक स्त्रीला आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याची संधी मिळावी म्हणून ज्योती पठानीया यांनी सुरू केलेला हा प्रवास... एक स्त्री समाजासाठी काय करू शकते हे ज्योतीताईंच्या कार्यातून दिसून येते. महिलांसाठी आणि लहान मुलांच्या कल्याणासाठी आपले जीवन सार्थ करणार्या ज्योतीताईंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

- मानसी गुरव