मराठवाड्यात महापूर; गोदावरी नदीने ओलांडली इशारा पातळी

    29-Sep-2025   
Total Views |

मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा आक्रोश पाहायला मिळतो आहे.

मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत पावसाने दाणादाण उडवली. अनेक नद्यांना पूर आले तर अनेकांची शेती, घरे, दुकाने, गुरेढोरे पाण्यात वाहून गेलीत. अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला. बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पूरात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफ, एसडीआरएफ यासह विविध यंत्रणांच्या माध्यमातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर रस्त्यांवर पाणी साचल्याने लोकांना होडीतून प्रवास करावा लागतो आहे.

मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला असून नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. शिवाय लोकांच्या घरात पाणी शिरले. गोदावरी काठच्या घरांमध्ये राहत असलेल्या अनेक लोकांवर आपले घरदार सोडून टेकडीवर राहत असलेल्या नातेवाईकांच्या घरी राहायला जाण्याची वेळ आली आहे. तर अनेक कुटुंबाचे स्थलांतरही करण्यात आले.

जायकवाडी धरणातून १ लाख ८८ हजार क्युसेकने विसर्ग

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जायकवाडी धरणातून १,८८,००० क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. सुदैवाने पाऊस बंद झाल्याने आता विसर्ग वाढविण्याची गरज नाही. येलदरी धरणातून २९,४०० क्युसेक इतका विसर्ग होत असून तो पूर्णपणे नियंत्रणात आहे. मांजरा आणि तेरणा नद्यांचा पूर ओसरला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती नियंत्रणात आहे. उजनीतून ७५,००० इतका विसर्ग होत असून, सीना कोळेगावमधून ८०,००० क्युसेक इतका विसर्ग होतो आहे.

तसेच नाशिकमधील गंगापूर धरणातून ११,००० क्युसेक इतका विसर्ग होत असून, मुळा धरणातून १०,००० क्युसेक विसर्ग सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणातून ५४,५०० क्युसेक इतका विसर्ग सुरु असून, हतनूर धरणातून ६५,८०० क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. तर कोकणातील सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली आहेत.

"मे महिन्यापासून सलग अतिवृष्टी सुरु असल्याने भयानक पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून अद्याप पंचनामे सुरु आहेत. शेतीतील सोयाबिन पाण्याखाली गेले असून कापसाचे बोंड गळून पडले तर, ऊसाचे पीकही नाजूक अवस्थेत आहे. संपूर्ण शेतजमीन खरडून गेली आहे. जमिनीवर १० फूटांचा खड्डा पडला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले असून घरांच्या भिंती कोसळल्या. जुने लोक सांगतात की, गेल्या ५०-६० वर्षात कधीही एवढा पाऊस बघितला नाही. जवळपास १०० हेक्टर जमीन पाण्यात वाहून गेली. राज्य सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये मदत आणि कर्जमाफी करावी, अशी आमची मागणी आहे. एवढी मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांचे जगणे कठीण होऊन बसेल."

- अजय सुरनर, शेतकरी
हगदळ, ता. अहमदपूर, जि. लातूर


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....