शहरी नक्षलवाद लोकशाहीसाठी धोकादायक - विवेक विचार मंच राज्य संयोजक सागर शिंदे यांचे प्रतिपादन

    26-Sep-2025
Total Views |

धुळे : “शहरी नक्षलवादी चळवळी संविधानविरोधी असून लोकशाही व्यवस्थेविरुद्ध जहाल विचार पसरवण्याचे काम करतात. त्यामुळे अशा फुटीरतावादी प्रवृत्तींना रोखण्यासाठी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा आवश्यक आहे,” असे विवेक विचार मंचाचे राज्य संयोजक सागर शिंदे यांनी स्पष्ट केले.

धुळे शहरात नक्षल विरोधी जनसुरक्षा विधेयक समर्थन समितीच्या वतीने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ च्या समर्थनार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, कामगार, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय वाल्मिकी महासभेचे प्रदेशाध्यक्ष नागेज कंडारे होते. त्यांनी प्रास्ताविक करताना नक्षलवादाच्या विध्वंसक प्रवृत्तीवर जनजागृतीची गरज अधोरेखित केली.

या समर्थन सभेला जयेश चौधरी, उमेश चौधरी, गजेंद्र अंपळकर, विजय पवार, रूपाली पाटील, प्रदिप नाना कर्पे, प्रतिभाताई चौधरी, सुचेताताई शिनकर, महेश मिस्त्री, राजेश वाणी, महेंद्र विसपुते, काशिनाथ लोहरे, प्रेमचंद गोयल, धनराज पिवाल, सुरेश बिसनारिया, रोहित चांदोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सभेत विवेक विचार मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदु परिषद, भारत विकास परिषद, समरसता मंच, वनवासी कल्याण आश्रम, भटके विमुक्त विकास परिषद, अखिल भारतीय वाल्मिकी महासभा, अण्णाभाऊ साठे विचार मंच, हिंदु जागरण मंच अशा विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून नक्षलवादविरोधी जनसुरक्षा कायद्याला ठाम पाठींबा दिला.