सगळे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    25-Sep-2025   
Total Views |

मुंबई : केवळ नियमांवर बोट न ठेवता सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत देणार असून ड्रोन किंवा मोबाईलद्वारे केलेले पंचनामेही ग्राह्य धरण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, २४ सप्टेंबर रोजी दिली.

मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव आणि दारफळ तसेच लातूर जिल्ह्यातील उजनी आणि औराद शहाजनी या अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी केली. त्यांनी या गावातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह इतर नेते आणि अधिकारी उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "माढा तालुक्याच्या भागात काही गावांना आम्ही भेटी दिल्या असून पुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. शेतीचे नुकसान झालेच पण घरांमध्येही पाणी गेल्यामुळे अन्नधान्य आणि घरातील सामानांचेही मोठे नुकसान झाले आहे. जवळपास एक पूर्ण छोटी वसाहत पाण्याखाली बुडली असून एनडीआरएफने २२ लोकांना रेस्क्यू केले आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नागरिकांमध्ये फार चिंता आणि आक्रोश आहे. राज्य सरकारच्या वतीने आम्ही तातडीने मदत सुरु केली आहे. कालही जवळपास २ हजार कोटी रुपये दिले आहेत. आम्ही शेतकऱ्यांसोबतच ज्यांच्या घरांचे, अन्नधान्याचे नुकसान झाले त्यांनादेखील मदत करणार आहोत. कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि आवश्यकता असल्यास निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करण्याचा निर्णय शासनाने केला आहे. केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना, शेतकऱ्यांना, शेत मुजरांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. पहिल्यांदाच आपत्ती सुरु असतानाच पैसे देणे आम्ही सुरु केले आहे. दिवाळीच्या पूर्वीच सगळ्यांना मदत करणार आहोत."

शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्यास प्राधान्य

"ओला दुष्काळ ही आपल्या बोलीभाषेतील संज्ञा आहे. पण पावसामुळे जे जे नुकसान झाले त्या सगळ्याची भरपाई आणि टंचाईच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सगळ्या सवलती देण्याचा निर्णय केला आहे. तातडीची मदत हा महत्वाचा विषय असून ती पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या खात्यात देणार आहोत. केंद्र सरकारही यात मदत करणार आहे. एनडीआरएफमध्ये केंद्राने काही आगाऊ पैसे आपल्याला दिले असतात, ते पैसे खर्च करण्यास सुरुवात केली आहे. काल मंत्रिमंडळात यावर चर्चा झाली असून जो काही निधी लागेल तो देण्याचे आश्वासन मंत्रिमंडळाने दिले आहे. निर्सगाचे चक्र बदलेले असून वातावरण बदलाचा परिणाम होतो आहे. त्यामुळे आपण याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खरडून गेलेल्या जमिनी संदर्भात काही नवीन नियम करत असून त्याकरिता अधिकचे पैसे देणार आहोत. आता आपल्याला पहिल्यांदा शेतकऱ्याला तातडीची मदत करणे गरजेचे आहे," असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

लातूर जिल्ह्यातील गावांची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रात आणि विशेषत: मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. लातूर, धाराशीव, बीड या जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृष पाऊस झाला. नद्यांना पूर आल्याने आसपासच्या शेतीमध्ये पाणी शिरले. पीकांचे नुकसान झाले, जमीन खरडून गेली, गावांमध्ये पाणी शिरले, लोकांच्या घरातील धान्य आणि वस्तूंचे नुकसान झाले. जेवढी वाढीव मदत करता येईल ती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. टंचाईच्या वेळी लागू करण्यात येणाऱ्या सगळ्या उपाययोजना यावेळी आम्ही लागू करणार आहोत. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचे नाही, असा सरकारचा निर्णय आहे. दोन गावांना जोडणारा पूल बांधण्यासाठी तसेच या गावांतील रस्त्यालाही आम्ही मान्यता देणार आहोत. त्यामुळे कुणालाही चिंता करण्याची आवश्यकता नसून सरकार १०० टक्के तुमच्या पाठीशी उभे आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ड्रोन किंवा मोबाईलवरील पंचनामा मान्य करणार

"मोठ्या प्रमाणातील पावसामुळे शेतकऱ्यांची पूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. एकीकडे पीकांचे नुकसान झालेच पण जमीनही खरडून निघाली. आम्ही इथला प्रश्न समजून घेतला आहे. अलीकडे महिनाभराचा पाऊस तीन दिवसांत पडतो. अशावेळी दोन नद्या एकत्रित आल्यावर एका नदीच्या प्रवाहामुळे दुसऱ्या नदीचा प्रवाह अडतो. त्यामुळे पाणी आतमध्ये येते. त्यावर संभाजी पाटील निलंगेकर यांनी काही उपाय सूचवले असून ते आम्ही करणार आहोत. तसेच या भागात एक पूर संरक्षक भिंतसुद्धा बांधावी लागेल. पाणी साचल्यामुळे ज्या भागात पंचनामे करणे शक्य नाहीत तिथे आम्ही ड्रोनने पंचनामे करून ते मान्य करू. त्या भागात पाणी गेले आहे एवढेच केवळ आपल्या रेकॉर्डला असले पाहिजे. त्यामुळे ड्रोनचा पंचनामा किंवा कुणी मोबाईलवर फोटो काढून दिल्यास तोही पंचनामा आम्ही मान्य करू," असेही त्यांनी सांगितले.

विरोधकांनी आरशात पाहावे

विरोधकांनी कधी नुकसान भरपाई दिली नाही. पण आमचे पहिले सरकार आहे ज्यांनी पाहणीपूर्वीच भरपाई दिली. २२०० कोटी रुपये दिल्यानंतर आम्ही पाहणी करण्यासाठी आलो आहोत. शेतकरी दु:खी असताना आपण निव्वळ राजकारण करणे योग्य नाही. त्यांनी कधीतरी आरशात पाहायला हवे. त्यांच्या काळात अशी आपत्ती आल्यानंतर त्यांनी काय केले हे बघितले पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांसाठी जे जास्तीत जास्त करता येईल ते केले पाहिजे. सरकारच्या काही मर्यादा असतात. त्या मर्यादेबाहेर जाण्याचा प्रयत्नही आम्ही करू," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....