मोतीलाल नगरच्या स्थानिक नेत्यांमध्ये उभी फूट!

Total Views |

मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर वसाहतीच्या म्हाडाच्या महत्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्पाला रहिवाशांतील काही समित्या-संघटनांनी विरोध दर्शवला आहे. या स्थानिक नेत्यांनी गेले काही महिने प्रकल्पाविरोधात प्रचारदेखील चालवला आहे. मात्र दुसरीकडे यातील प्रमुख नेत्यांमधील आपापसांतील वाद व संघर्ष चव्हाट्यावर आल्याने पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेले रहिवासी मात्र संभ्रमात पडले आहेत. तसेच, रहिवाशांच्या वतीने या गटतटांपैकी नेमकी कोणाशी चर्चा करायची याबाबत म्हाडादेखील संभ्रमात आहे.

शनिवार, दि. २७ सप्टेंबर रोजी मोतीलाल नगर १, २ व ३ या वसाहतीतील काही समित्यांनी विविध मागण्यांकरिता मोतीलाल नगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मैदानात धरणे आंदोलन केले. यामध्ये जनकल्याणकारी समिती, मोतीलाल नगर रहिवासी विकास संघ, मोतीलाल नगर पुनर्विकास समन्वय समिती आदी समित्या सहभागी होत्या. तसेच या समित्यांचे नेतृत्व करत असलेले माधवी राणे, गौरव राणे, श्रीधर शेलार, संतोष परब आदी उपस्थित होते. मात्र यामध्ये प्रकल्पाविरोधात आजवर आघाडीवर असलेली मोतीलाल नगर विकास समिती व तिचे शीर्षस्थ नेते अध्यक्ष सलीम खान उर्फ बाबुभाई व सचिव ॲड. निलेश प्रभू हे अनुपस्थित राहिल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आजवर मोतीलाल नगर विकास समितीचे अध्यक्ष म्हणून युवराज मोहिते कार्यरत होते. मात्र अचानकपणे त्यांना व आणखी ४ सदस्यांना थेट समितीतून निलंबित करण्यात आले व बाबुभाई यांची नेमणूक करण्यात आली. यामागे मोहिते विरुद्ध प्रभू असा वाद असल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. आजवर मोतीलाल नगरच्या रहिवाशांचे प्रतिनिधीत्व करण्याचा दावा करणाऱ्या या प्रमुख समित्यांमधील परस्पर संघर्षाने टोक गाठल्याने स्थानिक रहिवासी बुचकळ्यात पडले असून नेमके कोणाचे खरे मानायचे, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. तसेच, म्हाडातर्फेही या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त होत असून, या मंडळींच्या वादांमुळे आम्ही नेमकी कोणाशी चर्चा करायची व कोणाची भूमिका अधिकृत मानायची, असा प्रश्न पडल्याचे म्हाडातील सूत्रांनी सांगितले.


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.