पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्यातील २ हजार ४५८ मेगावॅट क्षमतेचे ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण

    25-Sep-2025   
Total Views |

मुंबई : सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी केले. त्यांनी राज्यातील २ हजार ४५८ मेगावॅट क्षमतेच्या ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

राजस्थान बांसवाडा येथे ऊर्जा तसेच विविध विकास योजनांचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. बांद्रा पूर्व प्रकाशगड येथून या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी, राज्यातील पी एम कुसुम सी - मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० आणि पी एम कुसुम सी बी - मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीला दिवसा वीज उपलब्ध होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीवर भर देऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या पीक पद्धतीचा वापर करावा. शेतीचे आरोग्य संवर्धन उपाय होणे ही काळाची गरज आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे."

काळानुरूप बदलती शेती करणे गरजेचे

"सौर ऊर्जा प्रकल्पाचे खूप फायदे आहेत. शेतकऱ्यांनी झिरो कॉस्ट फार्मिंगला देखील महत्त्व दिले पाहिजे. झिरो बजेट नैसर्गिक शेती ही अशी शेती पद्धत आहे, ज्यामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर कमी करून खर्च कमी केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीमध्ये आर्थिक गुंतवणूक वाचते आणि जमिनीचे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर पारंपारिक शेतीऐवजी काळानुरूप बदलती शेती करणे गरजेचे आहे," असे त्यांनी सांगितले.

"भारताला आज एक लाख करोड खाद्यतेलाची आयात करावी लागते. ही समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी खाद्यतेल बियांची लागवड करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मिलेटचीदेखील सध्या खूप मागणी आहे. हे लक्षात घेता त्या प्रकारच्या पद्धतीची पिके घेतली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांची आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल होईल. राज्याचे राज्यपाल आर्चाय देवव्रत यांचे नैसर्गिक शेतीवरील व्याख्यान शेतकऱ्यांनी जरूर ऐकावे," असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी लाभार्थ्यांशी संवाद साधत प्रकल्पाच्या यशोगाथा जाणून घेतल्या.

राज्याचा देशात प्रथम क्रमांक

पीएम कुसुम सी-मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेत सहा लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. यामुळे ३२.०८ लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे. तसेच इतर विविध योजनेतून राज्यात आतापर्यंत ६ लाख ४६ ६९४ सौर कृषी पंप बसविण्यात आले असून राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या योजनेमुळे २०.९५ लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....