त्श्वाने : आदर्श ऑटोमोटिव्ह सिटी

Total Views |

आज संपूर्ण जग हे पायाभूत सुविधा उभारणीवर भर देत आहे. पायाभूत सुविधा उभारणे म्हणजे केवळ शहरांसाठी पूल किंवा रस्ते निर्माण करणे नसून, त्या प्रदेशाचा सर्वांगिण विकास साधण्याचाही अंतर्भाव त्यात होतो. सर्वांगिण विकासाचे याचे उत्तम उदाहरण म्हणजे, दक्षिण आफ्रिकेतील त्श्वाने महानगरपालिका. ही महानगरपालिका दक्षिण आफ्रिकेची प्रशासकीय राजधानी असली, तरी गेल्या दोन दशकांत तिने स्वतःचे एक वेगळे औद्योगिक स्थान निर्माण केले आहे. या प्रदेशातील ऑटोमोटिव्ह सिटी प्रकल्पाने, स्थानिक अर्थव्यवस्थेबरोबरच, जागतिक वाहन उद्योगामध्येही स्वत:चे विशेष स्थान निमाण केले आहे. या प्रकल्पाचा अभ्यास केल्यास औद्योगिक धोरणे आणि शहरी विकासाबाबत अनेक महत्त्वाचे धडे जगाला मिळतात. त्श्वाने या शहराने स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी दिशा देतानाच, रोजगारनिर्मितीही केली.

या प्रकल्पाची सुरुवात दीर्घकालीन धोरणावर आधारित होती. त्श्वाने महानगरपालिकेचे उद्दिष्ट स्पष्टे ठेवले की, शहराला दक्षिण आफ्रिकेची ऑटोमोबाईल राजधानी बनवायचे. या हेतूसाठी औद्योगिक केंद्रित योजना आखण्यात आल्या. ज्यामध्ये उत्पादक, पुरवठादार आणि सेवाक्षेत्र यांना एका छताखाली आणले गेले. अशाप्रकारे उद्योगांची सांगड घालून, कार्यक्षमता आणि सहयोग वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातून औद्योगिक प्रगतीसाठी दीर्घकालीन धोरणात्मक नियोजन आणि सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित होते.

ऑटोमोटिव्ह सिटीच्या यशामागे पायाभूत सुविधांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. उद्योगासाठी योग्य रस्ते, रेल्वे मार्ग, वाहतूक व्यवस्था आणि लॉजिस्टिक केंद्रे उपलब्ध येथे करून देण्यात आली. जवळपासच्या विमानतळांशी आणि निर्यात बाजारही इथे जोडण्यात आले. यामुळे उत्पादनखर्च कमी झाला आणि आंतरराष्ट्रीय कंपन्याही आकर्षित झाल्या. केवळ जमीन उपलब्ध करून दिल्याने उद्योग वाढत नाहीत, तर त्यांना आवश्यक अशा दर्जेदार सुविधा पुरवणे हे प्रगतीचे खरे सूत्र असल्याचे यातून अधोरेखित होते.

या प्रकल्पात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रामध्ये यशस्वी सहकार्य दिसून आले. सरकारने आवश्यक धोरणात्मक पाठबळ दिले, तर खासगी उद्योगांनी भांडवल, तंत्रज्ञान आणि कौशल्य उपलब्ध करून दिले. यातून औद्योगिक विकासासाठी शासन आणि उद्योगजगताची सांगड काय सकारात्मक परिणाम घडवू शकते, याचे दर्शन जगाला झाले. ऑटोमोटिव्ह सिटीमुळे रोजगारनिर्मितीही मोठ्याप्रमाणात झाली आहे. हजारो लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कामाच्या संधी मिळाल्या. युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रे आणि कौशल्य विकास कार्यक्रमही राबवले गेले. या उदाहरणातून शिकण्यासारखे म्हणजे, स्थानिक समाजाला मिळणार्या फायद्यावरच औद्योगिक विकासाचे खरे यश अवलंबून असते. जागतिक स्तरावर टिकून राहण्यासाठी गुणवत्तेची आणि नवोपक्रमाची महत्त्वाची भूमिका आहे. त्श्वानेतील ऑटोमोटिव्ह उद्योगांनी आंतरराष्ट्रीय दर्जा पाळत उत्पादन केले आणि सातत्याने संशोधन व विकासावर भर दिला. यामुळे त्श्वाने उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून उदयास आले. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी केवळ खर्च कमी करणे पुरेसे नसते; दर्जेदार उत्पादन, नवीन तंत्रज्ञान आणि नवोपक्रम यावरही भर द्यावा लागतो. या प्रकल्पाचा फायदा केवळ त्श्वानेपुरता मर्यादित न राहता, परिसरातील लहान उद्योग आणि समाजालाही झाला. पुरवठासाखळीतील संधी, नवीन व्यवसाय आणि स्थानिक पायाभूत सुविधांच्या विकासामुळे, संपूर्ण प्रदेशाचा आर्थिक स्तर उंचावला. मोठ्या प्रकल्पाचा लाभ जर आसपासच्या भागांपर्यंत पोहोचला, तर तो अधिक शाश्वत आणि सर्वसमावेशक ठरतो हे त्श्वानेच्या अनुभवातून अधोरेखित झाले.

एकूणच पाहता, त्श्वानेची ऑटोमोटिव्ह सिटी ही केवळ औद्योगिक पार्क नसून, एकात्मिक आर्थिक विकासाचे यशस्वी मॉडेल आहे. यातून शिकण्यासारखे धडे म्हणजे, दूरदृष्टी असलेले धोरणात्मक नियोजन, उद्योगाला पूरक सुविधा, शासन-खासगी भागीदारी, रोजगार व कौशल्य विकास, जागतिक दर्जा व नवोपक्रम आणि प्रादेशिक समावेशकता. भारतासारख्या वेगाने प्रगती करणार्या देशांसाठी त्श्वानेचे हे मॉडेल प्रेरणादायी ठरू शकते. योग्य धोरणे आणि सहकार्याच्या बळावर उद्योगविकास संपूर्ण समाजाला उन्नतीच्या मार्गावर नेऊ शकतो.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.