मुंबई : संघाची प्रार्थना आणि संघ गीते यांना शंकर महादेवन यांनी नव्या रुपात मांडले. संघात ज्या शैलीत आणि प्रभावीपणे ते होणे अपेक्षित होते, त्यानुसार प्रत्येक गीत समजून त्यांनी ते गायले. एकाअर्थी ही अशक्यप्राय गोष्ट आहे, परंतु शंकरजींनी ती करून दाखवली. याने निश्चितच समाजातही पुढे परिवर्तन घडेल", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
असंख्य भारतीयांच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवणाऱ्या संघ गीतांनी प्रत्यक्ष मंत्रशक्तीचे कार्य केले आहे. अशा निवडक गीतांना नव्याने संगीतबद्ध करण्यात आलेल्या संघ गीतांचा लोकार्पण सोहळा रविवार, दि. २८ सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग, नागपूर येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत सरसंघचालक पुढे म्हणाले, संघाचे गीत गाणे सोपं काम नाही, कारण संघगीतामुळे निश्चितच सामाजिक परिणाम होत असतो. स्वयंसेवक जेव्हा गीत गात असतात तेव्हा समाजाबरोबर त्यांच्या जीवनातही परिवर्तन घडत असते. तो जेव्हा वक्त्याच्या भाषणाआधी वैयक्तिक गीत गातो, तेव्हा त्याच्या गीतातून वक्त्याचे भाषण ऐकण्यासाठीचे वातावरण तयार झालेले असते. ही ताकद त्या संघ गीताची आहे, कारण त्या प्रत्येक शब्दांमागे स्वयंसेवकांच्या आयुष्यभराची तपस्या आहे. कार्यक्रमादरम्यान शंकर महादेवन यांनी गायलेल्या संघ गीतांमुळे उपस्थित रसिक वृंद मंत्रमुग्ध होऊन गेल्याचे पाहायला मिळाले.
देशभक्तीद्वारा राष्ट्रजीवन समृद्ध करणारी अशी ही संघगीते आहेत. ती गीते आपल्या समोर नव्यारुपात सादर करण्यासाठी अशा व्यक्तीची निवड केली, जिच्या स्वरातून स्वरगंगा ओसंडून वाहतेय. ज्यांनी ज्यांनी संघगीते लिहिली, गायली त्यांनी कधी त्याचे कॉपीराईट्स मागितले नाहीत, म्हणून संघाचे गीत अजरामर झाले. मनुष्याने कसे जगले पाहिजे याची प्रेरणा देणारी ही गीतं आहेत. संघ गीतांमधून संघटन शक्ती तसेच सांघिक भावना निर्माण होत असते.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
संघ शिक्षा वर्गात असताना वक्त्यांनी 'शत नमन माधव चरण में...' हे गीत गायले. शब्द, संगीत आणि गीतामध्ये किती ताकद असते हे या गीतातून तेव्हा कळते. कारण तेव्हा प्रत्येक स्वयंसेवकाचे डोळे पाणावलेले होते. या तीन गोष्टी अंतर्मनापर्यंत पोहोचल्या की, व्यक्तीच्या जीवनात संस्कार रुपी प्रेरणा तयार होते. संघाचे प्रत्येक गीत मनाला भावते. त्याचे रचानाकार कोण हे कधी समोर आले नाही. मात्र शंकर महादेवन यांनी या गीतांना जे नवे रूप दिले त्याने मन तृप्त झाले. आमच्या अपेक्षांच्या पलिकडचे हे होते. ही संघ गीते युवा वर्गामध्ये देशभक्तीची भावना निर्माण करेल.
- नितिन गडकरी, केंद्रीय मंत्री